कोरोनारूपी महामारीने संपूर्ण जग त्रस्त असताना या महामारीतून सुटका करण्यासाठी सगळ्यांनी घरी रहाणेच हिताचे आहे हे लक्षात आल्यावर आपले पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांनाही भारतात Lockdown पुकारावा लागला. काही कर्मचाऱ्यांकडे घरी बसून काम करण्याचा पर्याय उपलब्ध होता. पण, या Lockdown मध्ये खऱ्या अर्थाने होरपळून निघाली ती म्हणजे रंगभूमी आणि तिच्याशी जोडलेले विविध लोक! रंगभूमीचा पडदा काही काळासाठी पडल्यामुळे रंगभूमीशी निगडित लहान मोठे कलाकार, बॅकस्टेजची माणसं, रंगभूषाकार, सफाई कामगार असे सारेच या अचानक आलेल्या संकटात भरडून निघाले आहेत. अशा वेळी या सर्व निराधार लोकांना मदत करण्यासाठी बरेच कलाकार उभे राहिले.
अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि भद्रकाली प्रोडक्शन्सचे सर्वेसर्वा श्री. नवनाथ (प्रसाद) कांबळी यांनीही याच प्रकारचे खूपच स्तुत्य कार्य केले आहे. विविध नाट्यसंस्थांनी एकत्र येऊन सर्व गरजू रंगकर्मींसाठी १० कोटी रुपयांचा “नाट्यकर्मी मदत निधी” उभा करण्याचा मानस व्यक्त केला आहे. तसाच या निधीची सुरुवात म्हणून अखिल भारतीय नाट्य परिषदेने ५० लाख रुपये या मदत निधीला दिले आहेत. त्यांनी तमाम जनतेला आवाहन केले आहे की सर्वांनी यथाइच्छा यथाशक्ती किमान १०० रुपये ते जास्तीत जास्त जमेल तेवढा निधी नमूद केलेल्या अकाउंटमध्ये पाठवावा. आपले बरेच आवडते कलाकार सोशिअल मीडियावर या निधीबद्दल आवाहन करताना दिसत आहेत. रसिक प्रेक्षक रंगभूमीच्या हितासाठी उभ्या केलेल्या या उपक्रमात नक्कीच खारीचा वाटा उचलतील अशी आम्हाला आशा आहे.
जाणून घेऊया श्री. नवनाथ (प्रसाद) कांबळी यांच्याकडून त्यांचं काय आवाहन आहे तमाम रसिक प्रेक्षकांसाठी!
1 Comment
Pingback: ज्येष्ठ अभिनेत्री अश्विनी भावे यांचा गरजू रंगकर्मींना मदतीचा हात! • रंगभूमी.com