अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे दरवर्षी गोविंद बल्लाळ देवल स्मृतिदिनाप्रीत्यर्थ आयोजित करण्यात येणारा पुरस्कार वितरण सोहळा यावर्षीही दणक्यात पर पडला. यावर्षी सोहळ्याचं प्रमुख आकर्षण होतं ते म्हणजे सोहळ्याचं स्थळ! गेले काही वर्षे बंद पडलेलं माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल या सोहळ्याच्या प्रेक्षक आणि रंगकर्मींसाठी सुरू करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि आपले लाडके अभिनेते प्रशांत दामले यांनी नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम ३० मे रोजी सुरू केल्याचे कळविले. तसेच तब्बल १४ दिवस कसोशीने पाठपुरावा करत नाट्य संकुल पुनर्जीवित करण्यासाठी १४ जून ही तारीख गाठता आली याबद्दल हर्षही याप्रसंगी व्यक्त केला. अजूनही ७०% च काम झाले आहे आणि बाकी कामही लवकरच पूर्ण होईल असे आश्वासनही प्रशांत दामले यांनी दिले.
लॉकडाऊननंतर कूर्मगतीने का होईना पण रंगभूमी हळूहळू पुन्हा श्वास घेऊ लागली. परंतु, माटुंग्याचे यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल बंदच होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षस्थानी निवडून येताच प्रशांत दामले यांनी हे नाट्यगृह तत्परतेने सुरू करण्याचं धनुष्य हाती घेतलं. १४ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने ज्या थाटात हे नाट्यगृह पुन्हा सुरू झाले आहे त्याला तोड नाही. जवळपास अख्खी नाट्यसृष्टी यावेळी उपस्थित होती. आजच्या काळातले दोन आघाडीचे आणि माननीय दिग्दर्शक विजय केंकरे आणि चंद्रकात कुलकर्णी यांच्या हस्ते पूर्ण जोशात कार्यक्रमाला तिसरी घंटा देण्यात आली. संपूर्ण नाट्यगृह त्या जोशात भारावून गेलं आणि सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट घुमून लागला. पडदा उघडला. बऱ्याच मालिका व चित्रपटांतून आपल्या भेटीस येणारे गुणी अभिनेते विद्याधर जोशी यांनी सूत्रसंचालनाची धुरा उत्तमरीत्या सांभाळली. त्यांनी सांगितलेल्या किस्स्यांनी कार्यक्रम अधिकाधिक बहरत गेला. पुढे, ज्येष्ठ पत्रकार व संगीत नाटककार स्वर्गीय विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना श्रद्धांजली देत त्यांची गाणी, गायन व नृत्यप्रकारात सादर करण्यात आली. स्मृती तळपदे यांनी त्यांच्या ग्रुपसोबत सुंदर नृत्ये सादर केली. तर स्वर्गीय रामभाऊ मराठे यांचे सुपुत्र मुकुंद मराठे यांनी काही गीते सुरेल आवाजात गाऊन सादर केली. त्यानंतर एक बैठकीची लावणीही सादर करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाने सोहळ्याची शान नक्कीच वाढवली. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास दाखविणाऱ्या ‘सागरा प्राण तळमळला’ या नाटकातील एक प्रवेश सादर करण्यात आला.
Yashwantrao Chavan Matunga Re-Opening Date
केदार शिंदे आणि संतोष पवार यांनी शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत त्यांनीच लिहिलेले व ताज्या घडमोडींवर विनोदी ढंगात भाष्य करणारे एक खुसखुशीत भारूड सादर केले.
लॉकडाउनमध्ये ज्या बॅकस्टेज कलाकारांना प्रशांत दामले यांनी मदत केली त्या बॅकस्टेज कलाकारांनी कृतार्थ भावनेने प्रशांत दामले यांना व्यासपीठावर आमंत्रित करुन मानाचा फेटा बांधला. जोवर फेटा बांधला जात होता तोवर प्रेक्षकांकडून टाळ्यांचा वर्षावही सुरुच होता.
मध्यांतरानंतर व्यासपीठावर मान्यवरांचे आगमन झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत, परिषदेचे अध्यक्ष व अभिनेते प्रशांत दामले, ज्येष्ठ अभिनेते व परिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी, ज्येष्ठ कवी, लेखक व नाटककार प्रेमानंद गजवी, कोषाध्यक्ष शशी लोटके, प्रमुख कार्यवाह अजित भुरे, ज्येष्ठ रंगकर्मी अशोक हांडे अशा दिग्गज मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
वामन पंडित लिखित रंगवाचा या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवर प्रेमानंद गजवी व एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. झाडीपट्टीतील रंगभूमीचे ज्येष्ठ विनोदी नट डॉ. परशुराम खुणे यांना काही महिन्यांपूर्वी पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांनाही आज सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावर्षी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी व ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. ज्येष्ठ रंगकर्मी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या लेखणीने समॄद्ध झालेल्या शब्दांकनाने त्यांना सन्मानित करण्यात आले. या लिखित स्मृतिसुमनाचे वाचन अनुक्रमे अतुल परचुरे व संजय मोने या दिग्गज अभिनेत्यांनी केले. मोहन जोशी यांनी पुरस्कार स्वीकारत, उपस्थित मान्यवर, मायबाप रसिक प्रेक्षक, कुटुंबीय यांचे आभार मानले. तर, वंदना गुप्ते यांनी, ‘लेखकांनी नवीन लेखन करायला घ्यावं… मी अजूनही उभी आहे!’, असे त्यांच्या बेधडक शैलीत सांगितले.
अध्यक्ष प्रशांत दामले यांनी याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर काही मागण्या ठेवल्या. यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे १० कोटींची मागणी करण्यात आली आहे व त्यांनी ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले आहे.
अतिशय आश्वासक आणि सकारात्मक वातावरणात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सर्व आयोजक, सहकारी व स्वयंसेवकांचे आभार मानत कार्यक्रमाची संगता करण्यात आली.