अनेक नाटकांचे महोत्सव सुरू असताना अभिजात नाट्य संस्था प्रस्तुत करत आहे आगळा-वेगळा महोत्सव. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाट्य व संगीत क्षेत्रातील विविध मान्यवर दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत रंगणार आहे २४ तासांचा महामहोत्सव! ‘अभिजात’ नाट्यसंस्था या महोत्सवाचे आयोजन करत असून हा महोत्सव दोन सत्रात होणार आहे.
अभिजात नाट्य महोत्सव — महामहोत्सवाचे वेळापत्रक
अभिजात नाट्य महोत्सव — महामहोत्सवात सादर होणारी नाटकं
या महोत्सवात ‘टिळक आणि आगरकर‘ व ‘होय मी सावरकर बोलतोय!‘ यांचे सादरीकरण होणार आहे. या दोन ऐतिहासिक नाटकांच्यामध्ये मनोरंजन म्हणून ‘वासूची सासू‘ हे विनोदी नाटक सादर करण्यात येणार आहे. हा महोत्सव म्हणजे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कलाकारांची कसोटी असणार आहे.
टिळक आणि आगरकर
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या मैत्रीच्या मर्मबंधावर भाष्य करणारे हे नाटक. कै. विश्राम बेडेकर लिखित हे नाटक मराठी रंगभूमीवरील एक सुवर्णपान समजले जाते. टिळक आणि आगरकर यांच्यातील सुरुवातीची मैत्री आणि त्याचे वैमनस्यात झालेले रूपांतर, त्यातून पोळून निघालेले टिळक-आगरकरांचे कुटुंबीय आणि अर्थातच अवघा महाराष्ट्र, याचे सुरेख वर्णन बेडेकरांनी नाटकात चितारले आहे. तेव्हाचे राजकीय आणि सामाजिक विषय, विधवा विवाह, बालविवाह आणि स्वातंत्र्याचा प्रमुख प्रश्न हे सारं काही नाटकात रंगवलं आहे. तेव्हाची राजकीय आणि सामाजिक स्थिती आजही फारशी बदललेली नाही, त्यामुळे हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आणावं असं निर्मात्यांना वाटलं. नाटक दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने जतन केले असून अभिजात नाट्य महोत्सवातील या नाटकाचे हे शेवटचे प्रयोग आहेत. नाटकात (‘पद्मश्री’ प्राप्त) नयना आपटे, सुनिल जोशी, आकाश भडसावळे, संध्या म्हात्रे, गायत्री दीक्षित, प्राची सहस्रबुद्धे अशी प्रमुख नटमंडळी आहेत.
लोकमान्य टिळक आणि आगरकर यांचा किस्सा
डेक्कन कॉलेजमध्ये असतांना टिळकांची गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाली. आगरकरांकडे केसरीच्या संपादकपदाची धुरा टिळकांनी दिली होती. पण नंतर दोघांत बिनसले. टिळकांचे संस्थेतील एकंदर धोरणासंबंधी मतभेद झाले. आपल्या चाळीस पानी राजीनाम्यात टिळकांनी ‘निर्वाहापुरते वेतन’ या तत्त्वाऐवजी ‘सांपत्तिक स्थितीनुसार वेतन’ तसेच ‘राष्ट्रीय शिक्षण संस्थे’च्या उद्दिष्टाविरुद्ध ‘सरकारच्या मदतीवर चालणारी संस्था’ हे धोरण संस्थेच्या मूळ धोरणाला धक्के देणारे आहे, असे आग्रहाने सांगितले. या प्रश्नावर त्यांचा आगरकरांशी वाद झाला. याशिवाय दुसरा वाद “आधी कोण? राजकीय की सामाजिक?” या विषयावर झाला होता.
वासूची सासू
वासुची सासू हे फार्सिकल नाटक आहे. प्रासंगिक विनोदाने भरलेली ही एक मेजवानी आहे. या नाटकाचे दिग्दर्शन दुर्गेश मोहन यांनी केले असून नेपथ्य संदेश बेंद्रे, संगीत संकेत पाटील, प्रकाशयोजना मयुरेश मोडक आणि रंगभूषेची महत्वाची बाजू उलेश खंदारे सांभाळत आहेत. अभिजीत केळकर, मुकेश जाधव, आशा ज्ञाते, आकाश भडसावळे, संजना पाटील, अथर्व गोखले महत्वाच्या भूमिका साकारत आहेत.
होय मी सावरकर बोलतोय!
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या राजकीय जीवनावर आधारित होय मी सावरकर बोलतोय! हे नाटक कादंबरीकार अनंत ओगले यांनी लिहिले आहे. अभिनेते पृथ्वीराज कपूर, दिग्दर्शक भालजी पेंढारकर, मॅडम कामा, डॉ. आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी अशी ऐतिहासिक पात्रे असून आकाश भडसावळे, बहार भिडे, दुर्गेश आकेरकर, कविता विभावरी, शैलेश चव्हाण, दीपक जोईल, माधव जोशी हे कलाकार भूमिका साकारत आहेत.
एक कलाकार २४ तास जागून सादर करणार सलग ६ प्रयोग!
आकाश भडसावळे हा अभिजात निर्मित तिन्ही नाटकांमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आकाश भडसावळे हा अभिजात संस्थेचा संस्थापक! तो एक उत्तम अभिनेता व दिग्दर्शकही आहे. २४ तास सलग प्रयोग सादर करणे ही आकाश यांचीच कल्पना होती. २४ तासात तीन वेगळ्या नाटकांचे सलग सहा प्रयोग करणे कसोटीचे काम आहे आणि हे आव्हान हसत हसत आकाश यांनी स्वीकारले आहे. प्रयोग यशस्वी होण्यासाठी संपूर्ण टीम आकाशला सांभाळून घेत आहेत. त्याच्यावर असणाऱ्या जबाबदार्यांचे भार संपूर्ण टीम उचलत आहे. दोन ऐतिहासिक आणि एक विनोदी पात्र साकारताना सतत उत्साही राहणे ही परीक्षा आहे. आकाश ‘टिळक आणि आगरकर’ या नाटकात आगरकरांची भूमिका व त्यांचे इतर पात्राशी संबंध आणि आगरकरांचे व्यक्तिमत्व साकारताना दिसणार आहे. ‘होय मी सावरकर बोलतोय!’ या नाटकात सावरकरांची भूमिका आकाशसाठी जास्त उस्फुर्तीचे पात्र आहे. ‘वासुची सासू’ या नाटकात दिलीप प्रभावळकर यांनी केलेलं पात्र साकारताना अनेक जबाबदाऱ्या लक्षात घेतल्या जातात.
अभिजात निर्मित नाट्य महोत्सवात तीन नाटकांमध्ये निरनिराळे पात्र करणे कसोटीचे काम आहे. सलग २४ तास ६ प्रयोग करण्यासाठी तयारी करण्यात येत आहेच पण रंगमंचावर काम करत असताना प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद उर्जित करतो. प्रत्येक पात्राचे वेगळेपण आणि व्यक्तिमत्व दाखवणे हे जास्त महत्वाचे असेल.
आकाश भडसावळे(निर्माता, अभिनेता)
अभिजात नाट्य महोत्सव — महामहोत्सवाची ऑनलाईन तिकिटे (सीझन पास)
महामहोत्सवाची ऑनलाईन तिकिट विक्री पुढील लिंकवर सुरू आहे.
९ ऑगस्ट २०२२ — ऑनलाईन तिकिटांसाठी क्लिक करा.
१३ ऑगस्ट २०२२ — ऑनलाईन तिकिटांसाठी क्लिक करा.
१४ ऑगस्ट २०२२ — ऑनलाईन तिकिटांसाठी क्लिक करा.
आकाश भडसावळेच्या या धाडशी प्रयोगाला आणि अभिजात संस्थेच्या महामहोत्सवाला www.rangabhoomi.com कडून मनपूर्वक शुभेच्छा!