रंगभूमी दिनाच्या निमित्ताने २७ मार्च रोजी ‘जिगीशा अष्टविनायक’ यांचे चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. इतके दर्जेदार नाटक पुन्हा प्रेक्षकांना पहायला मिळणार ही खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि याच पुनर्भेटीचे औचित्य साधून आम्ही याच नाटकातील अजरामर व्यक्तिरेखांशी एकरुप करणारे काही लेख ‘वाड्यात जोडलेली माणसे‘ या मालिकेत आमच्या तमाम वाचकांसाठी वाचावयास आणले आहेत. हे लेख आमच्या टीमचा युवा लेखक अभिषेक महाडिक याने २०१७-२०१८ मध्येच लिहिले आहेत. अभिषेक या लेखांबद्दल त्याचे मनोगत पुढीलप्रमाणे व्यक्त करीत आहे.
मनोगत
जगविख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांच्या ‘वाडा’ नाट्यत्रयीने महाराष्ट्राच्या इतिहासात तीन अभिजात नाटकांचा खजिना निर्माण केला. खजिना खरतर खूप आधी दडवला जातो आणि मग तो काळाच्या ओघात कधीतरी कोणालातरी सापडतो. पण महेश एलकुंचवार सरांचा हा खजिना १९८३ ते १९९४ ह्या काळात लिहीला गेला आणि तिथून पुढे आजपर्यंत त्याचे संगोपन, संवर्धन करून अनेकांनी तो जतन करून ठेवला. व तसेच यापुढे अनंत काळ तो तसाच जपला जाईल, ह्यात तिळमात्रही शंका नाही. तो खजिना म्हणजे… ‘वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगान्त !’ ही तीन अभिजात नाटकं. धरणगावच्या देशपांडे कुटुंबातील एकेका व्यक्तीने ह्या महाराष्ट्रातील कुटुंब व्यवस्थेच्या वटवृक्षाच्या एकेका मुळाचे प्रतिक बनून अनंत काळ उरतील, मनात साठतील अश्या आठवणी निर्माण केल्या. ह्या घरातील जी-ती व्यक्तीरेखा ज्या-त्या कलाकाराने नाटकात साकारली, त्याने किंवा तिने पुढच्या पिढीला ती व्यक्तीरेखा त्या व्यक्तिरेखेच्या आत्म्यासहीत सुपूर्त केली.
मानवी नातेसंबंध आणि त्यातील गुंतागुंत अगदी सखोलपणे आणि एका विस्तीर्ण पटावर दाखवण्याची ताकद काहीच लेखकांच्या लेखणीत असते आणि त्यातीलच एक म्हणजे जेष्ठ लेखक महेश एलकुंचवार. त्यामुळेच आज इतक्या वर्षानंतर सुद्धा वाड्यातील प्रत्येक व्यक्ती ही तितकीच आपलीशी वाटते, त्यांची सुखदुःख आपली वाटतात. प्रत्येकाला प्रत्येक काळात ही माणसे वेगळी वाटू शकतील का ? असा विचार माझ्या मनात आला. म्हणजे मला समजलेली अंजली काकू किंवा दादी किंवा अगदी चंदू काका जसे मला वाटले तसेच ते समोरच्याला वाटले असतील का ? आजपासून काही वर्षानी वाडा जेव्हा पुन्हा एकदा धाडस करून उभारला जाईल तेव्हा त्यांना तेच वाटेल का जे मला आज वाटतंय, कळतंय ? असे अनेक प्रश्न माझ्या मनात येत गेले आणि मग विचार केला कि आपण लिहूया. आपल्याला वाड्यात जे अनुभव आले, १८-२० वर्षात माणसांची जी विविधांगी बदलत गेलेली रूपे पाहायला मिळाली त्याबद्दल आपण व्यक्त होऊया. जेणेकरून कोणीतरी हे वाचून वाड्यातील ‘मला कळलेली माणसे’ आणि ‘तुला कळलेली माणसे’ ह्यात पुसटशी तरी विचारांचे वेगळेपण स्पष्ट करणारी सीमारेषा आहे का ? हे जाणून घेता येईल.
२० डिसेंबर २०१४ ला ‘वाडा चिरेबंदी’ पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा एका शून्य विचाराने नाटकाला गेलेला मी पुढच्या भागाची उत्सुकता उराशी बाळगून घरी गेलो. त्यानंतर २२ ऑक्टोबर २०१६ ला ‘मग्न तळ्याकाठी’ पहिल्यांदा पाहिलं आणि मी खरंच सांगतो – मी सुन्न झालो… अक्षरश: सुन्न झालो. त्यानंतर माझ्याजागी असलेल्या एखाद्याने विचार केला असता कि आता फक्त ‘युगान्त’ पाहायचे. पण का कोणास ठावूक मला अजूनही खूप काही जाणून घ्यायचे होते. खूप काही त्या वाड्यात राहिले होते जे माझ्या नजरेतून सुटले होते. वाड्यातील त्या लोकांच्या डोळ्यात पुन्हा एकदा काहीतरी वेगळे सापडेल का ? ह्या उद्देशाने मी १२ नोव्हेंबर २०१७ ला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली येथे ‘वाडा चिरेबंदी’ व ‘मग्न तळ्याकाठी’चा प्रयोग पुन्हा एकदा सलग पाहिला व तसेच तिसरा भाग ‘युगान्त’ देखील पाहिला. माझा अनुभव १९८५ साली एका कुटुंबातून सुरु झाला आणि १८-२० वर्षांनी एका अस्ताजवळ येउन थांबला. जेव्हा जेव्हा मी वाड्याचा आता विचार करतो; तेव्हा मला वाटते कि मी एका कड्यावर येऊन बसलोय; जिथे आणि फक्त विस्तीर्ण पसरलेले आभाळ आणि त्याखाली पसरलेली जमीन आहे. असे वाटते त्या टोकावर बसून आकाशात पाहतोय आणि रोज रात्री चांदण्यांच्या प्रकाशात एकेका व्यक्तीला मी ‘माझे’ समजून त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारतोय. तिथे कुठलेही तिकीट नाही, कुठलीही फिक्स खुर्ची नाही, त्या जागेवरून कोणी उठवणार नाही… अश्या ठिकाणी फक्त मी आणि वाड्यातील ती एक व्यक्ती दोघेच बोलत बसलोय आणि त्यातून मला ती व्यक्ती नव्याने उलगडत गेली आहे. त्या खऱ्याखुऱ्या अवकाशात मला रंगमंचाच्या अवकाशात वावरणारी ती व्यक्तीरेखा दिसतेय.
आता ह्याच गप्पा, माझे विचार आणि त्या व्यक्ती सोबतच्या संवादातून उलगडत गेलेला माझा ‘चिरेबंदी वाडा’ मी आजपासून तुमच्यासोबत वाटून घेतोय… ‘वाड्यात जोडलेली माणसे’ ह्या लेखमालेच्या माध्यमातून. जाणून घ्या वाड्यातील माणसांना; नक्कीच ती तुम्हाला आपलीशी वाटतील; जशी ती मला वाटली. ही लेखमाला मी सुरु केली ११ डिसेंबर, २०१७ रोजी. दिवसागणिक वेगवेगळ्या व्यक्तीरेखा समजून घेताना, वाड्याला समजून घेताना मी कधी स्वत:ला वाड्याचा एक भाग समजू लागलो, काही कळलेच नाही. तीन-साडेतीन चाललेल्या ह्या लेखनाच्या प्रपंचाची सांगता २ एप्रिल २०१८ रोजी झाली. ह्या काळात अनेक चांगले-वाईट अनुभव मिळाले (चांगले जरा जास्तच मिळाले). फक्त एक नाटक म्हणून ह्या सगळ्याकडे न पाहता मी माझं कुटुंब म्हणून हे सर्व जगत होतो. ह्या अनुभवाने मला घडवलं, माझ्या जाणीवा समृद्ध केल्या आणि सोबतच अनेक नात्यांची भर माझ्या आयुष्यात घातली. सोशल मिडीयावर पोस्ट केलेया ह्या सगळ्या लेखाना वाचकांनी खूप उत्तम प्रतिसाद दिला.
वाडा जगलेल्या कलाकारांपासून ते वाड्याशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जोडलेल्या प्रत्येकाने लेख वाचले व आपला अमुल्य असा अभिप्राय दिला. एकंदरीतच ‘वाड्यात जोडलेली माणसे’ ही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव देणारी घटना होती. लेखक, दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि हे लेख वाचून व्यक्त झालेल्या प्रत्येकाला मनापासून धन्यवाद!
पुढे वाचा → वाड्यात जोडलेली माणसे भाग १ – …आणि ही ‘वहिनी’ मला माझी वाटू लागली!
पुढे वाचा → वाड्यात जोडलेली माणसे भाग २ – भावना पोहचत नसल्या तरी मनात प्रेम राहतेच ना!