रंगभूमीने आपल्याला काही किमयागार नाटकं दिली आणि कलाकारही दिले. अशा कलाकारांची यादी बनवायची झालीच तर एक नाव अगदी ठळकपणे समोर येईल. हास्यरसाने परिपूर्ण नाटकांचा खजिना! लाखो प्रेक्षकांच्या मनावर तब्बल ३७ वर्ष गारुढ करून राहिलेला विनोदवीर! आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल पाच रेकॉर्डस् केलेला नाट्यवीर म्हणजेच… प्रशांत दामले!
विकिपीडिया सांगतं की, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये प्रशांत दामले यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्ड्स नोंदली गेली आहेत. त्यांमध्ये २४ डिसेंबर, इ.स. १९९५ रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे चार प्रयोग, इ.स. १९९५ साली ३६५ दिवसांत ४५२ प्रयोग, इ.स. १९९६ साली ३६५ दिवसात ४६९ प्रयोग व १८ जानेवारी, इ.स. २००१ रोजी एकाच दिवशी केलेले तीन नाटकांचे पाच प्रयोग समाविष्ट आहेत.प्रशांत दामले यांनी आतापर्यंत (१८ नोव्हेबर २०१९) एकूण १२,२०० नाट्यप्रयोग केले आहेत. ५ जानेवारीला २०१३ रोजी प्रशांत दामले यांनी ’गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचा केलेला प्रयोग अनुक्रमाने १७४६वा होता.
समोर बसलेल्या प्रेक्षकाला खुर्चीवर कसं खिळवून ठेवायचं आणि कसं हसवून हसवून संम्मोहित करून टाकायचं हे या विनोदवीराला चांगलंच ठाऊक आहे आणि त्यात गळा गोड़ असणं म्हणजे प्रेक्षक वर्गासाठी एक सुखद पर्वणीच! प्रशांत दामले आणि अशोक पत्की या सुरेल समीकरणाचा उत्तम दाखला म्हणजे, “मला सांगा… सुख म्हणजे नक्की काय असतं…!!!” आलं ना चेहऱ्यावर हसू?
अशा या नाट्यवीराच्या नाट्यकृती बघणं म्हणजे नटवेड्या माणसाला मिळालेली मेजवानीच! म्हणूनच, प्रशांत दामलेंच्या गाजलेल्या काही नाटकांचा नजराणा खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
एका लग्नाची गोष्ट
चार दिवस प्रेमाचे
गेला माधव कुणीकडे
जादू तेरी नजर
ब्रम्हचारी
मोरुची मावशी
विनोदाची ही मेजवानी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि अजून कशा प्रकारचे संग्रह तुम्हाला आमच्याकडून अपेक्षित आहेत तेही सांगा. आम्ही लवकरंच अजून काही नाट्यसंग्रह घेऊन येऊ. तोपर्यंत हसत राहा आणि इतरांना हसवत राहा. “अरे! हाय काय आणि नाय काय!”
[Featured Image via PrashantDamle.com]