हटके विषय निवडून रंगभूमीवर बराच काळ अधिराज्य गाजवणारी नाटकं तशी क्वचितच! त्यातही ‘fantasy’ वर आधारित नाटकं त्याहूनही कमी. असंच एक नाटक १३ ऑगस्ट, २०१६ रोजी, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे पहिल्यांदा रंगभूमीवर अवतरलं. हे नाटक म्हणजे सुबक निर्मित, मनस्विनी लता रवींद्र लिखित व निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित, ‘अमर फोटो स्टुडिओ’! गुणी कलाकारांची खुमासदार पंगत असलेलं आणि प्रेक्षकांच्या मनात आजवर स्थान करुन राहिलेल्या या नाटकाने लॉकडाऊनच्या आधी २५० पेक्षा जास्त प्रयोगांचा टप्पा पार केला. लॉकडाऊनमुळे पडद्याआड गेलेलं हे नाटक येत्या ७ जानेवारी २०२३ पासून रंगभूमीवर पुनरागमन करत आहे. हे या नाटकाचे शेवटचे आणि मोजके प्रयोग असल्याचे नाटकातील कलाकारंद्वारे सांगण्यात येत आहे. या संधीचा जास्तीत जास्त नाट्यप्रेमींनी आस्वाद घ्यावा.
२०१५ साली मराठी वाहिनीवरील दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतले प्रसिद्ध चेहरे या नाटकात असल्यामुळे, या नाटकाबद्दलची उत्सुकता रंगमंचावर येण्यापूर्वीच शिगेला पोहोचली होती. नाटकाची कथा ही आगळीवेगळी व अतिशय सुंदररीत्या मांडली असल्याने, नाटकाचे सगळे प्रयोग प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात पार पडले.
प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो. बरेचदा आपल्या वर्तमानकाळावर भूतकाळाचे पडसाद उमटताना दिसतात आणि भूतकाळातील काही कटू क्षण आपल्या भविष्यकाळात आडकाठी आणतील ह्याची काळजी आपल्याला सतत वाटत राहते. पण काळाचं चक्र चालत राहतं. आपलं रोजचं जगणं ‘रूटीन’ होऊन जातं. आयुष्याचा कंटाळा येऊ लागतो. अशातच अचानक असं काहीतरी घडतं ज्याने आपण पुन्हा भूतकाळात हरवतो. आणि त्या भूतकाळात आपल्याला स्वतःचा वर्तमान सापडतो. ही अशीच काहीशी काळाची जादू दाखवणारी कथा आहे ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाची!
या नाटकात सुव्रत जोशी, ‘अपूर्व’ किंवा ‘अपू’ ह्या २७ वर्षीय तरुणाची भूमिका साकारत आहे. त्याच्या गर्लफ्रेंडचे पात्र ‘तनू’ हे सखी गोखले साकारत होती, सखीला उच्चशिक्षणासाठी लंडनला जावे लागल्याकरणाने तिची व्यक्तिरेखा पर्ण पेठे साकारत होती. सुबक संस्थेचे प्रमुख आणि आपले लाडके कलाकार सुनील बर्वे यांनी नव्याने सुरू होणाऱ्या प्रयोगांमध्ये ही व्यक्तिरेखा पर्ण पेठे आणि सखी गोखले आलटून पालटून साकारणार असल्याचे सांगितले आहे.
त्याचबरोबर, सखी गोखले यांनीही पुन्हा नाटकाचा भाग होता येत असल्याबद्दल उत्सुकता आणि आनंद व्यक्त केला आहे.
अमेय वाघ या नाटकात बहुरंगी भूमिका कौशल्याने साकारताना दिसतो. पूजा ठोंबरे ही ‘चंद्रिका’ या विसाव्या शतकातल्या अभिनेत्रीचे पात्र व अजून दोन भूमिकांमध्ये आपल्याला दिसून येते. सिद्धेश पुरकर याने गाजवलेले केशव दाते हे पात्र आता साईनाथ गणुवाड साकारत आहे.
नव्या वर्षाचे स्वागत करत नाट्यरसिक या नाटकाचेही तितक्याच जोशात स्वागत करतील याबद्दल शंकाच नाही. तुम्हीही ‘अमर फोटो स्टुडिओ’ला लवकरात लवकर भेट द्या. कारण, या नाटकाच्या प्रवासातील हे काही शेवटचे प्रयोग असणार आहेत. रंगभूमी.com कडून ‘अमर फोटो स्टुडिओ’ च्या पुनरागमनप्रीत्यर्थ संपूर्ण टीमला भरपूर शुभेच्छा!