आपल्याला आयुष्यात चांगले वाईट असे बरेच अनुभव येतात. त्यामधले काही हलके फुलके अनुभवही कधीकधी आपल्याला आयुष्यभरासाठी काहीतरी बोध आणि गोड़ आठवणी देऊन जातात. असेच काही रंजक अनुभव YouTube च्या माध्यमातून आपल्यासोबत वाटायला सज्ज झाले आहेत आपले लाडके अभिनेते श्री. विजय कदम.
नाट्यसृष्टी ते सिनेसृष्टीपर्यंत स्वतःच्या अनोख्या शैलीत प्रेक्षकांची मने जिंकत आलेला हा बहुगुणी कलाकार आता Youtube द्वारे “कदमखोल” या कार्यक्रमांतर्गत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येथे क्लिक करून तुम्ही कदमखोलचे सर्व एपिसोड पाहू शकता. या कार्यक्रमाचे तीन एपिसोड आजपर्यंत प्रकाशित झाले आहेत. दर दोन दिवसांनी या कार्यक्रमाचा एक नवीन एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कदमखोल हा कार्यक्रम म्हणजे विजय कदम यांच्या आयुष्यातील काही बेमिसाल आठवणींचा संग्रह आहे. या आठवणी कधी मनाला चटका लावून जाणाऱ्या आहेत तर कधी हसवून हसवून पोट धरायला लावणाऱ्याही आहेत. पण या कार्यक्रमाला लाभलेलं मूलभूत नैसर्गिक रसायन म्हणजे श्री. विजय कदम यांचं दिलखुलास आणि साधं सोपं वक्तव्य! हा कार्यक्रम बघताना विजय कदम जणू काही तुमच्यासमोर बसून तुमच्याशी गप्पा मारत आहेत असा तुम्हाला भास होईल. विजय कदम यांची हॉंगकॉंगची परदेश वारी असो अथवा त्यांना भुशी डॅमवर आलेला आणि आपल्याला नि:शब्द करून सोडणारा अनुभव असो सगळं वर्णन धम्मालच आहे. त्या सगळ्या वर्णनावर कळस चढतो तो विजय कदम यांच्या मनोरंजनात्मक सादरीकरणाचा! त्यांची बोलण्याची ढब, देहबोली आणि प्रत्येक गोष्टीचं जिवंत वर्णन करण्याची क्षमता या सगळ्या गोष्टींमुळे त्यांनी प्रेक्षकांसाठी वाढून ठेवलेल्या या मेजवानीची लज्जत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आम्ही ही आशा व्यक्त करतो की या कार्यक्रमाचे अधिकाधिक एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येवोत आणि कदमखोलचा हा रुचकर प्रवास अखंड सुरू राहो.