जळगावसह खानदेशच्या मातीच्या, भाषेचा गोडवा आणि वैविध्यपूर्णता जपत नाटक, साहित्य, संगीत आणि नृत्य या सांस्कृतिक क्षेत्रात क्रियाशील असलेली संस्था, म्हणून परिवर्तन ओळखली जाते. गेल्या काही वर्षांपासून परिवर्तनच्या नाटकांचे व सांगीतिक कार्यक्रमांचे महोत्सव राज्यभर होत असतात. तर यावर्षी ‘वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान‘ आयोजित ‘परिवर्तन कला महोत्सव’ कणकवली येथे पार पडणार आहे.
कोरोनामुळे मागील वर्षी आठ महोत्सव रद्द करण्यात आले होते. म्हणून यावर्षी २५, २६ व २७ फेब्रुवारी २०२२ असे तीन दिवस हा सोहळा अगदी जल्लोषात पार पडणार आहे.
दि. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी महोत्सवाची सुरुवात बहिणाईंच्या कविता व गाण्यांवर आधारित ‘अरे संसार संसार‘ या सुरेल मैफिलीने होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना विजय जैन यांची असून दिग्दर्शन नारायण बाविस्कर यांचे आहे. परिवर्तनचे कलावंत या कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत.
दि. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी श्रीकांत देशमुख लिखित, शंभु पाटील नाट्यरुपांतरीत व योगेश पाटील दिग्दर्शित ‘नली‘ हे एकलनाटय सादर होणार आहे व या एका निरपेक्ष प्रेम कहाणीचे सादरीकरण हर्षल पाटील करणार आहेत.
दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी शंभु पाटील लिखित व मंजुषा भिडे दिग्दर्शित ‘अमृता साहिर इमरोज‘ हे नाटक सादर होणार आहे व या नाटकाचे सादरीकरण परिवर्तनचे कलावंत पार पाडणार आहेत. या सगळ्या प्रयोगांसाठी प्रवेश अगदी मोफत आहे.
तीन दिवस, एकाच संस्थेची निर्मिती असलेले तीन उत्तम कार्यक्रम आपल्या भेटीस आणणारा खानदेशचा महोत्सव कोकणात पहिल्यांदा होतो आहे. या महोत्सवाचे आयोजन कणकवली येथील आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात होणार आहे. आचरेकर प्रतिष्ठानसारख्या अतिशय प्रसिद्ध संस्थेने परिवर्तन जळगावचा हा केलेला सन्मान आहे. परिवर्तनची नाटके व सांगीतिक कार्यक्रम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सादर होत असतात. ही जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी ऊर्जा देणारी गोष्ट आहे.
सर्जनशील निर्मिती हे परिवर्तनचे वैशिष्ट्य आहे. ‘अरे संसार संसार’ या नाटकाचे आतापर्यंत २६ प्रयोग, ‘नली’चे ५१ प्रयोग व ‘अमृता साहीर इमरोज’चे ५ इतके यशस्वी प्रयोग झाले आहेत. या महोत्सवाला कांताबाई व भवरलाल जैन ट्रस्ट यांचे सहकार्यदेखील लाभले आहे. या महोत्सवासाठी आचरेकर प्रतिष्ठानचे वामन पंडित, शरद सावंत हे मेहनत घेत आहेत. कोकणातील हा महोत्सव परिवर्तनसाठी खूप महत्वाचा आहे. या महोत्सवाची तयारी सुरू असून अनेकांनी परिवर्तनचे अभिनंदन केले आहे.
तेव्हा रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसादात परिवर्तन कला महोत्सवाला भेट द्यावी आणि मातीतल्या या कलाप्रकारांचा पुरेपूर लाभ घ्यावा.