आपलं घर, अहमदनगर ही संस्था गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये कार्यरत आहे. नगरमधील कॉलेजवयीन मुलांनी आपल्या शहरात प्रायोगिक नाट्य चळवळ निर्माण व्हावी तसेच वेगवेगळे नाट्यप्रयोग करता यावेत या विचाराने या संस्थेची स्थापना केली. चार वर्षांच्या कालावधीत संस्थेने अनेक उपक्रम अहमदनगर शहरात तसेच महाराष्ट्रात राबवले आहेत. विशेषत: नाट्यक्षेत्रात आपलं घर, अहमदनगर काम करते. याच संस्थेने पुण्यात येत्या १६ जुलैला, ‘सहल‘ आणि ‘खैरलांजी: एपिसोड टू‘ या दोन दर्जेदार नाट्यप्रयोगांचं आयोजन केलेलं आहे. सहल आणि खैरलांजी दोन्ही नाट्यप्रयोग महाराष्ट्रभर नावाजलेले आहेत.
शनिवार दिनांक १६ जुलै रोजी भरत नाट्य मंदिर, पुणे येथे सायंकाळी ६ वाजल्यापासून या एकांकिकांचे सलग सादरीकरण होणार आहे.
तिकीट बुकिंगसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा: 8999 799 840
सहल
लेखक — निरंजन केसकर
दिग्दर्शक — आविष्कार ठाकूर
एस टी महामंडळात काम करणाऱ्या तात्या या एका बापाची ही गोष्ट आहे. एस टी कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे आपल्या मुलाला अर्थात पिंट्याला सहलीला पाठवावं की नाही हा पेच त्याच्यासमोर उभा राहतो. कारण संप बऱ्याच दिवसांचा सुरु असल्यामुळे घरात आर्थिक चणचण भासायला लागते. त्याच दरम्यान आज्जीबाई अर्थात तात्यांची आई तीर्थयात्रेला जाण्याचा हट्ट धरते. यात आधीच अडचणीत सापडलेल्या तात्यांची गोची होते. आज्जी आणि पिंट्याला सहलीला अर्थात त्यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या प्रवासाला जाता येतं की नाही? हे सांगत असताना सहल आपल्याला स्वत:च्या आत डोकावून बघताना आयुष्यात हार न मानता प्रवास करण्याची प्रेरणा देऊन जाते. त्याचबरोबर खळखळून हसवते देखील.
सहल एकांकिकेला मिळालेले पुरस्कार
जानेवारी २०२२ मध्ये पुण्यातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत ‘सहल’ या एकांकिकेला द्वितीय क्रमांकाचे ‘हरी विनायक करंडक’ हे पारितोषिक प्राप्त झाले. त्याचबरोबर दिग्दर्शनासाठी आविष्कार ठाकूर यास ‘गणपतराव बोडस पारितोषिक’ तसेच अभिनयासाठी गौरी डांगे हिस ‘ नटवर्य केशवराव दाते पारितोषिक’ प्राप्त झालंय. तसेच श्रुता भाटे आणि निरंजन केसकर यांना अनुक्रमे काकाजी जोगळेकर आणि बापूसाहेब ओक ही अभिनयाची पारितोषिके प्राप्त झालीत.
सहल — पात्र परिचय
म्हातारी – गौरी डांगे
तात्या – विनोद गरुड
पिंट्या – निरंजन केसकर
शारदा – श्रुता भाटे
इतर — समर्थ आरुने, मंजिरी जोशी, समर्थ खळदकर, संकेत दंडवते, वैष्णवी लव्हाळे, स्वराज अपूर्वा, विशाल साठे.
खैरलांजी: एपिसोड टू
वेळ — ५५ मिनिटे
लेखन व दिग्दर्शन — सुमेधकुमार इंगळे
संगीत व नैपथ्य — रुपेश अहिरे
प्रकाशयोजना — अक्षय हारसुले
‘खैरलांजी: एपिसोड टू’ हे २००६ च्या भीषण खैरलांजी दलित हत्याकांडावर आधारित नाटक. पूर्व विदर्भातील खैरलांजी येथे घडलेल्या ह्या घटनेचे पडसाद एखाद्या भूकंपाच्या आफ्टरशॉकसारखे सगळीकडे कसे पसरत गेले आणि त्यात सर्वसामान्य लोकही कसे पसरत गेले, त्याचे नाट्यमय रुपांतर ह्या नाटकात दिसते. नाटकाच्या नावात जरी ‘एपिसोड टू’ असलं तरी हा नाटकाचा सिक्वेल किंवा पुढचा भाग नाही. हे एकच एक नाटक आहे.
नाटकात एका अभिनेत्याची कथा आहे. खैरलांजीच्या घटनेवर डॉक्युमेंटरी बनवणाऱ्या टीममध्ये ‘सागर मोरे’ हा संवेदनशील तरुण अभिनेता सामील होतो. मेथड अभिनयाच्या मागे लागून सागर मोरे खैरलांजीतून वाचलेले भैय्यालाल भोतमांगे ह्यांच्या सायकोलॉजीचा अभ्यास करू लागतो. त्यात शिरत असताना त्याच्यासोबत अनेक अपघात होतात. पुढे सागर मोरेच्या आयुष्यात काय होतं ही गोष्ट ‘खैरलांजी: एपिसोड टू’मध्ये उकलते.
नाटकाचं सादरीकरण एकलनाट्य ह्या प्रकारात मोडतं. दिग्दर्शक सुमेधकुमार इंगळे स्वतः नाटकाच्या अवकाशात असलेली पाच पात्रे स्वतःच अभिनय करून रंगवतात. नाटकात कमीतकमीत सेट, वेशभूषा व संगीताचा अंतर्भाव आहे. अतिवास्तववादी असलेल्या ह्या नाटकाची लांबी तासभर आहे. पण, पूर्णवेळ एकच अभिनेता स्टेजवर दिसूनही नाटक प्रेक्षकाच्या बुद्धीला धरून ठेवते, प्रेक्षकाची पाठ खुर्चीला टेकवण्याची संधी देत नाही.
२०१५ पासून या नाटकाचे विविध ठिकाणी प्रयोग झालेले आहेत. अनेक प्रतिष्ठीत फेस्टीवल्समध्ये नावाजल्या गेलेल्या ह्या नाटकाला नाट्यरसिकांकडून बरेच प्रेम मिळाले आहे. ‘सोलो थिएटर फेस्टिव्हल’चे प्रोडक्ट असलेले हे नाटक उत्कृष्ट अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. तरुण, उदयोन्मुख नट व कलाकारांनी उचलून धरलेले हे नाटक खैरलांजीची घटना घडून जाऊन दीड दशक उलटले तरीही कालबाह्य झालेले नाही. ‘खैरलांजी: एपिसोड टू’ हे नाटक पाहिलेच पाहिजे असे आहे.