मराठी माणूस आणि नाटक यांच एक अजब असं मेतकूट आहे. त्यात तो माणूस कोकणातला मालवणकडचा असेल तर दुधात साखर! कारण कीत्येक शतकांपासून इथे होत असलेली दशावतारी नाटके, शिमग्यातील खेळे, सोंगे, भारुडे इ. हि त्यानेच जपलेली आतापर्यंतची मनोरंजनाची सांस्कृतिक मूल्ये! या रंगभूमीवर आतापर्यंत शुध्द मराठी भाषेतून येत असलेली मराठी नाटके रसिक प्रेक्षक चोखंदळपणे पहात होता. पण कोकणात जन्मलेल्या एका मराठी मालवणी भाषिक माणसाने मालवणी बोलीभाषेतून “वस्त्रहरण” हे नवंकोर नाटक रंगभूमीवर आणून रंगमंच आणि रसिकांसाठी मनोरंजनाचे आगळेवेगळे नवे दालन उघडे केले.
कै. मछिंद्र कांबळी यांनी लोकनाट्याचा बाज असलेलं धमाल विनोदी मालवणी नाटक “वस्त्रहरण” रंगमंचावर आणून इतिहास घडवला. प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक श्री. मोहन तोंडवळकर यांनी १९७३ साली नाटकासाठी त्यांना रोल देऊ केला. इथेच त्यांच्या पुढील यशस्वी कारकीर्दीची मुहूर्तमेढ रोवली गेली. इथून त्यांनी मागे वळूनही पहिले नाही. त्यांना काही कारणाने नंतर बाहेर पडून १६ फेब्रु. १९८० साली “भद्रकाली” हि स्वतःची नाट्यसंस्था स्थापन करावी लागली. त्यासाठी त्यांना आपल्या पत्नीचे दागिनेही गहाण ठेवावे लागले होते.
कै. कांबळी यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेवंडी या गांवी १९५२ मध्ये झाला. अगदी लहानपणीच त्यांच पितृछत्र हरपलं. आईनेच त्यांना वाढवले. नाट्यकलेविषयी त्यांना लहानपणापासून आपूलकी होती. त्यांनी फक्त १५ रु. त बॅकस्टेज वर्करच काम केले. पडदे ओढणे, कपडेपटाला इस्त्री करून ठेवणे इ. कामेही ते करत. पुढे “भद्रकाली” ची स्थापना झाल्यावर त्यांनी पांडगो इलो रे बा इलो, घास रे रामा, येवा कोकण आपलाच आसा, माझा पती छत्रपती, वय वर्षे ५५ अशी धमाल विनोदी नाटके देण्याचा सपाटा लावला. इथे संजिवनी जाधव अभिनेत्रीबरोबर त्यांची चांगली जोडी जमली. काही मराठी चित्रपटातूनही त्यांनी कामे केली. काही काळ नाट्यपरिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी यशस्वीपणे काम पार पाडले. काँग्रेस पक्षाकडून लोकसभेसाठीही त्यांनी निवडणूक लढवली पण ते पराभूत झाले. लेखक, निर्माता, दिग्दर्शक व नट असलेलं हे चतुरंगी व्यक्तीमत्व ३० सप्टें. २००७ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रंगभूमीला पोरकं करून गेलं. त्यांच्या पश्च्यात त्यांचे सुपुत्र श्री. प्रसाद कांबळी हे “भद्रकाली” ची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत.
अशा या मालवणी भाषेतील नाटकांना रंगभूमीवर मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या बहुगुणी कलाकाराची काही बेमिसाल नाटके खास तुमच्या भेटीला अनंत आहोत.
2 Comments
Pingback: अनिल कासकर यांचा अभिनेता ते रंगभूषाकारापर्यंतचा प्रवास • रंगभूमी.com
Pingback: बोलीभाषा एकांकिका स्पर्धा — प्रवेश अर्ज व नियमावली • रंगभूमी.com