जागतिक पातळीवर क्रीडा, कला क्षेत्रातील निरनिराळ्या आणि अविस्मरणीय प्रसंगांची नोंद होत असते. एखादी व्यक्ती किंवा संस्था विश्वविक्रम रचते आणि त्यापुढील पिढी ते विश्वविक्रम मोडून नवीन विश्वविक्रम रचतात. मराठी नाट्य सृष्टीतही १५ ऑगस्ट २०२४ रोजी ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक नवीन विश्वविक्रम रचणार आहे.
Albatya Galbatya’s World Record: 6 Shows in a Single Day
१२ मे २०१८ रोजी ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक रंगभूमीवर दाखल झालं आणि अमाप लोकप्रियता कमवत सहा वर्षे धूमधडाक्यात गाजलं. झी मराठी प्रस्तुत आणि अद्वैत थिएटर निर्मित या यशस्वी बालनाट्याने १५ ऑगस्ट २०१८ रोजी दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात एकाच दिवशी सलग ५ प्रयोग सादर करून विश्वविक्रम रचला होता. आज तब्बल सहा वर्षांनंतर, १५ ऑगस्ट २०२४ रोजी ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाची टीम स्वत:चाच विश्वविक्रम मोडत परत श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात एकाच दिवशी ६ प्रयोग सलग सादर करून नवीन विक्रम रचणार आहे (Albatya Galbatya Marathi Natak to exhibit 6 shows in a single day and attempt world record).
‘अलबत्या गलबत्या’ची यशस्वी घोडदौड
५० वर्षापूर्वी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर चेटकीणीच्या भूमिकेत असताना ह्या नाटकाचे ४०० प्रयोग झाले होते. ३६५ दिवसात ३३३ प्रयोग तेही हाऊसफुल्ल!!! अशा अनेक विक्रमांना गवसणी घालत या बालनाट्याची घौडदौड आजवर यशस्वीरीत्या सुरू आहे. कोविडचा काळ सोडल्यास ६ वर्षात ८०० प्रयोगांचा टप्पा या नाटकाने पार केला आहे आणि विक्रमी १००० व्या प्रयोगाकडे वाटचाल सुरू आहे . झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०१९ मध्ये या नाटकाला ४ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट पुनर्जीवित नाटक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रद्धा हांडे आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर. तसंच, सांस्कृतिक कलादर्पणचा ‘सर्वोत्कृष्ट फेस ऑफ द इअर’ पुरस्कार अलबत्या गलबत्या बालनाट्यातील कन्याराजे ही भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रद्धा हांडे यांना मिळाला. २०२१ साली जागतिक टपालदिनाचे औचित्य साधून भारतीय टपाल विभागाने नाटकाचे निर्माते राहुल भंडारे यांचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट जाहीर करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
सलग ६ प्रयोगांसाठी कलाकारांची जोरदार तयारी सुरू!
स्वातंत्र्यदिनी सादर होणाऱ्या सलग सहा प्रयोगांसाठी भरपूर मेहनत घेत आहेत. कलाकार व संपूर्ण टीम डायटिशियनच्या सल्ल्याने आहार घेत असून ६ प्रयोग डॉक्टरांची उपस्थिती असणार आहे. तसेच या ऐतिहासिक क्षणी अनेक कलाकार मान्यवर आणि राजकीय प्रतिनिधींची उपस्थिती लाभणार आहे.
सलग ६ प्रयोगांचं वेळापत्रक (१५ ऑगस्ट, २०२४, श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर)
- स. ७:१५ वा. ते ९:३० वा.
- स. ९:४५ वा. ते ११:३० वा.
- दु. १२:०० वा. ते २:३० वा.
- दु. ३:०० वा. ते ५:०० वा.
- सायं. ५:३० वा. ते ७:३० वा.
- रात्रौ ८:०० वा. ते १०:३० वा.
प्रयोगासाठी संपर्क : 98208 76889 | तिकीट विक्री BookMyShow वर सुरू आहे.
दोन तास मुलांना मोबाईल, टीव्ही, व्हिडीओ गेमपासून लांब ठेवा आणि खदखदून हसविण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी ‘अलबत्या गलबत्या’च्या संपूर्ण टीमला भेट द्या.