अलिकडच्या काळातील नाट्य/सिनेसृष्टीला श्री. विजय कदम हे नाव काही नवीन नाही. आपल्या हजरजबाबी विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने केव्हांच जिंकली आहेत. अगदी लहान असल्यापासून त्यांच्यातील अभिनयाचे गुण विकसित होत गेले. सुप्रसिद्ध संगीतकार राम कदम हे त्यांचे वडील.
परळच्या डॉ. शिरोडकर हायस्कुलमध्ये असताना शाळेच्या पाच दिवसीय गणेशोत्सवात प्रत्येक वर्गाचे नाटक वा नृत्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. त्यात ते नाटकांमध्ये हिरिरीने भाग घेऊन वर्गाला व स्वतःला उत्तम पारितोषिक मिळवून देत असंत. त्याचीच पुनरावृत्ती पुढे दिवाळीच्या सुट्टीनंतर होणाऱ्या स्नेहसंम्मेलनातील कार्यक्रमाच्या वेळी होत असे. तेव्हाही हिरिरीने नाट्यप्रवेशात भाग घेऊन ते चमकत असत. आताचे सुप्रसिद्ध कलाकार श्री. नागेश मोर्वेकर यांचीही त्यांना तेंव्हा उत्तम साथ मिळत असे. त्यावेळी होणाऱ्या “उन्मेष”सारख्या स्पर्धांमधून पण ते आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत असत. पुढे त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियात जॉब करता करता सिने-नाट्यसृष्टिची सेवा चालूच ठेवली.
रथचक्रसारख्या नाटकांतून त्यांना लालन सारंग यांच्यासह काम करायला मिळाले. पुढे श्री. पुरुषोत्तम बेर्डे आणि इतर बऱ्याच मातब्बर कलाकारांच्या दिग्दर्शनाखाली लक्ष्मीकांत बेर्डे इ. सह टूरटूर सारख्या नाटकांत काम करायला मिळाले. “विच्छा माझी पूरी करा” या वगनाट्यातून त्यांचा विनोदी अभिनय चांगलाच बहरला. आम्ही आलो रे, सही दे सही ही नाटकेही त्यांनी चांगलीच गाजवली. पप्पा सांगा कुणाचे हेही असेच लक्षात रहाण्याजोगे नाटक.
त्यांचे हे गाजलेले चित्रपट.. पोलीस लाईन्स, बच्चे सबसे अच्छे (२०१३), भेट तुझी माझी (२०१३), सांडू हवालदार (२०१३), लावू का लाथ (२०१२), गोळा बेरीज (२०१२), ऑन डयुटी २४ तास (२०१०), टोपी घाला रे (२०१०), सासू नंबरी जावई दास नंबरी, वासुदेव बळवंत फडके (२००७), चष्मेबद्दूर (२००६), मंथन : एक अमृत प्याला (२००६), रेवती (२००५), तोचि एक समर्थ (२००४), देखणी बायको नामयाची(२००१), तेरे मेरे सपने (१९८६), ट्रॅफीक पोलीसचा रोल, हळद रुसली कुंकू हसलं (१९८९), मधुचंद्राची रात्र (१९८२), आनंदी आनंद (१९८७), इरसाल कार्टी (१९८७), बाळ्याचा रोल -आम्ही दोघे राजाराणी (१९८६) त्यांनी अशा चित्रपटांतूनही अतिशय उत्तम रित्या कामे केली. पुढेही रंगभूमी त्यांच्या कडून अशाच उत्तम अभिनय सेवेची अपेक्षा ठेवते. त्यांनी केलेल्या यादगार आणि अप्रतिम नाटकांपैकी काही नाटकांचा आनंद तुम्ही येथे नक्कीच घेऊ शकता.
1 Comment
Pingback: विजय कदम यांच्या YouTube द्वारे कदमखोल गप्पा • रंगभूमी.com