नाटक या साहित्यप्रकाराची सुंदरता शब्दात मांडणं अगदी अवघड. नाटक पाहण्याची जी पूर्ण प्रक्रिया असते, म्हणजे सर्वप्रथम पडदे उघडण्याची आतुरता, तिसरी घंटा वाजल्यावर वाढलेली उत्सुकता, पडदा उघडताच, ‘रंगदेवता व रसिकप्रेक्षक’ ही सूचना ऐकतानाचा वाढलेला उत्साह, हा संपूर्ण अनुभव अगदी अवर्णनीय असतो. एका काळोख्या नाट्यगृहात बसून अनेक कथा, देश, भाषा व भावना प्रेक्षक अनुभवू शकतात. नाटक म्हणजे नाट्यरसिकांची खरी मेजवानी. पण नाटकाची अलौकिकता आणि वेगळेपण ह्याची खरी जाणीव फक्त नाट्यदर्दींना असते. साचेबद्ध आयुष्य आणि काटेकोर जीवन जगणाऱ्यांना नाटकाची मजा काय उमगणार? पण, नाटकाचा न ही कळत नसलेल्या व आकड्यांच्या जगात रमणाऱ्या व्यक्तीला नाटकाचे महत्व व सौन्दर्य समजावणे हा एखाद्या नाट्यदर्दीसाठी जीवन मरणाचा प्रश्न ठरत असेल तर? ‘स्विस कॉन्सुलेट जेनरल इन मुंबई’ आणि ‘ग्योथं-इन्स्टिट्युट मॅक्स म्युलर भवन पुणे’ यांच्या सहयोगाने ‘नाटक कंपनी‘ ही अशीच काहीशी अनोखी कथा ‘अडलंय का…?’ या नाटकाद्वारे ११ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे.
निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘अडलंय का…?’ हे नाटक ‘दी बेसेटझुंग‘ (The Occupation) ह्या जर्मन नाटकावर आधारित आहे. या नाटकाचे मूळ लेखन हे अतिशय नावाजलेले व मानलेले जर्मन नाट्यलेखक चार्ल्स लेविन्स्की यांचे असून त्याचे भाशांतर शौनक चांदोरकर यांचे आहे.
नाटकात अतुल पेठे व पर्ण पेठे ही पितापुत्रीची जोडी आपल्याला मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहे. या गुणी कलाकारांच्या अभिनयाने संपन्न अशी ही नाट्य कलाकृती प्रेक्षकांसाठी नक्कीच एक सुखद पर्वणी ठरणार आहे.
अल्ब्रेक्ट हा एका जुन्या नाट्यगृहाशी सहयोगी असलेल्या कलाकारांच्या नाट्यमंडळाचा भाग असतो व त्याला मंडळाचे बजेट कापण्याचा विचार चालू असल्याची बातमी समजते. अल्ब्रेक्ट हा हाडाचा नाट्य कलाकार. हा रिपोर्ट ज्या व्यवस्थापन कंपनीने बनवला असतो त्या कंपनीच्या एका व्यक्तीला बिजनेस डीलची आशा दाखवून, त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मत बदलण्याची तो पूर्ण तयारी करतो. पण समोर येते एक २० वर्षांची तरुणी, जिला नाटकात काडीमात्र रस नसतो. त्याला जाणवतं की आकड्यांवर प्रेम असलेल्या व्यक्तीला त्याला साहित्याचे सौंदर्य समजवावे लागणार आहे. अर्थातच, हे काम त्याला वाटते तितके सोपे असणार नसते. त्यांच्या संवादामधून जाणवणारी विचारांची व आवडीमधली तफावत आणि त्यांच्या ध्रुवीय विरोधी भूमिकांमागचे कारण जाणून घेण्याचा प्रवास म्हणजेच ‘अडलंय का…?’ हे नाटक!
नाटकाचा शुभारंभाचे प्रयोग ११, १२ व १३ जानेवारी २०२२ रोजी पुण्यातील ‘भारत नाट्य मंदिर’ येथे सायंकाळी ६.३० वाजता पार पडतील. तर रसिकप्रेक्षकांनी अगदी आवर्जून या नाटकाचा स्वाद घ्यावा.
Adlay Ka Marathi Natak Upcoming Shows
तुम्ही तिकिटे BookMyShow वर बुक करू शकता.
अशाच नवीन नाटकांबद्दल जाणून घेण्यासाठी आम्हाला Facebook, Instagram व Twitter वर फॉलो करा.