‘आजकल’ आणि ‘आपलं घर’ प्रस्तुत एक सुंदर कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पुरुषोत्तम करंडक विजेत्या दोन दर्जेदार आणि भिन्न धाटणीच्या एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. १६ जुलै रोजी, रात्री ९ वाजल्यापासून यशवंतराव चव्हाण, पुणे येथे या एकांकिका प्रेक्षकांना बघता येणार आहेत. ऑनलाईन बुकींगसाठी ticketkhidakee.com या वेबसाईटला भेट द्या. तसेच, ग्रुप बुकींगसाठी ८४ २१०० ४४६४ या क्रमांकावर WhatsApp करा.
सादर होणाऱ्या एकांकिकांची माहिती
सॉरी परांजपे
लेखन — चिन्मय देव
दिग्दर्शन — ऋषी मनोहर
आजकल सादर करत असलेल्या सॉरी परांजपे ह्या एकांकिकेचा पहिला प्रयोग पुरुषोत्तम करंडक २०१७ मध्ये सादर झाला. ह्या नाटकाचं लेखन चिन्मय देव ह्याने केलं असून दिग्दर्शन ऋषी मनोहर ह्याने केलं आहे. २०१७ साली राम गणेश गडकरी ह्यांचा पुतळा पाडला गेला, कारण होतं १०० वर्षांपूर्वी त्यांनी लिहिलेल्या नाटकातील एका वाक्यावर एका संघटनेचा आक्षेप होता. ह्यावर आपण व्यक्त व्हायला हवं ह्या उद्देशाने ह्या नाटकाच्या गटाने ह्या विषयाचा अभ्यास सुरू केला आणि हा फक्त पुतळ्यांच्या राजकारणाबद्दलचा विषय नसून त्याला अनेक पदर आहेत ह्याची जाणीव झाली आणि हळूहळू नाटकाच्या तालमीदरम्यान हे नाटक अधिक घट्ट बांधलं गेलं. नाटकात एका कॉलेजच्या कलामंडळातील काही मुलं सिद्धेश देशपांडे ह्या पात्राच्या घरी भेटून ह्यावर्षीचं पुरुषोत्तम कोण लिहिणार ह्यावर निर्णय घेणार आहेत. अनाहिता देवधर आणि प्रज्योत येडगावकर असे दोघेही आपापल्या नाटकांच्या संकल्पना सगळ्यांना ऐकवतात आणि मग नक्की काय होतं? शेवटी नाटक कोण लिहितं? हे नाटकात उलगडत जातं.
ह्या नाटकाला पुरुषोत्तम करंडक २०१७ तृतीय, सवाई एकांकिका २०१८ द्वितीय, लोकसत्ता लोकांकिका २०१७ प्रथम तसेच भरत करंडक, दाजीकाका गाडगीळ करंडक, रंगसंगीत एकांकिका स्पर्धा, अक्षर करंडक अशा अनेक स्पर्धांमध्ये सांघिक पारितोषिके मिळाली आहेत. तसेच पुरुषोत्तम मधील मानाची गणपतराव बोडस सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- ऋषी मनोहर आणि निर्मल पारितोषिक पुरुष अभिनय नैपुण्य- गंधर्व गुळवेलकर ही पारितोषिके प्राप्त झाली आहेत. १६ जुलै ला ह्या नाटकाचा ४२ वा प्रयोग आहे.
पीसीओ
लेखक — अमोल साळवे
दिग्दर्शक — विनोद गरुड
सोनसाकळ नावाच्या गावात राधिका आणि श्यामसुंदर माने या जोडप्याच्या घरी टेलिफोन येतो. पहिल्यांदा टेलिफोन आल्याच्या आनंदात गावकरी प्रचंड उत्साहाने स्वागत करतात. नव्याची नवलाई संपून हळूहळू फोन गावकऱ्यांच्या जगण्याचा महत्वाचा भाग बनतो. परंतु जग तंत्रज्ञानाने जवळ येत असताना माणस कशी दुरावत चाललीत हे या एकांकिकेत आपल्याला अनुभवायला मिळत. विषय गंभीर असला तरी एकांकिका मात्र हलक्या-फुलक्या विनोदांनी फुलते नि आपल्या हसता हसता जुन्या काळात घेऊन जाते.
पीसीओ एकांकिका मानाच्या म्हणवल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडकाची विजेती एकांकिका आहे. पुरुषोत्तम करंडकाबरोबरचं दिग्दर्शनासाठी विनोद गरुड ह्यास मानाचा ‘गणपतराव बोडस’ हा पुरस्कार मिळालेला आहे तर अभिनयासाठी मोनिका बनकर हिस ‘नटवर्य केशवराव दाते’ हे पारितोषिक प्राप्त झाले आहे. तसेच आविष्कार ठाकूर ह्यास ‘बापूसाहेब ओक’ हे अभिनयाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. या एकांकिकेची महाराष्ट्र शासन आयोजित सर्वोत्तम एकांकिका महोत्सवासाठी निवड झालेली आहे.
पीसीओ संपूर्ण टीम
लेखक — अमोल देविदास साळवे
दिग्दर्शक — विनोद अनंत गरुड
नेपथ्य — मनु शर्मा
प्रकाशयोजना — स्वराज अपूर्वा
रंगमंच व्यवस्था — वैष्णवी लव्हाळे
पात्र परिचय
राधा — मोनिका बनकर, श्याम — विनोद गरुड, पंडित — सोहम दायमा, हसरे — अविष्कार ठाकूर, सौ. हसरे — रेवती शिंदे, तोंडावळे — विशाल साठे, चिऊ — रचईता अपूर्वा, आज्जी — शर्वरी अवचट, जॉली — निरंजन केसकर