आपण सर्वांनी रत्नाकर मतकरी ह्यांच्या गूढ कथा वाचल्या असतीलच. मराठी साहित्यात मतकरी आणि गूढ ह्यांना समानार्थी मानले जाते. मत्करींच्या ह्याच गूढ कथा जर रंगभूमी वर अवतरल्या तर? कथांचे नाट्यरुपांतर बघायला काय मज्जा येईल ना! हीच अनोखी कल्पना तुमच्या समोर घेऊन येत आहेत ‘फॅक्टरी मंडळ‘ प्रस्तुत ‘अकल्पित — एक रहस्यमय नाट्यदर्शन‘.
रत्नाकर मतकरी ह्यांच्या ‘हार‘ आणि ‘बाबल्या रावळाचा पेटारा‘ ह्या दोन गूढ व लघु कथांचे रूपांतर दीर्घांकी नाटकात करण्यात आले आहे. पहिल्या अंकात हार ह्या कथेचे सादरीकरण होईल व मध्यंतरानंतर दुसऱ्या अंकात बाबल्या रावळाचा पेटारा याचे सादरीकरण होण्यात येईल.
योगेश उतेकर दिग्दर्शित ‘हार’
आपलं कुटुंब म्हणजे आपल्या जिव्हाळ्याचा विषय. पण ह्याच कुटुंबात अचानक नात्यांना छेद देणारी एखादी घटना घडली तर? घरातल्या वातावरणात बदल होईल का? घरात वादविवाद होतील का? अगदी घट्ट नात्या संबंधात दरार पडेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे म्हणजेच अकल्पित मधली हार ही गूढ कथा. हार ही एक कौटुंबिक मनोरंजक कथा असून या कथेत आई, आप्पा, चार भाऊ, त्यांच्या पत्नी व एक बहीण अशी पात्रे आहेत. अभिषेक साळवी, आदित्य कदम, प्रकाश सावळे, तुषार माने, दीप्ती दांडेकर, चेतना तिवरेकर, अपूर्वा बावकर, पूजा पोवळे, भाग्यश्री इथापे, दीक्षा शिंदे, अक्षय कुडव, अनिकेत वंजारे आणि सिद्धेश म्हस्कर हे योगेश उतेकर दिग्दर्शित ‘हार’ ह्या नाटकामधील कलाकार आहेत.
अभिषेक साळवी दिग्दर्शित ‘बाबल्या रावळाचा पेटारा’
मातृत्व ही स्त्रीला निसर्गाकडून मिळालेली सगळ्यात मोठी देणगी आहे. पण ज्या स्त्रिया वंचित राहतात त्यांना समाजाच्या अवहेलनांना सामोरं जावं लागतं. मातृत्वाशिवाय स्त्रीला समाज परिपूर्ण स्त्रीचा दर्जाच देत नाही. स्त्रीच्या मातृत्वाभोवती समाजाने घातलेलं हे गूढवलय म्हणजेच ‘अकल्पित’ मधील बाबल्या रावळाचा पेटारा ही कथा. बाबल्या रावळाचा पेटारा ही एका गावाची गोष्ट आहे. अभिषेक साळवी, आदित्य कदम, दीप्ती दांडेकर,भाग्यश्री इथापे, अक्षय कुडव, यश जादव, योगेश उतेकर हे योगेश उतेकर व अभिषेक साळवी दिग्दर्शित ‘बाबल्या रावळाचा पेटारा’ ह्या नाटकातले कलाकार आहेत.
दोन्ही कथा कोकणात वसलेल्या असल्यामुळे संपूर्ण नाटकात मालवणी भाषेचा प्रयोग आहे. ज्यांनी रत्नाकर मतकरी यांच्या कथा वाचल्या असतील त्यांना हे नाटक बघताना एक सुंदर अनुभव मिळेल कारण आम्ही दोन्ही कथा त्यांच्या लकबीत सादर करणार आहोत. लेखन पूर्णतः रत्नाकर मतकरींचे असल्यामुळे आम्ही त्यांच्याच भाषा शैलीचा उपयोग केला आहे. व ज्यांनी या कथा वाचल्या नसतील, त्यांना एक वेगळा अनुभव मिळेल. रत्नाकर मतकरी ह्यांच्या विषयी अजून माहिती कळेल व त्यांच्या लिखाणाविषयी ओढ वाटेल असे अकल्पितच्या टीमला वाटते.
अकल्पित — एक रहस्यमय नाट्यदर्शन
कै. बाळासाहेब ठाकरे स्मारक, तीन हाथ नाका, ठाणे (पश्चिम) येथे, २५ डिसेंबर रोजी, अकल्पित ह्या नाटकाचा प्रयोग, सायंकाळी ६ वाजता ओपन थियेटर मध्ये पार पडला. त्यापुढील प्रयोग शुक्रवार ७ जानेवारी २०२२ रोजी, सायंकाळी ७ वाजता, RDX studios (ठाणे) येथे सादर झाला.
पुढील प्रयोग (Upcoming Shows)
अधिकाधिक प्रेक्षकांनी ह्याचा लाभ घ्यावा ही नाटकाच्या टीमची अपेक्षा आहे. तेव्हा नक्की जाऊन पहा, ‘अकल्पित – एक रहस्यमय नाट्यदर्शन‘.