‘अडोस पडोस — चित्र नाट्य खेळ’ हा एक विलक्षण कमालीचा प्रयोग १५ सप्टेंबरला पुण्याच्या झपुर्झा आर्ट म्युझियममध्ये झाला. ‘चित्र नाट्य खेळ’ असं याकरिता कारण यात चित्र, नाटक दोन्ही आहेत आणि हा खरच वेगवेगळ्या जागी एखाद्या खेळासारखा खेळला जातो. हा प्रयोग विलक्षण होता तो यासाठी कारण यातून आपल्याला स्थिर चित्रांमधला किवा स्थिर फोटोज मधला अर्थ कळू लागतो. आपण फोटोज कडे जास्त जिव्हाळ्याने बघू लागतो.
इंद्रजीत खांबे हे भयंकर कल्पना शक्ती असलेले नव्या पिढीतले फॉटोग्राफर आहेत. ते मोबाईल, कॅमेरा अगदी सर्व माध्यमांचा वापर करून फोटोग्राफी करत असतात. त्यांच्या फोटोजचे विषयसुद्धा मजेशीर असतात. आपल्या रोजच्या आयुष्यातले, घरात त्यांच्या मुलांचे, आपल्या संस्कृतीतल्या वेगवेगळ्या गोष्टींचे पदर आपल्याला त्यांच्या फोटोज मधून बघायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून उमेश कुलकर्णी यांनी curate केलेलं इंद्रजीत खांबे यांच्या फोटोंचं प्रदर्शन झपूर्झाला सुरू आहे. १५ सप्टेंबरला ‘अडोसपडोस’ या अनोख्या नाटकाचं आयोजन या प्रदर्शनातच करण्यात आलं. नक्की हा प्रयोग होता काय, तर स्थिर फोटोंच्या मागचं नाट्य प्रेक्षकांपर्यन्त पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता. जो प्रेक्षकांना प्रचंड आवडला.
कोकणातल्या मच्छी मार्केटमधल्या एकमेकींशी भांडणाऱ्या स्त्रिया, तलावात खेळणारी भाऊ बहीण, दशावताराची तयारी करणारे कलाकार, हम्पीच्या गुफांमध्ये खेळणारी मुलं, आपल्या अंगावर लावलेला रंग वाळवत असणारा सिंह, दगडांच्या गुहेत घुमणारा आवाज ऐकणारी मुलगी असे कितीतरी फोटोज आपल्या समोर जीवंत होतात आणि बोलू लागतात. प्रत्येक फोटोसमोर संबंधित नाट्यछटा सादर होतात, ज्यातून स्थिर फोटोजच्या मागची बोलकी गंमत बाहेर येते आणि प्रेक्षकाला फोटो बघण्याची एक नवीन नजर देऊन जाते.
कोणत्याही मोठ्या सेटशिवाय फक्त पात्रांच्या माध्यमातून प्रेक्षकांना कोकणात घेऊन जाण्यात कलाकार यशस्वी होतात. यातील प्रकाशयोजना सुद्धा फार मजेशीर आहे. या नाटकात प्रेक्षकाना त्यांची जागा बदलत जावं लागतं वेगवेगळे कलाकार त्यांच्या जागी असतात. जणू काही आपण त्यांच्या जगात जात असल्याचा अनुभव आपल्याला येतो आणि आपल्यासमोर उभं राहतो तो खांबेंच्या फोटोमधला मजेशीर नाट्य अनुभव!
हे नाटक अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केले असून प्रदीप वैद्य यांनी प्रकाशयोजना केली आहे. नाटकाला लाईव्ह म्युझिक संकेत कानेटकर, निरंजन यांनी केले आहे. आणि ज्या कलाकारांच्या माध्यमातून आपल्यासमोर फोटोज जिवंत होतात ते म्हणजे अनिता दाते, अश्विनी कासार, अभिलाषा, अभय महाजन, श्रीकांत प्रभाकर, धनंजय सरदेशपांडे, स्वप्नील पंडित, गौरी देशपांडे, कृतार्थ शेवगावकर, प्रशांत कांबळे, साहिल काल्लोळी, सृजन नीला हरीहर, अजिंक्य भोसले, राहुल लामखेडे, अरुण कदम.
1 Comment
Thank you