नाटक यशस्वी होतं तेव्हा त्या यशासाठी नाटकाच्या टीममधील प्रत्येक सदस्य आणि त्यांचे अविरत प्रामाणिक प्रयत्न कारणीभूत असतात. अशी नाटकं पुन्हा पुन्हा बघूनही कंटाळा येत नाही. ती प्रत्येक वेळी तितकीच रंजक वाटतात. असंच एक सुंदर नाटक म्हणजे ‘अनन्या’! रसिक प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे हे नाटक पुन्हा तुमच्या भेटीस येत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या नाटकाचा ३०० वा प्रयोगही लवकरच सादर होणार आहे.
दिग्दर्शक प्रताप फड यांनी अनन्याच्या व्यक्तिरेखेवर, तिच्या आयुष्यातील चढ उतारांवर केलेला खोल अभ्यास या नाटकाला अधिकाधिक परिपूर्णतेकडे घेऊन जातो. ऋतुजा बागवे या गुणी अभिनेत्रीने त्यांना अचूक साथ देत तिच्या चोख अभिनयातून अतिशय जिवंतपणे अनन्या आपल्यासमोर उभी केली आहे.
सर्वसाधारण आयुष्य जगलेली परंतु खूप शिकून बाबांची स्वप्नं पूर्ण करू इच्छिणारी अशी अनन्या. तिच्यासोबत एके दिवशी असं काही घडतं की तिचं आयुष्य विस्कटून जातं. मग त्या दु:खद काळातून ती स्वतःला बाहेर काढू शकते का? पुढे तिचं काय होतं? तिच्या आयुष्याची घडी पुन्हा नीट बसते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हे नाटक नक्की बघा! आपण आपल्याला नैसर्गिकरीत्या मिळालेल्या गोष्टींना किती ग्राह्य धरतो आणि आपली खरी मानसिक व शारिरीक पोच किती आहे हे जाणून घेण्यासाठी ‘अनन्या‘ला एकदा भेट द्याच!