आपला भारत देश अनेक अष्टपैलू रत्नांची खाण आहे असे म्हटले तर मराठी रंगभूमीसुद्धा अशा अनेक नाट्यकलावंतांनी भरलेली नानाविध रत्नांची खाण आहे, म्हटले तर वावगे ठरू नये. दिवसागणिक समृद्ध होत जाणाऱ्या मराठी रंगभूमीला सत्तरच्या दशकात असाच एक चमचमता हिरा सापडला. तो हिरा म्हणजे रीमा लागू!
सिद्धहस्त लेख, नाटककार कै. वसंत कानेटकर यांचे नाटक लेकुरे उदंड झाली यात त्यांनी अभिनय करण्यास सुरुवात केली. १९६० च्या दशकातील ते नाटक. त्यावेळी त्या आपलं शालेय शिक्षण नुकतंच पुरं करत होत्या. पुण्यातील हुजूरपागा शाळेतून शिक्षण घेत असतानाच रीमा लागू यांनी अभिनयाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. १९५८ मध्ये भडभडे कुटुंबात जन्मलेल्या रीमाताईंना अभिनयाचं बाळकडू त्यांच्या आई मंदाकिनी भडभडे यांच्याकडूनच मिळाले. मंदाकिनी भडभडे या मराठी रंगभूमीवर एक कुशल अभिनेत्री म्हणून तेव्हा नावाजलेल्या होत्या.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी लगेचच रंगभूमीवर अभिनय करण्यास सुरुवात केली. “हिरवा चुडा”, “हा माझा मार्ग कला” अशा चित्रपटांतून त्यांनी “बेबी नयन” नावाने सुरुवात केली. पुढे रंगभूमीवर पूर्ण वेळ कलाकार म्हणून कामे करून त्यांनी बाहेरून परीक्षा देऊन पदवी संपादन केली. यावरून त्यांची रंगभूमीवरील निष्ठा व प्रेम लक्षात येते.त्यांनी एकापाठोपाठ एक उत्तमोत्तम अभिनय करून आपला अजोड असा ठसा त्या भूमिकांवर उमटवला.
सविता दामोदर परांजपे, विठू रखुमाई, घर तिघांचं हवं, पुरुष, बुलंद, चल आटप लवकर, झाले मोकळे आकाश, तो एक क्षण ही त्यांची अतिशय गाजलेली नाटकं! हिंदी, मराठी चित्रपट, नाटक तसेच टी. व्ही. मालिकांमधून त्यांनी अभिनय करणे सुरू ठेवले. बॉलिवूडची फेव्हरेट मॉम म्हणून त्या ओळखल्या जात. सलमान खान, काजोल, जुही चावला, माधुरी दिक्षित यांच्या अनेक चित्रपटात त्या आईच्या भूमिकेत दिसल्या. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीची “आई” हरवल्याची भावना आहे. त्यांना अनेक हिंदी चित्रपटांसाठी फिल्मफेअर पारितोषिकाने गौरवण्यात आले आहे. जब्बार पटेल यांचा “सिंहासन” व श्याम बेनेगल यांच्या “कलयुग” या हिंदी चित्रपटात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी मराठी रंगभूमीकडूनही अनेक पारितोषिके मिळवली.
अशा या गुणी अभिनेत्रीचे वयाच्या ५९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने आजच्याच दिवशी २०१७ साली मुंबईला निधन झाले. रंगभूमी.com च्या संपूर्ण टीमकडून रीमा लागू या ज्येष्ठ अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली… आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची काही अजरामर नाटकं आम्ही तुमच्या भेटीला आणत आहोत.