‘अंजू उडाली भुर्र’ या बालनाट्याचा तालमीचा शुभारंभ नुकताच झाला. श्री. अशोक पावसकर आणि सौ. चित्रा पावसकर हे दांपत्य गेली पन्नास वर्षे बाल रंगभूमीच्या क्षेत्रात निस्वार्थ सेवा करत आहे. ह्या जोडप्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक कलाकार प्रगल्भ झाले आणि त्यांना सन्मान प्राप्त झाला. आता, पावसकर दांपत्य, डॉ. सलील सावंत ह्या तरुण निर्मात्याच्या सहकार्याने ‘अंजू उडाली भुर्र’ रंगमंचावर आणत आहेत. या नाटकाचे लेखन गुरुवर्य नरेंद्र बल्लाळ यांनी ५५ वर्षांपूर्वी केले होते, तेव्हा प्रसिद्ध अभिनेत्री ईला भाटे ह्यांनी अंजूची भूमिका साकारली होती. या नाटकात प्रसिद्ध अभिनेते दिगंबर राणे आणि पावसकर दांपत्य यांनीही भूमिका साकारल्या होत्या.
प्रेरणा थिएटर्स प्रस्तुत ‘अंजू उडाली भुर्र’ हे नाटक १९ एप्रिल रोजी रंगमंचावर प्रदर्शित होणार आहे. नरेंद्र बल्लाळ यांच्या जयंतीला ‘ठाणे वैभव‘ या वृत्तपत्राच्या सुवर्ण महोत्सवाच्या प्रसंगी १९ एप्रिल रोजी ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात या नाटकाचा पहिला प्रयोग होईल. यानंतर, हे नाटक मुंबई, पुणे, नाशिक आणि महाराष्ट्रातील अन्य भागांमध्ये प्रदर्शित होईल.
नाटकाचे पुनर्लेखन, गीत लेखन आणि दिग्दर्शन प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे करणार आहेत, ज्यांनी ‘कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक’, ‘ती फुलराणी’, ‘हिमालयाची सावली’ आणि इतर नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. या नाटकाचे नेपथ्य ‘अलबत्या गलबत्या’सारख्या गाजलेल्या नाटकांचे नेपथ्य करणारे संदेश बेंद्रे तयार करणार आहेत. प्रकाशयोजना सुप्रसिद्ध श्याम चव्हाण यांच्याकडून, संगीत तुषार देवल ह्यांचे आणि रंगभूषा उदयराज तांगडी यांच्या हातून होणार आहे. वेशभूषा श्रद्धा माळवदे आणि पूजा देशमुख करणार आहेत, तर ध्वनी संयोजन सुनील नार्वेकर यांचे आहे. जाहिरात संकल्पना आणि डिझाइन अक्षर शेडगे यांचे असून, प्रसिद्ध पब्लिसिटी एजन्सी बी.वाय.पाध्ये यांचा या नाटकाच्या प्रसिद्धीमध्ये सहभाग आहे. नाटकाचे सूत्रधार नितीन नाईक आहेत.
या नाटकात ९ कुशल कलाकारांचा चमू आहे, ज्यात ‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवे, ‘यदा कदाचित’मध्ये अभिनय करणारी धमाल गांधारी, आणि सृजन द क्रियेशनच्या कार्यशाळेतील कलाकार गुलाब लाड, चिंतन लांबे, विजय मिरगे, प्राची रिंगे, गौरवी भोसले, प्राधीर काजरोळकर, बाबली मयेकर यांचा समावेश आहे. अंजूची भूमिका नवोदित बाल अभिनेत्री स्कंदा गांधी साकारणार आहे. संगीत, नृत्य, आणि चमत्कारिक नेपथ्य व प्रकाशयोजनेने सजलेले हे नाटक बालप्रेक्षकांसोबतच त्यांच्या पालकांना आणि नातेवाईकांना देखील निश्चित आवडेल, असा विश्वास सर्व कलाकार आणि निर्माते व्यक्त करत आहेत.