मॅनहोलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आयुष्य अतिशय कष्टाचे व घाणीचे असते. लोकांच्या भलाईसाठी, रस्ते साफ ठेवण्यासाठी, स्वास्थ्याला हानिकारक असलेल्या, विषारी वातावरणात आयुष्यभर काम करूनसुद्धा, त्यांना समाजात महत्वाचं, मानाचं स्थान मिळत नाही. एवढंच काय, त्यांच्या स्वास्थ्याची काळजी त्यांना घेता येईल एवढा पगारदेखील त्यांना दिला जात नाही. मॅनहोलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या या खडतर आयुष्याची कहाणी सांगणाऱ्या एका नवीन नाटकाने रंगमंचावर पदार्पण केलं आहे, ज्याचं नाव आहे ‘अंधे जहाँ के अंधे रास्ते’!
‘उन्मुक्त कलाविष्कार’च्या सहकार्याने, अस्तित्व संस्था, ठाणे रंगभूमीवर प्रस्तुत करत आहे उर्मी लिखित व दिग्दर्शित ‘अंधे जहाँ के अंधे रास्ते‘ हे नवंकोरं नाटक. हे नाटक मॅनहोलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वास्तवाची कथा सांगतं. या नाटकाच्या नेपथ्याची धुरा अमित इंदूलकर यांनी सांभाळली आहे तर नाटकाची प्रकाशयोजना सौरभ शेठ यांनी केली आहे. त्याचबरोबर, कौशल म्हात्रे यांनी या नाटकाला संगीत दिले आहे तर सुनील मेस्त्री यांनी रंगभूषेची बाजू सांभाळली आहे.
या नाटकात एकूण १३ सहभागी कलाकार आहेत. संतोष जाधव, अंकुर घाटगे, प्रथमेश पवार, साहिल मावंलकर, तन्मय धामणे, अभिनय सावंत, आयुष भोसले, संकेत बागल, तपस्वी विभूते, नम्रता कणसे, रुजुता साटम, स्वाती माळी आणि श्रेया व्यवहारे हे कलाकार या नाटकाचा भाग आहेत. १२ जून, २०२२ रोजी गडकरी रंगायतन, ठाणे, येथे सकाळी ११ वाजता या नाटकाचा प्रयोग पार पडणार आहे.
‘अंधे जहाँ के अंधे रास्ते’ हे दोन अंकी नाटक एका सत्यघटनेवर आधारित आहे. शहरातल्या घाणीत रुतलेल्या, संकेत, त्याची मुलगी सोनारी, त्याचा मित्र गणपत, गणपतचा मुलगा जग्गू, व संकेतचे सहकारी… राजू, बेला, सुलोचनाबाई, नामदेव आणि पक्या, या कर्मचाऱ्यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारं हे नाटक आहे. मुंबई तुंबू नये म्हणून पालिकेचे अधिकारी सिव्हरेज आणि नाले सफाईच्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट एका कॉन्ट्रॅक्टरला सुपूर्त करतात व हे कॉन्ट्रॅक्टर मॅनहोल साफ करणाऱ्यांना पगार देतात. अर्थातच, पगार पुरेसा नसतोच व त्यांना आरोग्य सेवादेखील हवी तशी मिळत नाही. मॅनहोल साफ करणे अतिशय घाणीचे काम असूनसुद्धा काही समाजातली माणसं पिढ्यानपिढ्या हेच काम करत असतात. जातीमुळे व शिक्षणाच्या अभावामुळे त्यांना समाजात मानाचे स्थान मिळत नाही.
या अशा परिस्थितीमुळे, त्यांच्या घरात व वैवाहिक जीवनात उद्भवणाऱ्या अनेक अडचणी आपल्याला या नाटकात अनुभवायला मिळतात. त्यांची दुःखं, त्यांच्या व्यथा, त्यांचं रोगट आणि नशेबाज जगणं निर्ढावलेल्या समाजाला या नाटकाद्वारे अनेक प्रश्न विचारतं. मॅनहोल साफ करण्यासारखे महत्वाचे काम त्या कर्मचाऱ्यांनी केले नाही तर मुंबईचे काय होईल? त्यांचे काम एवढे महत्वाचे व कष्टाचे असूनसुद्धा आपला समाज त्यांना महत्व का देत नाही? त्यांच्या परिवाराची व त्यांच्या स्वास्थ्याची अशी दैना का होते आणि या दुर्दैवी परिस्थितीकडे समाजाने जर दुर्लक्ष केलं तर समाजावर त्याचे काय परिणाम होतील ? असे बरेच महत्वाचे प्रश्न विचारणारं हे नाटक आहे.
प्रायोगिक नाट्यकर्मी व विद्यार्थ्यांना या नाटकाच्या तिकिटावर २०% विशेष सवलत देण्यात येणार आहे. या नाटकाची तिकिटं पेटीएम इन्सायडर किंवा तिकीट खिडकीवर बुक करु शकता.
हे नाटक एक वेगळा विषय घेऊन आलं आहे. तेव्हा वर्षानुवर्षे अंधःकारात राहिलेल्या या मॅनहोल सफाई कर्मचाऱ्यांची कथा प्रेक्षकांनी आपल्या डोळ्याने पहावी व या नाटकाला भरगोस प्रतिसाद द्यावा.
प्रयोगासाठी संपर्क — ९१३७४८३१९५/८४०७९८१८१६