लॉकडाऊन मुळे आपण सर्व घरात लॉक झालो. तशीच लॉक झाली मराठी नाट्यसृष्टी. मागच्या दोन वर्षात कोरोना मुळे अखंड नाट्यसृष्टी बंद पडली होती. नाटक रसिक देखील आतुरतेने नाटकांची वाट पहात होते. आता हळू हळू अनेक नाटकं रंगभूमीवर पुनरागमन करताना दिसतायत आणि त्यातलंच एक नाटक म्हणजे नीरज शिरवईकर लिखित व विजय केंकरे दिग्दर्शित ‘अ परफेक्ट मर्डर’!
आल्फ्रेड हिचकॉक ह्यांच्या ‘डायल एम फॉर मर्डर‘ या सिनेमावर आधारित ‘अ पर्फेक्ट मर्डर’ हे नाटक डिसेंबर २०२१ मध्ये रंगभूमीवर पुनःश्च हरी ओम करतंय. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग डिसेंबर २०१८ रोजी झाला होता व २०१९ पर्यंत त्याचे जवळ जवळ १०० यशस्वी प्रयोग झाले होते.
नाटकाचे कथानक काहीसे चित्तथरारक आहे. निरंजन मुजुमदार ह्याने आपल्या पत्नीच्या खुनाची पूर्ण तयारी केली असते. एका भयाण रात्री जेव्हा मीरा मुजुमदार घरात एकटी असते तेव्हा एक व्यक्ती तिचा खून करायचा प्रयत्न करते. निरंजन मुजुमदार तिचा खून करायचे का ठरवतो? तो त्यात यशस्वी होतो का? मीरा मुजुमदार चा प्रियकराबद्दल त्याला समजले असते का? त्या कारणापायी तो आपल्या बायकोचा खून करेल का? इन्स्पेक्टर घार्गे ह्या सगळ्या प्रश्नांचा उलगडा करु शकतात का? हे असे अनेक प्रश्न निर्माण करत करत त्यांची उत्तरे शोधता शोधता प्रेक्षकांना अगदी खिळवून ठेवणारे नाटक म्हणजे ‘अ पर्फेक्ट मर्डर’.
रसिकांना खिळवून ठेवणारं एक सणसणीत आणि आशयघन असणारं हे नाटक आहे. पुष्कर श्रोत्री, सतीश राजवाडे, प्रिया मराठे, अनिकेत विश्वासराव, श्रीकांत प्रभाकर व सुबोध पांडे यांच्या सारख्या उत्तम कलाकारांची मेजवानी आपल्याला या नाटकात पाहायला मिळते.
प्रिया मराठे ह्यांचे पात्र मीरा मुजुमदार हे एका एक्स क्रिकेटर च्या पत्नीचे आहे. हे पात्र ७० प्रयोगांपर्यंत अभिनेत्री श्वेता पेंडसे ह्यांनी निभावले होते. व आता त्याची धुरा प्रिया मराठे सांभाळत आहेत. पुष्कर श्रोत्री हे निरंजन मुजुमदार ह्यांची भूमिका साकारताना दिसतात. निरंजन मुजुमदार हे एक्स क्रिकेटर असून आपल्या पत्नीवर अत्यंत प्रेम करणारा नवरा आहेत. तब्बल १९ वर्षांनंतर अभिनयात पुन्हा पदार्पण करणारे सतीश राजवाडे, हे सब इन्स्पेक्टर घारगे ह्यांची भूमिका साकारताना दिसतात. श्रीकांत प्रभाकर हे दीव्यजीत चौधरी, म्हणजेच मीरा मुजुमदार ह्यांच्या प्रियकराचे पात्र साकारताना दिसतात. सुबोध पांडे हे सोहनी ह्यांची भूमिका निभावताना आपल्याला दिसून येतात.
सतीश राजवाडे यांच्या कार्यबाहुल्यामुळे, बऱ्याच प्रयोगांमध्ये अनिकेत विश्वासराव हे निरंजन मुजुमदार ह्यांची भूमिका निभावतात व पुष्कर श्रोत्री हे सब इंस्पेक्टर घारगे ह्यांची भूमिका साकारतात. तर कधीकधी अनिकेत विश्वासराव निरंजन मुजुमदार हे पात्र साकारतात तर सतीश राजवाडे त्या प्रयोगात इन्स्पेक्टर ह्यांची भूमिका निभावतात. या प्रकारे हे एक नाटक तीन वेळा तीन कॉम्बिनेशन्स मध्ये बघण्याची संधी आम्ही प्रेक्षकांना देत आहोत असे परफेक्ट मर्डरच्या टीमला वाटते.
अ परफेक्ट मर्डर ह्या नाटकाचा लॉकडाऊन नंतरचा पहिला प्रयोग नवी मुंबई मधील विष्णुदास भावे नाट्यगृहात २५ डिसेंबर रोजी ४ वाजता होत आहे.
व दुसरा प्रयोग मुंबई मधील प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली येथे २६ डिसेंबर रोजी ४ वाजता पार पडणार आहे.
आपण तिकिटं www.bookmyshow.com वरुन बुक करू शकता.
तेव्हा आपल्या जवळच्या नाट्यगृहात जाऊन ‘अ परफेक्ट मर्डर’ हे नाटक नक्की पहा.