“खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे!”. असं कै. साने गुरुजी सांगून गेले. या त्यांच्या उक्तीमध्ये जात-धर्म, गरीब-श्रीमंत या जंजाळात अडकून पडलेला मनुष्यप्राणी त्यांना गृहीत असेलच, पण ज्यांना बोलता येत नाही, आपल्या भावना व्यक्तही करता येत नाही अशी मुकी, भटकी जनावरे कुत्री-मांजरी पण असु शकतील.
निष्ठावान असलेला कुत्रा हा पाळीव प्राणी इमानदार आहे तसाच मनुष्याचा सर्वात विश्वासू मित्रपण आहे. कुत्रे आपली कर्तव्ये निष्ठेने पार पडत असतात. म्हणून ते पसंतीस जास्त उतरतात. लोक त्यांचे खूप लाड करतात. त्यांच्या असलेल्या अनेक जातीनुसार त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, वागणुकीच्या तऱ्हा या वेगवेगळ्या असतात.
गार्ड (सुरक्षा), पोलीस, सेनादले इ. ठिकाणी कुत्र्यांच्या विशिष्ट घ्राणेंद्रियांच्या तीव्र आकलन शक्ती फार उपयोगी पडतात. कुत्र्यांचे नाते आपल्या हृदयाशीच जोडलेले असल्याने ते आपल्या कुटुंबातील एक सन्माननीय सदस्यच बनतात. आज मात्र जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे या प्राण्यांकडेही संशयाने पाहिले जात होते. सोशल मिडीयावर तर अनेकानेक अफवांना ऊत आलाय.
कोरोनाच्या भीतीमुळे लोक घाबरून समोर येणारी प्रत्येक माहिती खरी समजून खऱ्याखोट्याची शहानिशा न करता त्यावर योग्य वाटेल ती अंमलबजावणी करत आहेत. गेल्या काही दिवसात घरी पाळलेल्या पाळीव प्राण्यांपासून माणसांना धोका आहे, अशी अफवा social media मधून पसरली. त्यामुळे, ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत असे लोक घाबरून गेले. मग घरातील या दोस्तांना Quarantine मध्ये ठेवावे का? की त्यांना काही लसीकरण करावे, असे प्रश्नही निर्माण झाले. घरातील हे पाळीव प्राणी कुटुंबासाठी किती महत्वाचे असतात ते ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत त्यांनाच समजू शकतं! अगदी थोड्याच अवधीत कळलं की, ही बातमी खोटी आहे. आपण स्वत:ची किंवा घरातील इतर सदस्यांची जशी कोरोनापासून सुरक्षा करत आहोत आणि ज्या काही मूलभूत नियमांचं पालन करत आहोत तसंच या प्राण्यांचंही केलं कि घाबरायचं काहीच कारण नाही! असंच काहीसं सांगणारा संदेश Instagram च्या पोस्ट मधून काही दिवसांपूर्वी प्रख्यात अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांनी दिला.
सौ. निवेदिता जोशी -सराफ या मराठी रंगभूमी /चित्रपटसृष्टीतील एक ठळक व्यक्तिमत्व असून त्यांनी टिळक-आगरकर, अखेरचा सवाल, तुझ्या- माझ्यात, वाहतो हि दुर्वांची जुडी, सं. संशय कल्लोळ, वेगळं व्हायचंय मला, अशा अनेक नाटकांतून तसेच अशीही बनवाबनवी सारख्या रौप्यमहोत्सवी चित्रपटांतून उत्तम अभिनय केला आहे. सद्या टीव्हीवर गाजत असलेल्या “अगंबाई सासूबाई” या मालिकेतील त्यांचा लक्षणीय अभिनय रसिकांची विशेष दाद मिळवून जात आहे. पाळीव प्राण्यांमुळे कोणताही व्हायरस पसरत नाही, फक्त प्रेम आणि प्रेमच पसरतं असंही त्या पुढे म्हणतात.
आणखी एक नाट्य सिनेकलावंत रेशम टिपणीस यांनीही चांगला मुद्दा मांडलाय. त्या अनेक नाटक चित्रपटातून उत्तम अभिनय करत असतात. “वस्त्रहरण” हे सद्या गाजत असलेलं धमाल विनोदी नाटक. श्री. महेश मांजरेकर संचालित “बिग बॉस सीजन १” मध्येही त्यांनी दमदार अभिनय केला होता.
कोरोनामुळे आपण सारेच हादरलोय. आपण आपल्यालाच बंद करून, कोंडून घेतलंय. सुरक्षित आहोत. पण बिचाऱ्या मुक्याभटक्या कुत्र्यामांजरांचं काय! आपलं खाऊन शिल्लक राहिलेलं अन्न एरवी आपण त्यांना देतो. हॉटेलमधील असच राहिलेलं अन्न यावर त्यांची गुजराण होत असते. पण आज ती पण संकटात आहेत. आपल्या सोसायटीचा एखादा कोपरा ठरवून या कुत्र्या-मांजरांसाठी तिथे भांड ठेऊन त्यात थोडंसं पाणी व खाऊ ठेवला तर त्याच्या वासाने ठराविक वेळी येऊन ती खाऊन जाऊ शकतील. त्यांची उपासमार होणार नाही. रेशम टिपणीस यांचा हा विचार निश्चितच स्वागतार्ह आहे. सगळ्यांनीच याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा असं वाटतं.
1 Comment
sundar sandesh