“बायका सोशिक असतात”, “बायकांनी कसं… सोशिक असायला हवं”, “बाईच्या जातीने असं वागावं”, “बाईच्या जातीने असं वागू नये”, स्त्रीजातीबद्दल अशी कितीतरी विधानं दैनंदिन आयुष्यात सतत आपल्या कानावर आदळत असतात. अशा विधानांच्या उत्पत्तीमागे कारणं तशी बरीच आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या चालीरीती. स्त्रियांना लग्न करुन परक्या घरात जावं लागतं. त्यामुळे तिलाच सगळं सामंजस्याने समजून घ्यावं लागतं. लग्नानंतर तिचं ओळखीचं असं काहीच नसतं. नवं घर, नव्या पद्धती… या नव्या पद्धतींना आपलंसं करण्यासाठीच वरील विधानांचं जणू बाळकडूच मुलींना लहानपणीपासून पाजलं जातं. आजही समाजात बायकांचा छळ सुरू आहे. काहीच बदललेलं नाही. हे झालं बायकांचं, पण लहान मुली… त्यांचं काय? त्यांची परिस्थिती याहून खराब आहे. कमी वयात लग्न लावून त्यांचं बालपणच त्यांच्याकडून हिरावून घेतलं आहे. याच विषयावर भाष्य करणारं “७ वी पास” नावाचं एक दमदार नाटक आपल्यासाठी घेऊन येतायत मीना नाईक!
कळसूत्री
‘कळसूत्री’ या संस्थेतर्फे मीना नाईक गेली अनेक वर्ष सातत्याने मुलांच्या सामाजिक समस्यांवर नाटक आणि पपेट्स माध्यमातून लोकजागृती निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहेत. त्यांचं ‘वाटेवरती काचा गं…‘ हे बाल लैंगिक शोषणावरील नाटक, ‘अभया‘ हे पॉक्सो कायद्याविषयीचे नाटक सध्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्रा बाहेरही गाजत आहे.
या नाटकांचे प्रयोग करत असताना मीना नाईक यांना लक्षात आलं की ग्रामीण भागात, आदिवासी समाजात आणि काही प्रमाणात शहरी भागातही मुलींना फक्त ७वी पर्यंत शिकवून त्यांचं लग्न लावून दिलं जात. कारणं अनेक आहेत. ७वी नंतर पुढे शिकायचं असेल तर दूरवर चालत जावं लागतं. त्यामुळे पालकांना भीती वाटते. मुलींवर काही अतिप्रसंग झाला तर… काहीवेळा पालकांना वाटतं मुलींचं लग्न लावून दिलं की आपली जबाबदारी संपली. सासरच्या लोकांनी तिचं उर्वरित आयुष्य कसं ते पाहून घ्यावं. परंतु आजच्या जगात शिक्षण किती महत्वाचं आहे, याबद्दल समाजात जागृती निर्माण करून बालविवाह टाळणं आवश्यक आहे, हे नाटकाच्या माध्यमातून पटवता येतं. व्याख्यान किंवा पुस्तकं वाचून दाखवण्यापेक्षा नाटकातून अधिक परिणाम होतो, हे मीना नाईक यांनी अनेकदा दाखवून दिलेलं आहे.
७ वी पास • मराठी नाटक
‘७वी पास’ नाटकात राधा नावाच्या एका मुलीची गोष्ट आहे. सातवी पास झाल्यानंतर या मुलीला पुढेही शिकायचं आहे. पण तिची आई तिचं लग्न लावून द्यायचं विचार करतेय. अशा परिस्थितीत तिला पुढे शिकता येतं का? तिच्या आईचा विचार बदलतो का? की राधाचा बालविवाह होतो? हे सगळं जाणून घेण्यासाठी या नाटकाला नक्की भेट द्या.
संगीत देवबाभळी नाटकाचे लेखक प्राजक्त देशमुख यांनी या नाटकाचे लेखन केले आहे. त्यांच्याबद्दल मीना ताई सांगतात, “प्राजक्त देशमुख या तरुण यशस्वी नाटककाराकडून ‘सातवी पास’ हे नाटक लिहून घेतलं आहे. कौशल इनामदार यांनी नाटकाला संगीत दिलं आहे. तीन तरुण मुली आणि तीन मुलगे यांनी प्राजक्तची ही संहिता जिवंत केली आहे. या नाटकात अत्यंत कल्पकतेने पपेट्सचा उपयोग करण्यात आला आहे. नाच, गाणी आणि पपेट्स यामुळे नाटकाची रंगत वाढली आहे.”
या नाटकाचा शुभारंभ २ डिसेंबर रोजी ५ वाजता एन. सी. पी. ए. येथे होणार आहे. या नाटकात एक ज्वलंत विषय मांडण्यात येणार आहे. अशा नाटकांची आजच्या काळात तीव्रतेने गरज जाणवते. स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यास अजून बराच काळ लोटेल. पण चळवळ सुरू ठेवावी लागेल. थांबून चालणार नाही. त्यामुळे हे नाटक नक्की बघा आणि तुमच्या आप्तेष्टांनाही सूचवा. एन. सी. पी. ए. सारख्या नामवंत संस्थेची या नाटकाला साथ मिळाली आहे म्हटल्यावर, हे नाटक खेड्यापाड्यापर्यंत पोहोचून समाज प्रबोधनात काही अंशी तरी हातभार लावेल याबद्दल आपण आशावादी राहू शकतो. हे नाटक बघून समाजातील काही पालकांचे जर विचार बदलले आणि त्यांनी आपल्या मुलींना बालवयातच संसाराच्या आगीत लोटून न देता स्वतःच्या पायावर उभं होण्यास मदत केली तर तेही नसे थोडके!