कित्येक महिने लॉकडाऊनमुळे बंद पडलेला पडदा आता हळूहळू प्रेक्षकांसाठी उघडू लागतोय याबद्दल आपण सारेच ज्ञात आहोत. पण नाटकाचा रुपेरी पडदा नव्याने उघडत असताना मुंबईमध्ये गेली कित्येक वर्षे कार्यरत असलेल्या प्रयोग मालाड या संस्थेने मात्र एक आगळेवेगळे आणि कलापूर्ण पाऊल उचलले आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रयोग मालाड ही संस्था समस्त प्रेक्षकवर्गासाठी आणि खास करून आजच्या तरुण पिढीसाठी एकांकिकांच्या सोनेरी काळाशी समरस होण्याची एक अभूतपूर्व संधी घेऊन येत आहे.
इतिहासातील सोनेरी पाने
नावावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की या उपक्रमातून आपल्याला काही वर्षे मागे जाऊन रंगभूमीचे एक नयनरम्य रुप पाहायला मिळणार आहे. जुन्या आणि प्रतिष्ठित लेखकांच्या अजरामर लेखनाने समृद्ध अशा एकांकिकांचा पाऊस पडणार आहे. या उपक्रमाची जमेची बाजू म्हणजे या संस्थेने हा उपक्रम ऑनलाईन माध्यमातून आयोजिण्याचे ठरविले आहे. हा कार्यक्रम २ जानेवारी, २०२१ पासून सुरू होत आहे. प्रत्येक शनिवारी रात्रौ १० वाजता एक एकांकिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ऑनलाईन तिकीट विक्रीदेखील पुढील लिंकवर सुरू झालेली आहे.
“२ जानेवारी २०२१ रोजी श्री. विजय मोंडकर लिखित आणि श्री. प्रमोद शेलार दिग्दर्शित गुण्यागोविंदाने तसेच ९ जानेवारी २०२१ रोजी साठा पत्रोत्तराची कहाणी असफल अपूर्ण ही कै. चंद्रमणी तूर्भेकर लिखित आणि श्री. विठ्ठल जाधव दिग्दर्शित एकांकिका प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे,” असे प्रयोग मालाडचे कार्यध्यक्ष श्री. प्रदीप देवरुखजर यांनी रंगभूमी.com ला सांगितले. “यापुढील एकांककिकांचे वेळापत्रक आम्ही येत्या काही दिवसात जाहिर करू.”
या उपक्रमाचे वार्षिक सभासदत्व ₹१६००/- असून त्रैमासिक सभासदत्व ₹५००/- असे आहें. तसेच प्रत्येक एकांकिका पाहण्यासाठी तात्पुरते सभासदत्व ₹५५/- आहे.
या सुवर्णसंधीचा पुरेपूर फायदा घेऊन नव्या वर्षाची सुरुवात तुम्ही “इतिहासातील सोनेरी पाने” या नयनरम्य उपक्रमाने कराल याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे त्वरा करा आणि आजच तुमचे तिकीट बुक करा.