प्रपंच म्हटलं की त्यात नवरा-बायकोची एकमेकांना साथ, वेळप्रसंगी तडजोड, काळाशी अनुरूप वागणं असं सगळंच आलं आणि हे सगळं जुळून येण्यासाठी गरजेच असतो तो ‘समतोल’! संसाराचा जीवनगाडा नीट चालवायचा तर पती आणि पत्नी ही त्याची दोन चाकं व्यवस्थित, लयीत चालली पाहिजेत. त्यांची वेळो वेळी देखभाल करायला हवी, त्यांना तेलपाणी-वंगण द्यावं लागतं. एक चाक जरी कुरकूरू लागलं की संसाराचं संगीत बेसूर होतं. गाडा नीट चालत नाही. हा प्रश्न सुखी, समाधानी जीवनासाठी सर्वात महत्वाचा आणि मोठा! हाच समतोल मांडणारं एक नाटक प्रख्यात दिग्दर्शक व अभिनेते अभिजीत झुंजारराव आपल्या भेटीस घेऊन आले आहेत. नाटकाचं नाव आहे ‘ए, आपण चहा घ्यायचा?’!
सध्या या नाटकाचा कोकण दौरा सुरू आहे.
बहुगुणी रंगकर्मी अभिजीत झुंजारराव यांच्याशी गप्पा येथे ऐका.
पुढील प्रयोग
३ मार्च, २०२२ रोजी, रात्रौ ९ वाजता (प्रवेश विनामूल्य)
तात्या भिडे सभागृह, अ. कृ. केळकर हायस्कूल, वाडा देवगड
५ मार्च, २०२२ रोजी, सायंकाळी ७:३० वाजता (प्रवेशिका १००/- व २००/-)
वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान, कणकवली
पुढील प्रयोगांबद्दलही आम्ही आमच्या सोशिअल मीडियावर माहिती देतच राहू. त्यासाठी आमच्या Instagram अकाउंट आणि Facebook पेजला Follow करायला विसरु नका.
नाटकाबद्दल अधिक माहिती देताना नाटकाचे दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव सांगतात की, “प्रत्येक विवाहित जोडप्याचं छान प्रबोधन व्हावं, असं हे नाटक आहे. रवी – प्रभा आणि विजय – संगीता ही दोन जोडपी. यातील नवऱ्यांना पक्कं कळून चुकलंय की स्त्री ही खूपच अगम्य अशी गोष्ट आहे. तर त्यांच्या बायकांनाही वाटतं की नवरोबा म्हणजे एक गूढ आहे. हा सार्वत्रिक अनुभव लेखक चंद्रकांत प्रभाकर देशपांडे या नाटकात सांगतात. दिग्दर्शक म्हणून हा विषय समजून उमजून नेमका मांडायचा प्रयत्न केला आहे. आपापले प्रश्न एकमेकांना सांगताना एक हमाल रवीच्या घरात येतो. हमाल हे एक प्रतीक, तो लोकांची ओझी वाहणारा आणि त्यांचा त्रास कमी करणारा असा आहे. तो या दोन जोडप्यांना त्यांचा त्रास कमी होण्यासाठी काही सल्ले देतो आणि एक ‘यंत्र’ देतो. हे यंत्र म्हणजे एक वितभर लांबीची रिकामी पांढरी चौकट आहे, म्हणजे हे काही यंत्र नसून एक निर्वात पोकळी, त्यावर विश्वास ठेवायचा, असे हे निरर्थक समजावे असे एक रूपक आहे. अखेर दोन्ही जोडपी आपापली चूक स्वत: मान्य करतात, त्या पुन्हा होऊ नयेत याची दक्षता घेण्याचं ठरवतात आणि फर्मास कौटुंबिक तीन नंबरचा कडकमिठा चहा मस्त रंगत आणतो. रवी प्रेक्षकांशी थेट संवाद साधतो तो चहाबरोबर कुरकुरीत बिस्कीटासारखं आहे. त्यामुळे प्रेक्षक नाट्यकृतीशी सहज जोडले जातात. त्यांचेच मन कुरतडणारे प्रश्न आहेत, त्यामुळे रवी विजय, प्रभा संगीता आणि हमालाच्या संवादांना दाद मिळते. पाचही व्यक्तिरेखांचा अभिनय नैसर्गिक ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे विषय, सरळ सोपा सदर होतो. संसारी जीवन सुखाचं, आनंदाच व्हावं याची गुरुकिल्ली यातून मिळते, ती किल्ली जपून ठेवायची आणि तिने नेहमी आपल्या प्रश्नाचं कुलूप उघडायचं असं हे छान हलकं फुलकं पण जीवनस्पर्शी नाटक उभं रहातं. दिग्दर्शक म्हणून ते मजेमजेत पण गांभीर्याने वठावं असाच मानस आहे.”
चं. प्र. देशपांडे हे या नाटकाचे लेखक असून या नाटकात विकास तांबे, भाग्यश्री पाणे, नीलेश पवार, कांचन खानोलकर आणि राजेश करंजेकर हे गुणी कलाकार आपल्या भेटीस येणार आहेत. उत्कंठा वाढवणारं हे नवं-कोरं नाटक दिमाखात आपल्या भेटीसाठी सज्ज झालं आहे. त्यामुळे, जवळच्या नाट्यगृहात नाटकाचा प्रयोग असल्यास ती संधी सोडू नका.