अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बोरिवली शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खुल्या मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी २२ एप्रिल रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली येथे पार पडणार आहे. अंतिम फेरीत दाखल झालेल्या संस्था आणि एकांकिका पुढीलप्रमाणे आहेत.
म्हॅsss (सृजन द क्रिएशन)
‘म्हॅsss’ ही अनेक वर्षांपूर्वी साधारण ४०, ४५ वर्षांपूर्वी कै. रमेश पवार ह्यांनी लिहिलेली एकांकिका. एकेकाळी अशोक सराफ यांनीही ही एकांकिका सादर केली आहे. म्हॅsss ह्या एकांकिकेत अभिनयाचे सर्व प्रकार समाविष्ट झालेले आहेत आणि नटांसाठी एक प्रचंड मोठा व्यायाम असलेली ही एकांकिका आहे. तर ह्या वेळेला ‘सृजन द क्रिएशन’तर्फे ही एकांकिका पहिल्यांदा २ मुली वनमाला वेंदे आणि ऐश्वर्या परशुरामे सादर करीत आहोत आणि त्यासाठी संपूर्ण टीमचे जीव तोडून प्रयत्न सुरू आहेत.
शक्याचे प्रयोग (प्रयोग मालाड)
स्वातंत्र्य पूर्वकाळात भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या थोर व्यक्तींनी लढा उभारला, त्यातील अग्रगण्य नाव म्हणजे “महात्मा गांधी”. महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिश सरकारच्या राजवटीविरुद्ध आपला लढा सुरू ठेवला. संपूर्ण भारतात महात्मा गांधींचे असंख्य अनुयायी तयार झाले. गांधींच्या आचार-विचारांचा पघडा त्यांच्या अनुयायांवर पडू लागला.
महात्मा गांधींचे विचार आणि त्यांनी केलेले प्रयोग याची ख्याती भारतासह जगातील अनेक देशात पसरू लागली. भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांचा देश म्हणजेच इंग्लंडसुद्धा यात एक होता. इंग्लंडच्या नागरिकांवरसुदधा गांधींच्या विचारांचा प्रभाव पडू लागला होता. ते नकळतपणे महात्मा गांधींचे अनुयायी बनून त्यांच्या विचारांचा प्रसार करू लागले आणि त्यांच्या प्रयोगांचे अनुकरण करू लागले. यामुळे इंग्लंडमधील अधिकारी त्यांच्या या नागरिकांवर कारवाई करू लागले. तसेच इंग्लडमधील लोक आपल्याच समाजातील या गांधींच्या अनुयायांविरुद्ध उभे राहू लागले. संभाजी सावंत यांनी “शक्याचे प्रयोग” या एकांकिकेत इंग्लंडमधील याच परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
दोरखंड (आपलं घर, अहमदनगर)
शहरात दंगल उसळते. या दंगलीत एक मुस्लिम धर्माची गरोदर स्त्री आणि एक हिंदू तरुण एका सार्वजनिक शौचालयात अडकतात. दोघेही रात्रभर तिथेच राहण्याचा निर्णय घेतात. रात्रभर तिथे थांबून ते आपला जीव वाचवू शकतात की नाही याची ही गोष्ट आहे.
जीर्णोद्धार (अभिनय, कल्याण)
तिर्थक्षेत्र, देवस्थानं हे सगळ्यांच्याच आवडीचे विषय, पण अशा हया पवित्र श्रद्धास्थानानावर देखिल वाईट आठवणींचे ढग दाटलेले आहेतच, मग ती २००५ सालची मांढरदेवी दुर्घटना असो किंवा, २०१३ ची मध्यप्रदेश मधील रतनगड माता मंदिरातील चेंगराचेंगरीची घटना असो. असे प्रकार वारंवार दिसून येतात. अश्या वातावरणात माणसांमधला देव शोधू सांगणारी एकांकिका “जीर्णोद्धार”, हया एकांकिकेचं लेखन केल आहे अभय नवाथे ह्यांनी तर दिग्दर्शन केले आहे अभिजित झुंझारराव ह्यांनी. सादरकर्ता संघ आहे “अभिनय, कल्याण”.
कारागार (अभिरुची, मुंबई)
कारागार ही एकांकिका ८० च्या दशकात सुरेश चिखले यांनी लिहिली. ८० चे दशक एकांकिकेचा सुवर्णकाळ समजला जातो.
८० च्या दशकात कामगार चळवळ, राजकीय आणि सामाजिक नेतृत्वात चढा ओढ होती. तरुणांना आपल्याकडे ओढण्याच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या, वेगवेगळी आमिषे दाखवून त्यांच्या मनामध्ये भुसा भरण्याचे काम त्या वेळेचे सामाजिक राजकीय नेतृत्व करीत होते. ‘कारागार’ एकांकिकेत हेच वास्तव दाखवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. एकांकिकेचे दिग्दर्शन सुरेश गांगुर्डे यांनी केलेले आहे.
सुवर्ण कलश स्पर्धेची अंतिम फेरी २२ एप्रिल रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली येथे पार पडणार आहे. दुपारी ४ वाजल्यापासून अंतिम फेरीस सुरुवात होणार आहे. तुम्हीही प्रेक्षक म्हणून या संपूर्ण सोहळ्याला उपस्थित राहू शकता. अंतिम फेरीचे तिकीट शुल्क फक्त १००/- आकारण्यात आले आहे.
पारितोषिके
प्रथम एकांकिका २१०००/-
द्वितीय एकांकिका १५०००/-
कै. विनोद शहा स्मृती विशेष लक्षवेधी एकांकिका ७५००/-
सर्वोत्कृष्ट लेखक १५००/-
दिग्दर्शन
प्रथम १५००/-
द्वितीय १०००/-
अभिनय (पुरुष)
प्रथम १५००/-
द्वितीय १०००/-
अभिनय (स्त्री)
प्रथम १५००/-
द्वितीय १०००/-
नेपथ्य १०००/-
प्रकाश १०००/-
पार्श्वसंगीत १०००/-
सुवर्ण कलश स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालेल्या सर्व स्पर्धक संघांना खूप खूप शुभेच्छा! रसिक प्रेक्षक जास्तीत जास्त संख्येत या अंतिम फेरीस उपस्थित राहून स्पर्धक संघाचे मनोबल वाढवतील हीच सदिच्छा आम्ही व्यक्त करतो.
1 Comment
Pingback: सुवर्ण कलश २०२२ अंतिम फेरी — निकाल • रंगभूमी.com