‘मन’ हे माणसाच्या शरीरातील कोणतेही अवयव अथवा इंद्रिय नसून, ‘मन’ म्हणजे आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा आणि विलक्षण शक्ती असलेला प्रमुख घटक आहे, असे आपल्याला सतत जाणवत राहते. “मनाने जर एखादा निश्चय केला तर माणूस जगात काहीही साध्य करू शकतो!”, असे आपण कित्येकदा म्हणतो. मनातील संवेदनांचे प्रतिबिंब माणसाच्या वागण्या-बोलण्यात उमटत असतात. माणसाचे व्यक्तिमत्त्व हे त्याच्या मनाच्या रचनेवर अवलंबून असते. मात्र ‘मन’ हीच जर समस्या असेल तर काय असेल त्या समस्येचे निराकरण? हाच प्रश्न घेऊन, अभिनय कल्याण निर्मित, विजयलता प्रोडक्शन प्रस्तुत, NCPA सादर करीत आहेत चं. प्र. देशपांडे लिखित, अभिजीत झुंजारराव दिग्दर्शित एकपात्री मराठी नाटक ‘मन’!
चं. प्र. देशपांडे यांनी मनाच्या विविध छटा व त्यातून येणारे विचारांचे डोंगर हे त्यांच्या लिखाणातून नाटकाच्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर मांडले आहेत. ‘मन’ हा दीर्घांक असून त्याचे वैशिष्ट्य असे की हे एक सलग कथानक स्वरूपात मांडलेले नाही. हे नाटक म्हणजे एका सर्वसामान्य कारकुनाच्या असंख्य गोंधळांनी भरलेले, ओसंडून वाहणाऱ्या मनाची गोष्ट आहे, असे म्हणता येईल. नाटकातील नायक ‘नीलकंठ’च्या भोवती हे नाटक फिरते. नीलकंठ याच्या कंपनीतील युनियन फुटून तिचे दोन गट तयार झाले आहेत. आणि आता दोन्ही बाजूंचे लोक कर्मचाऱ्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत नीलकंठ हा प्रचंड गोंधळून गेलेला असून त्याच्या मनात अनेक प्रश्न घर करून बसलेत. एकाच वेळी त्याच्या मनात भूतकाळ, आशा, स्वप्ने, राग, संताप, हे सर्व भाव उमटू लागलेत. ‘आपल्याला जे मन मिळालेले आहे ते घेऊनच आपल्याला जगावे लागणार’ हे त्याला कळून चुकले आहे.
‘एका मनाचे रंगमंचावर अडवेतिडवे ओसंडत जाणे’ व ‘एक रोगी मन अनेक आकारांतून दिसत राहणे’, म्हणजे हे नाटक आहे. ‘मन हीच जर समस्या असेल तर काय असेल तिचे निराकरण ?’ व या प्रश्नाचे ‘मानसिक उत्तर कोण देणार? आणि देऊन काय उपयोग आहे?’ अशा प्रश्नांवर येऊन हे एकपात्री नाटक रसिक प्रेक्षकांच्या मनात भिडणार आहे.
Mann Marathi Natak • Info & Shows Schedule
Mann is a new Marathi natak written by C. P. Deshpande and directed by Abhijeet Zunjarrao. It is produced by Abhinay Kalyan and presented by Vijaylata Production. It stars Ramesh Wani as the sole character in the play.
‘मन’ या एकपात्री नाटकाचे दिग्दर्शक अभिजीत झुंझारराव यांचे मनोगत
“मन ही एक अजब जादुई भूमी आहे!” ‘मन म्हणजे नेमकं काय?’ ‘हे मन कुठे असतं?’ ‘नेमकं कसं घडत ते?’ ‘काय असतं मनात?’ ‘काय चालतं मनात?’ ‘कसं राखायच हे मन?’ ‘कसं रोखायच औदासीन्य व अतीव आनंद?’ ‘मनाचा आणि व्यक्तीच्या स्वभावाचा काय संबंध?’ ‘कसा जडतो संबंध व्यक्तीच्या मनाचा?’ ‘समाजमानसाचा आणि मनाचा एकमेकांवर काय परिणाम होतो?’ बघाना आता इतके प्रश्न पडतायत ते नेमके कुठे पडतायत? मन ह्या संकल्पनेने अनेक शतके मानवसमूहाला भुरळ घातली आहे. ‘प्रत्यक्षात माणसाचे मन नावाची ही गोष्ट असते की नाही ?’ इथपासून ते ‘माणसाचे मन कसे कार्य करते ?’ इथपर्यंत असंख्य प्रश्न आपल्याला पडतात. पण हा झाला मनाच्या शोधाचा भाग. पण खरा शोध तर पुढेच आहे.
नाटकाबद्दल बोलायचं झालं तर मानवी मनाची व्याप्ती, त्याचे आरोह अवरोह आणि त्याची चिकित्साकात्मक पातळीवरती जी आंदोलने चं. प्र. यांनी उभी केली आहेत ती पकडणं आणि ती सादरीकरणामधून उभी करणं हे आम्हा सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. चं. प्र. देशपांडे यांचं लिखाण नेहमीच चॅलेंजिंग वाटत आलेलं आहे. हे ही नाटक फारच वेगळ्या पद्धतीने पार पडतं.
बऱ्याच वर्षानंतर सकस एकपात्री नाटक आलं आहे व तेही इतक्या चांगल्या पद्धतीने लिहिलेलं. चं. प्र. देशपांडे हे एक उत्तम नाटककार आहेत. त्यांची बरीचशी नाटकं यापूर्वी सुद्धा मी केलेली आहेत. आत्ताच्या काळात इतक्या छान पद्धतीचे डिटेलिंग करून काम करणारे नट सुद्धा मिळत नाहीत. रमेश वाणी यांचे मनापासून आभार की त्यांनी हे शिव धनुष्य पेलवायच ठरवलं.
याच बरोबर मी एन.सी.पीए चे सुद्धा आभार मानतो की अशा पद्धतीच्या नाटकाला एन.सी.पीए ने ज्या पद्धतीने हात दिला आहे तो फार महत्त्वाचा आहे. आणि एन.सी.पीए अशा पद्धतीच्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग करू शकतो.
‘मन’ या एकपात्री नाटकाची निर्मिती
‘मन’ हे नाटक, अभिनय, कल्याण निर्मित, विजयलता प्रोडक्शन यांच्या तर्फे प्रस्तुत असून, NCPA हे नाटक सादर करीत आहे. विजय चौगुले हे या नाटकाचे निर्माते आहेत.
या नाटकाचं नेपथ्य सुमित पाटील यांनी केले आहे. प्रकाश योजना श्याम चव्हाण व संगीत कृष्णा – देवा यांनी केले आहे. तसेच वेषभूषा तृप्ती झुंजारराव यांनी केली आहे आणि रंगभूषा उल्लेश खंदारे यांनी केली आहे.
See Also:
- अभिनय कल्याण आयोजित “नाट्यछटा दिवाकरांच्या” १५ ऑगस्ट पासून!
- साम्राज्यम् — अभिनय, कल्याण संचालित ‘अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ प्रथम वर्गातील विद्यार्थ्यांचे नवे नाटक!
- अभिनय, कल्याण आयोजित अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम — अभिनयाचे शास्त्रीय शिक्षण
जाहिरात संकल्पना ही प्रतिकेश मोरे यांची असून सोशल मीडिया प्रमोशन हे ऍब्स्ट्रक्ट डिजिटल यांचे आहे. विशेष आभार म्हणून, एल. डी. सोनावणे कॉलेज, कल्याण, मनाली राजेश्री, ओमकार जाधव, स्वागत पोवार. आणि या एकपात्री दीर्घांकामध्ये प्रमुख भूमिका साकारणारे कलाकार रमेश वाणी आहेत.
असंख्य भावनांनी आपल्या रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करण्यासाठी, अभिजीत झुंजारराव दिग्दर्शित ‘मन’ हे एकपात्री मराठी नाटक रंगभूमीवर आपल्या भेटीला आलेलं आहे. तर ते पाहायला अजिबात विसरू नका.