डिसेंबर २०२४ मध्ये अनेक व्यावसायिक नाटकांचा मराठी रंगभूमीवर शुभारंभ होतोय. अनेक नवी व्यावसायिक मराठी नाटकं रंगमंचावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यापैकीच काही नाटकं म्हणजे, ‘स्क्रिप्टीज क्रिएशन्स’ + ‘रंगाई’ निर्मित, संदेश कुलकर्णी लिखित आणि अमृता सुभाष दिग्दर्शित ‘असेन मी.. नसेन मी…‘, ‘अस्मय थिएटर्स’ + ‘प्रवेश क्रिएशन्स’ निर्मित, नीरज शिरवईकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी‘ आणि ‘गौरी थिएटर्स’ निर्मित, ‘प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन’ प्रकाशित, अद्वैत दादरकर लिखित आणि दिग्दर्शित ‘शिकायला गेलो एक!‘. तसेच मराठी रंगमंचावर एक जुनं अजरामर झालेलं, ‘मोरया भूमिका अथर्व’ निर्मित, ‘जाई काजळ आयुर्वेदिक अंजन’ प्रस्तुत, जयवंत दळवी लिखित आणि राजन ताम्हाणे दिग्दर्शित ‘पुरुष‘ हे नाटक नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. याचबरोबर ‘भद्रकाली प्रॉडक्शन्स’ निर्मित, प्रसाद कांबळी प्रस्तुत, प्राजक्त देशमुख लिखित आणि दिग्दर्शित ‘संगीत देवबाभळी‘ हे ‘सर्वाधिक ४० पुरस्कार प्राप्त सर्वोत्कृष्ट नाटक’ रसिक प्रेक्षकांच्या आग्रहाने रंगमंचावर परत आलंय! यामुळे २०२४ वर्षाच्या अखेरीस व्यावसायिक मराठी नाटकांची मंदियाळी आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
Asen Me… Nasen Me… Natak Info
‘असेन मी… नसेन मी…‘ हे एक कौटुंबिक नाटक आहे जे आपण जगत असलेल्या काळाशी फार निगडित असून, वृद्धत्वाच्या मार्मिक पार्श्वभूमीवर आई आणि मुलगी यांच्यातील नाजूक आणि गुंतागुंतीचं नातं या नाटकात मांडलं गेलं आहे. दीपा ही एक स्वतंत्र ज्येष्ठ व्यक्ती आहे जी पुण्यात एकटी राहते. तिची विवाहित मुलगी गौरी ही आईच्या मदतीसाठी घरकामाला मोलकरीण बघत असते ज्याला दीपा हीचा विरोध असतो. गौरी मुंबईत travelling job च्या शोधत असते ज्याने करून आई आणि तीच्यातले भावनिक व शारीरिक अंतर कमी होईल. अशा परिस्थितीत मायेची ऊब आणि नात्यातला तणाव हलका करण्यासाठी दीपाची मावशी वर्षा हीची एन्ट्री होते. रसिक प्रेक्षकांना हसविण्यासाठी व त्यांचे डोळे भरून आणण्यासाठी या तीन महिलांचे पॉवर पॅक प्रदर्शन नक्कीच प्रेक्षकांच्या आत्म्याला स्पर्श करेल. दिग्दर्शक अमृता सुभाष या पुनश्च हनिमून नंतर आता रंगभूमीवर पुन्हा झळकणार असून यावेळी त्या स्वतः दिग्दर्शक म्हणून भूमिका बजावणार आहेत. तसेच संदेश कुलकर्णी यांचं देशील पुनश्च हनिमून नंतर आता ‘असेन मी… नसेन मी…’ हे नवं नाटक मराठी रंगभूमीसाठी लिहिलं गेलंय. या नाटकात मुख्य तीन महिलांच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री देखील तशाच दमदार आहेत, नीना कुलकर्णी, शुभांगी गोखले आणि स्वतः अमृता सुभाष.
Don Vaajun Bavees Minitaanni Natak Info
या नंतर ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी‘ हे एक हॉरर नाटक आहे. केतन आणि ऋतिक एक कपल आहे जे त्यांच्या मुलाच्या जन्मानंतर त्यांचं मुंबईतील स्थायिक जीवन मागे सोडून पाचगणीला जातात. त्यांना एका मोठ्ठं घर हवं असतं जे मोकळ्या जमिनीवर आणि निरभ्र आकाशाखाली असेल. त्यांनी खरेदी केलेल्या जुन्या घराचे रिनोवेशन पूर्ण होण्यापूर्वी, केतन एका ट्रीपला निघून जातो आणि एका आठवड्यात परत येतो. तेव्हा त्याला ऋतिक सांगते की घर पछाडलेलं आहे. याचवेळी त्यांच्या सोबत सोनाली आणि दुर्गेश येतात आणि मग तिथून पुढे सगळा हॉरर ड्रामा सुरू होतो. असे हे नाटक रसिक प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवायला रंगमंचावर येतंय. या नाटकाचे दिग्दर्शक आहेत विजय केंकरे.
Shikaayla Gelo Ek Natak Info
तसेच ‘शिकायला गेलो एक!‘ हे अर्थातच प्रशांत दामले यांचं विनोदी नाटक आहे. महेश साने नावाचा एक पुण्यातील सदाशिव पेठेतला रहिवाशी आहे, जो अतिशय साधा आणि प्रामाणिक माणूस आहे, ज्याला नुकताच आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. अशा आदर्श शिक्षकाकडे, कोल्हापूरच्या आमदाराचा एक अतिशय खोडकर मुलगा श्याम, जो १०वी नापास आहे, तो स्पेशल ट्युशनसाठी येतो. आणि इथून सुरू होतो आदर्श शिक्षक महेश सानेच्या आयुष्याचा उलटा प्रवास. असं हे तुफान विनोदी नाटक रसिक प्रेक्षकांना हसून वेडं करेल यात काही शंका नाही.
Purush Natak Info
आता आपण वळूया रंगमंचावर परत एकदा पाऊल ठेवणाऱ्या जुन्या नाटकांकडे. जयवंत दळवी लिखित ‘पुरुष‘ हे मराठी रंगभूमीवरील प्रचंड लोकप्रिय नाटक आहे, जे पुरुषी वृत्ती आणि वागणुकीला बळी पडलेल्या स्त्रीची कथा मांडतं. हे नाटक पुरुषांमध्ये आढळणाऱ्या अहंकाराला संभोधित करतं आणि या पुरुषी वृतींना बळी पडणाऱ्या स्त्रियांच्या संघर्षावर प्रकाश टाकतं. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मोहन जोशी अशा दिग्गजांनंतर अभिनेते शरद पोंक्षे या नाटकात भूमिका साकारणार आहेत. तसेच अभिनेत्री स्पृहा जोशी देखील आणि अभिनेता अविनाश नारकर हे ही या नाटकात भूमिका साकारत आहेत.
Sangeet Devbabhali Natak Info
यानंतर ‘सर्वाधिक ४० पुरस्कार प्राप्त सर्वोत्कृष्ट नाटक’, ‘संगीत देवबाभळी’ रसिक प्रेक्षकांच्या आग्रहाने रंगमंचावर परत आलंय! हे नाटक संत तुकारामांच्या पत्नी आवली आणि स्वतःची ओळख लखुबाई म्हणून करून देणाऱ्या भगवान विठ्ठलाची पत्नी रखुमाई यांच्यातील संवाद आहे. जुन्या आणि नवीन अभंगाचा समावेश असलेला एक भावपूर्ण संगीतमय प्रवास रसिक प्रेक्षकांच्या मनाच्या आध्यात्मिक प्रवासात नेतो.
नाट्य निर्मिती…
‘असेन मी… नसेन मी…‘ या नाटकाची निर्मिती ही स्क्रिप्टीज क्रिएशन्स + रंगाई यांची आहे.
लेखक: संदेश कुलकर्णी
दिग्दर्शक: अमृता सुभाष
कलाकार: नीना कुळकर्णी, शुभांगी गोखले, अमृता सुभाष
नेपथ्य: प्रदीप मुळ्ये
प्रकाश: प्रदीप मुळ्ये
संगीत: संकेत कानेटकर
वेशभूषाकार: श्वेता बापट
सूत्रधार: दिगंबर प्रभू
‘दोन वाजून बावीस मिनिटांनी‘ या नाटकाची निर्मिती ही अस्मय थिएटर्स + प्रवेश क्रिएशन्स यांनी केली आहे.
लेखक: नीरज शिरवईकर
दिग्दर्शक: विजय केंकरे
कलाकार: अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, रसिका सुनील, गौतमी देशपांडे
नेपथ्य: नीरज शिरवईकर
प्रकाश: शीतल तळपदे
संगीत: अजित परब
वेशभूषाकार: मंगल केंकरे
निर्माते: अजय विचारे
सूत्रधार: श्रीकांत तटकरे
‘शिकायला गेलो एक!‘ या नाटकाची निर्मिती ही गौरी थिएटर्स यांची आहे व प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित, चितळे डेअरी प्रस्तुत…
लेखक: अद्वैत दादरकर (मूळ कथा: द. मा. मिरासदार)
दिग्दर्शक: अद्वैत दादरकर
कलाकार: ऋषिकेश शेलार आणि प्रशांत दामले, अनघा भगरे, समृद्धी मोहरीर, सुशील इनामदार, चिन्मय माहुरकर
नेपथ्य: प्रदीप मुळ्ये
प्रकाश: किशोर इंगळे
संगीत: अशोक पत्की
सूत्रधार: अजय कासुरडे
‘पुरुष‘ या नाटकाची निर्मिती ही मोरया भूमिका अथर्व यांची आहे.
लेखक: जयवंत दळवी
दिग्दर्शक: राजन ताम्हाणे
कलाकार: शरद पोंक्षे, अविनाश नारकर, स्पृहा जोशी, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे
‘संगीत देवबाभळी‘ या नाटकाची निर्मिती भद्रकाली प्रॉडक्शन्स यांची आहे.
लेखक: प्राजक्त देशमुख
दिग्दर्शक: प्राजक्त देशमुख
कलाकार: मानसी जोशी, शुभांगी सदावर्ते
निर्माते: श्रीमती कविता मच्छिंद्र कांबळी
२०२४ या वर्षाच्या अखेरीस रसिक प्रेक्षकांना मिळणाऱ्या या मराठी नाटकाचा प्रवासाला भरभरून प्रतिसाद मिळेल यात काही शंका नाही! या सर्व नाटकांच्या निर्मात्यांना व कलाकारांना रंगभूमी.com तर्फे मनापासून शुभेच्छा!