गुरुवारी दिनांक ९ ऑगस्ट दरम्यान कोल्हापुरात झालेली भीषण दुर्घटना आपण सर्वजण जाणतोच. नाट्यकलाकार व नाट्यरसिकांचे अत्यंत जवळचे असे केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या विळख्यात आले आणि संपूर्ण नाट्यसृष्टीत व संपूर्ण कोल्हापुरात हळहळ पसरली. अनेकांचे फार मोठ्ठे आर्थिक व त्याहून अधिक भावनिक नुकसान झाले! भस्मसात झालेल्या नाट्यगृहाच्या धक्क्यातून सावरत असताना, कोल्हापूर मधला प्रत्येक रंगकर्मी एकीकडे त्या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी साठी एकत्र येतोय, तर दुसरीकडे ‘आता कोणतेच व्यावसायिक नाटक कोल्हापूर मध्ये येणार नाही!’, असा विचार त्याला सतावत आहे. केशवराव भोसले नाटयगृह एवढा मोठ्ठा वारसा लाभलेलं, एवढ्या आसन क्षमतेचं, सर्व सोयीनियुक्त, दुसरं कोणतंच थिएटर कोल्हापूर मध्ये नाही. नाट्यगृह पुन्हा आधी सारखं झाल्यावर सुद्धा जम बसवण्यास वेळ लागणार असून, या पार्श्वभूमीवर ‘बराच काळ आता व्यावसायिक नाटकं कोल्हापूर कडे पाठ फिरवणार की काय?‘, असा प्रश्न उभा राहिला आहे. मात्र या विचारांना आणि या प्रश्नांना छेद द्यायचं काम, अवनीश प्रॉडक्शन्स, नाटक मंडळी व अथर्व निर्मित, ‘आमने सामने‘ या नाटकाने केलंय!
Aamne Saamne Reschedules Kolhapur Show
कोल्हापुरात झालेल्या दुर्दैवी घटने नंतर अगदी एक – दीड आठवड्यातच अवनीश प्रॉडक्शन्स, नाटक मंडळी व अथर्व या नाट्य निर्मात्यांनी, ‘गायन समाज देवल क्लब, कोल्हापूरच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिर‘ येथे आपल्या आमने सामने नाटकाचा प्रयोग लावला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भावनिक रित्या खचलेल्या कोल्हापूरच्या नाट्यरसिकांना बळ मिळालं! असं म्हणता येईल.
Govindrao Tembe Rangmandir gets ready to lift Keshavrao Bhosale’s responsibilities
गेले काही दिवस केशराव भोसले नाट्यगृहाच्या परिसरात पाऊल टाकायला सुद्धा करवीर वासियांना वाईट वाटत आहे. इतकी वर्ष एवढ्या दिमाखात उभं असलेलं ते कोल्हापूरचं वैभव आता बघायला नको वाटतंय. त्यामुळे शहरात एकूणच दुःखाचं वातावरण आहे. तेव्हा या भावनेला नाहीसं करण्यासाठी एक प्रयत्न “आमने सामने” नाटकाची टीम करत आहे. गोविंदराव टेंबे सारख्या तुलनात्मक लहान रंगमंचावर आपला व्यावसायिक प्रयोग करावा अशी इच्छा ठेवणे म्हणजे सुद्धा कौतुक आहे. त्यात आमने सामने नाटकाचं नेपथ्य ही तसं मोठं आहे. एकूणच अशा वेळी नाटकाचा प्रयोग लाऊन सर्वच रंगकर्मींना एक नवी ऊर्जा देण्याचं काम आमने सामने या नाटकाच्या टीमने केलं आहे.
अवनीश प्रॉडक्शन्स, नाटक मंडळी व अथर्व निर्मित आमने सामने नाटकाच्या टीमचे या प्रयत्नाबद्दल रंगभूमी.com आभारी आहे! नक्कीच या प्रयोगाला कोल्हापूरकर ‘हाऊसफुल प्रतिसाद’ देतील अशी आशा!