विश्वात घडणाऱ्या अनेक घटना आणि घडामोडींचा बुद्धिनिष्ठ पद्धतीने केला जाणारा अभ्यास म्हणजे विज्ञान. मुंबईमधील मराठी विज्ञान परिषद प्रामुख्याने विज्ञानाचा मराठी भाषेतून प्रसार करण्यासाठी, विज्ञानाचे जीवनात महत्व वाढविण्यासाठी आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रगती करण्याच्या उद्देशाने वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. कार्यशाळा घेणे, अभ्यासक्रम घेणे, शिष्यवृत्ती योजना देणे, अनेक स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करणे, त्यामार्फत अनेक पुरस्कार आणि पारितोषिके देणे असे अनेक उपक्रम राबविले जातात.
२०१५ पासून मराठी विज्ञान परिषद राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करत आहेत. यंदाच्या वर्षीसुद्धा ही स्पर्धा ‘शैक्षणिक’ म्हणजेच इयत्ता आठवी ते बारावी आणि ‘खुल्या’ अशा दोन गटांत होणार आहे.
स्पर्धेच्या अटी
- कथेमध्ये वैज्ञानिकाने केलेले संशोधन, त्यामध्ये आलेल्या अडचणी यांवर विशेष भर असावा.
- विज्ञान कथा, वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञानाधारीत कल्पनाविलास असे विषय या स्पर्धेसाठी घेतले जाऊ शकतात.
- अंधश्रद्धा, सण आणि त्यामागील विज्ञान हे विषय वगळले जावे.
- व्हिडिओ काढताना कोणतेही शॉट न लावणे, कोणत्याही प्रकारचे एडिटिंग न करता पूरक प्रकाशात सलग व्हिडिओ बनवून पाठवणे.
- नियमांचे उल्लंघन केल्यास पाठवलेली एकांकिका ग्राह्य धरणार नाही.
५००/- प्रवेश फी असून प्रवेशिका भरण्याची अंतिम तारीख १ ऑगस्ट २०२२ आहे. कोरोनाची महामारी लक्षात घेता या स्पर्धेची प्राथमिक फेरीही व्हिडिओ स्वरूपात १ सप्टेंबरपर्यंत स्वीकारली जाणार असून ही फेरी विभाग स्वरूपात असेल.
प्रत्येक विभागातून प्रथम तीन एकांकिकांना अंतिम फेरीसाठी निवडण्यात येईल. तसेच प्राथमिक फेरीतसुद्धा पारितोषिक दिले जाईल. या स्पर्धेची अंतिम फेरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार असून ती प्रत्यक्ष रंगमंचावर किंवा व्हिडिओ स्वरूपात ही होऊ शकते. अंतिम फेरीत प्रथम पारितोषिक ३१,०००/- द्वितीय २१,०००/- तर तृतीय ११,०००/- असेल.
तसेच, लेखन, दिग्दर्शन, संगीत, प्रकाशयोजना, नेपथ्य, अभिनेत्री, अभिनेता असे वैयक्तिक पारितोषिक देण्यात येणार आहेत. या विज्ञान स्पर्धेत एक्सपेरीमेंट, मारी क्युरी- एक संघर्ष, विज्ञान सुखी जीवनाचा धागा, डोरा – ए केस स्टडी, दी डार्क लाईट, दूरदर्शी गॅलिलिओ, प्रयत्नांती परमेश्वर, फ्लेमिंगो, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, दुसरा आइन्स्टाइन आणि मारिया या २०२१ पर्यंतच्या प्रथम विजेता एकांकिका आहेत.
मातृभाषेत विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे नाटक. २०१५ साली मराठी विज्ञान परिषदेला ५० वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने अध्यक्ष पद्मश्री प्रा. ज्येष्ठराज जोशी यांनी एकांकिका स्पर्धा करण्याची संकल्पना मांडली. पहिल्या वर्षी ११ गट स्पर्धेत सहभागी झाले त्यानंतर प्रतिसाद वाढत गेला. कोरोना काळात आम्ही ही स्पर्धा सुरू ठेवली आणि सुदैवाने अंतिम फेरी प्रत्यक्ष रित्या पार पडली. सांस्कृतिक कार्यक्रम करणारे महाराष्ट्र शासन यांच्या मान्यतेने आम्ही स्पर्धेचे आयोजन करतो.
रवींद्र ढवळे (संयोजक)