२५ नोव्हेंबर, २०२१ रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये एक दिमाखदार सोहळा पार पडला, ज्याचे नाव होते ‘रंगबरसे’ आणि निमित्त होते ८ वा जागतिक रंगकर्मी दिवस! हा सोहळा मराठी नाट्य कलाकार संघ व आरती आर्ट अकादमी च्या सहयोगाने आयोजित करण्यात आला होता. मराठी नाट्य कलाकार संघाचे अध्यक्ष माननीय प्रदीप कबरे यांच्या मार्गदर्शनाखाली, संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते कै. भालचंद्र पेंढारकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या उपस्थितीत २५ नोव्हेंबरला २०१४ साली यशवंत नाटय़मंदिरात मराठी कलाकार संघाच्या वतीने पहिला जागतिक रंगकर्मी दिन साजरा झाला होता. कोरोनाचे संकट उद्भवल्यामुळे गतवर्षी रंगकर्मी दिन साजरा झाला नाही. मात्र या वर्षी प्रचंड उत्साहात हा सोहळा पार पडला. गेल्या सात वर्षांत भालचंद्र पेंढारकर, मधुकर तोरडमल, गंगाराम गवाणकर, विक्रम गोखले, किशोर प्रधान आणि दिलीप प्रभावळकर यांचा या दिवशी सत्कार करण्यात आला होता. या वर्षीचे सन्मानमूर्ती अशोक सराफ मामा होते.
अशोक सराफ यांच्या सोबत मराठी नाट्य कलाकार संघाचे कार्यवाह प्रमुख सुशांत शेलार तसेच समीर चौघुले, सुनील बर्वे, मीरा मोडक, अर्चना नेवरेकर, जयवंत वाडकर, मानसी जोशी व मेघा घाटगे अशा काही आपल्या लाडक्या कलाकारांचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती. उत्सवमूर्ती अशोक मामांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सोहळ्याला सुरुवात झाली. त्यांनतर नाट्यसंगीताचा एक सुंदर कर्यक्रम झाला. सर्वच गाणी अप्रतिमरीत्या सादर झाली. भालचंद्र पेंढारकर यांचे सुपुत्र ज्ञानेश पेंढारकर यांनी गायलेल्या ‘आई तुझी आठवण येते’ या गाण्याची येथे विशेष नोंद करावीशी वाटते. त्यांचे स्वर आणि सूर दोन्ही प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले. या छोट्याशा पण अविस्मरणीय नाट्य संगीत कार्यक्रमानंतर संघाचे कार्यवाह प्रमुख सुशांत शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. एकंदर सोहळा आणि नाट्य कलाकार संघाबद्दल बोलताना सुशांत शेलार म्हणाले की, “प्रत्येक कलाकाराने नाट्य कलाकार संघाशी जोडले गेले पाहिजे. नाट्य कलाकार संघाची प्रगती होण्यासाठी सगळ्यांची मदत अपेक्षित आहे. लॉकडाऊनच्या काळात नाट्य कलाकार संघातर्फे बऱ्याच गरजू कलावंतांना मदतीचा हात मिळाला. मी आज या सोहळ्याच्या निमित्ताने आवाहन करू इच्छितो की प्रत्येक कलाकाराने त्याच्या एका per day चे पैसे गरजू नाट्यकर्मींसाठी संघाकडे द्यावेत. जेणेकरून रंगकर्मींसाठी विमा योजना किंवा रंगकर्मींसाठी इतर काही फायदेशीर योजना अंमलात आणता येतील.”
कलाकार दत्तक योजना
त्यानंतर, प्रदीप कबरे यांनी मंचावर येऊन, कलाकार दत्तक योजनेची संकल्पना प्रेक्षकांसमोर मांडली. या योजनेत कलाकार अथवा प्रेक्षकच गरजू कलाकारांच्या मदतीसाठी उतरणार असल्याचे कबरे यांनी स्पष्ट केले. बरीच वर्षे रंगभूमीसाठी काम करत आलेल्या परंतु आता वयोमानानुसार थकलेल्या व आर्थिकरीत्या मदतीची गरज असलेल्या काही रंगकर्मींसाठी इतर रंगकर्मी अथवा इच्छुक प्रेक्षकांकडून आर्थिक मदत देणगी स्वरूपात उभी करणे, असे या योजनेचे सर्वसाधारण रूप असणार आहे. जमेची बाजू म्हणजे मदत म्हणून आलेली रक्कम सर्वांसमक्ष, धनादेश स्वरूपात संबंधित रंगकर्मींना संबंधित दात्यांच्या हातून प्रदान करण्यात आली. तुम्हीही या योजनेत सहभागी होऊन तुमचा खारीचा वाट उचलू शकता. तुम्ही इच्छुक असाल तर आम्हाला [email protected] या ई-मेल आयडीवर कळवा. आम्ही तुमचा संदेश नक्कीच प्रदीप कबरे यांच्यापर्यंत पोहोचवू.
कलाकार दत्तक योजनेच्या घोषणेनंतर, माननीय भालचंद्र पेंढारकर यांच्या YouTube वरील प्रस्तुत डॉक्युमेंटरीचा उल्लेख करण्यात आला. वाचकांनी ही डॉक्युमेंटरी नक्की बघावी.
दिल धक धक करे पुस्तक प्रकाशन
त्यांनतर प्रदीप कबरे लिखित ‘दिल धक धक करे‘ या पुस्तकाचे उत्सवमूर्ती अशोक सराफ यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. जागतिक रंगकर्मी दिवस असल्यामुळे उपस्थित कलाकारांना रंगमंचावर बोलवून संगीत खुर्चीचा एक खेळही रंगला.
आणि या संपूर्ण सोहळ्यावर सोन्याचा कळस चढवावा तसे एक शेवटचे सदर प्रेक्षकांच्या भेटीस आले, ते म्हणजे अशोक सराफ यांची लाईव्ह मुलाखत. या मुलाखतीचे होस्ट अर्थातच प्रदीप कबरे होते. जवळपास ४० मिनिटे सुरू असलेल्या या रंगतदार मैफिलीमुळे कार्यक्रमाचा नूरच पालटून गेला.
प्रदीप काबरे यांनी समस्त प्रेक्षकवर्ग आणि रंगकर्मी वर्गाला दत्तक योजनेसाठी आवाहन करताना असेही नमूद केले की ही मदत न समजून ज्येष्ठ रंगकर्मींप्रती आपण व्यक्त केलेली कृतज्ञता समजावी. आम्ही नाट्य कलाकार संघ व त्याच्याशी संबंधित सहकाऱ्यांना त्यांच्या नवीन उपक्रमासाठी शुभेच्छा देतो व तुम्हीही कलाकार दत्तक योजनेत लवकरच सहभागी व्हाल अशी सदिच्छा व्यक्त करतो.
ह्या कार्यक्रमातील ईतर व्हिडिओ पाहण्यासाठी रंगभूमी.com च्या YouTube Channel ला Subscribe करायला विसरु नका.