मनोरंजनाची खुसखुशीत मेजवानी घेऊन आलेल्या ‘आमने सामने’ या नाटकाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आणि पाहता पाहता या नाटकाचे १०० प्रयोग पूर्ण होणार आहेत. येत्या रविवारी, म्हणजेच १५ मे रोजी ‘आमने सामने’ या नाटकाचा शतक महोत्सवी सोहळा साजरा होणार आहे. या ‘सेंच्युरी’ प्रयोगाच्या आनंदोत्सवात अनेक दिग्गज व मान्यवर सहभागी होणार आहेत.
सादरकर्ते अवनीश व अथर्व प्रकाशित ‘आमने सामने’ या दोन अंकी नाटकाची निर्मिती ‘नाटकमंडळी’ यांनी केली आहे. मंगेश कदम, लीना भागवत, मधुरा देशपांडे, रोहन गुजर हे कलाकार या नाटकाचा भाग आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन नीरज शिरवईकर यांनी केले असून लग्नासारखा महत्त्वाचा विषय हाताळताना त्यांनी प्रेक्षकांना विचार करायला प्रवृत्त केले आहे.या नाटकात मागच्या पिढीने काळानुसार नव्याचा स्वीकार करायला हवा हा विचार अगदी रंजकरीत्या मांडला आहे. विनोदी अंगानेदेखील अनेक महत्त्वाचे विषय मांडता येतात हे दाखवून देणाऱ्या ‘आमने सामने’ या नाटकातून लग्नसंस्थेवर मार्मिकरित्या भाष्य करण्यात आले आहे.
प्रेक्षकांच्या पसंतीचे व उदंड प्रतिसादात चालणाऱ्या या नाटकाने, झी नाटय गौरव, आणि मटा सन्मान सोहळयात सर्वोत्कृष्ट नाटकासहित सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री आणि सहाय्यक अभिनेत्री अशा सर्व पुरस्कारांवर या नाटकाने आपले नाव कोरले आहे. आगामी सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कारांमध्येसुद्धा सर्वोत्कृष्ट नाटक, सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, सहाय्यक अभिनेत्री, सहाय्यक अभिनेता, नेपथ्य आणि प्रकाशयोजना अशी ८ नामांकने ‘आमने सामने’ या नाटकाने पटकावली आहेत. विशेष म्हणजे आगामी आंतरराष्ट्रीय संमेलनातही या नाटकाची निवड झाली आहे. ऑगस्ट महिन्यात अमेरिकेतील न्यू जर्सी, अटलांटिक सिटी येथे होणाऱ्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या संमेलनात (BMM 2022 convention) तसेच ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे २२, २३, २४ सप्टेंबर २०२२ रोज़ी होणाऱ्या अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनातही (AAMS 2022) ‘आमने सामने’ नाटकाची निवड झाली आहे.
या प्रचंड प्रतिसादात गाजत असलेल्या ‘आमने सामने’ या नाटकाच्या शतकी महोत्सवी वाटचालीबद्दल आनंद व्यक्त करताना अभिनेते मंगेश कदम यांनी आंतरराष्ट्रीय संमेलनात नाटकाची झालेली निवड त्यांचा व त्यांच्या संपूर्ण टीमचा हुरूप वाढवणारी असल्याचे सांगितले. नाटकाला मिळत असलेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद पाहता हे नाटक ५०० प्रयोगांचा टप्पासुद्धा गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं हे धमाल विनोदी नाटक रविवार १५ मे, २०२२ रोजी आपला शतक महोत्सवी आनंद सोहळा साजरा करणार आहे. दुपारी ४.३० वाजता, गडकरी रंगायतन, ठाणे येथे हा शतकमहोत्सवी सोहळा पार पडेल. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेता-कवी जितेंद्र जोशी, आरजे दिलीप, दिग्दर्शक रवी जाधव, लेखक-दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे आदि मान्यवर या प्रयोगाला उपस्थित राहणार आहेत.
हसत-खेळत एक नवा विषय मांडणाऱ्या ‘आमने सामने’ नाटकाची ‘हास्याच्या लशीची मात्रा’ प्रेक्षक नाट्यगृहात अनुभवत आहेत. तेव्हा रसिक प्रेक्षकांनी आमने सामने या नाटकाच्या १००व्या प्रयोगाला उदंड प्रतिसाद द्यावा व नाट्यगृहात जाऊन हे नाटक अवश्य पाहावं.