मंडळी, आपण वेगवेगळ्या नाट्यगृहांमध्ये भव्य दिव्य स्वरुपात सुमारे ३ दिवस ते अगदी महिनाभर सुरू राहणारे नाट्यमहोत्सव बघत आलो आहोत. परंतु, एखाद्या गावामध्ये, जिथे एकही नाट्यगृह नाही अशा ठिकाणी एक माणूस नाट्यमहोत्सव आयोजित करण्याचे धाडस करतो हे ऐकूनच किती भारावून जायला होतं. अशीच एक कल्पना चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील प्रा. परसू गावडे यांच्या डोक्यात आली आणि त्यातून चंदगडी नाट्य महोत्सवाचा आरंभ झाला.
कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर चंदगडी नाट्यमहोत्सवाची तिसरी घंटा ९ जानेवारीपासून वाजणार आहे. चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे यंदा चौथा चंदगडी नाट्यमहोत्सव होत आहे. ग्रामीण भागातील नाट्यरसिकांना महाराष्ट्र्भरातील नाट्यपरंपरा बघता यावी यासाठी या नाट्यमहोत्सवाची सुरूवात केल्याचे प्रा. परसू गावडे सांगतात. तालुक्यात एकही खुले किंवा बंदीस्त नाट्यगृह नाही. अशा वेळी नाटक करणारी मुले कोणत्या तरी घराच्या मोठ्या खोलीत किंवा परसात तालीम करून आजही स्पर्धा करतात. मग त्यासाठी शाळा मंदिर शिवाय पर्याय उरत नाही. अशा वेळी परसू गावडे आणि त्यांच्या मित्रांनी नाटक घडावं यासाठी मोठा तंबू आणि रंगमंच तयार करून नाट्यमहोत्सव करण्याचे धाडस केले. या नाटकांसाठी लागणारे प्रायोजक मिळवले. प्रसंगी पदर मोड केली. पण नाट्यमहोत्सव सुरू केला.
या अनोख्या सोहळ्याची छोटीशी झलक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा रंगभूमी.com चा मानस आहे. त्यासाठी तुमच्याकडून छोट्याशा का होईना, प्रोत्साहन मूल्याची अपेक्षा आहे. इच्छुकांनी पुढील लिंकवर क्लिक करून आम्हाला मदत करण्यास पुढे यावे जेणेकरून, चंदगड येथे प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला या महोत्सवाचे जिवंत दर्शन घडवून देणारा एक व्हिडिओ आम्हाला तुमच्या पर्यंत पोहोचवता येईल.
गस्त, ऱ्हासपर्व, घोकंपट्टी डॉट कॉम, अक्कड बक्कड, तुझ्यात जीव रंगला, नियतीच्या बैलाला, पूर्णविराम, ह्येच्या आईचा वग, या भूतानो या, घटोत्कच, विच्छा माझी पूरी करा अशी एक ना अनेक दर्जेदार नाटकांची पर्वणी चंदगड तालुक्यातील नाट्यरसिकांना या महोत्सवाअंतर्गत पाहायला मिळाली आहेत.
तिकीटबारीवर आणि नाट्यगृहावर हाऊसफुल्लचे बोर्ड लागलेल्या नाट्यकलाकृत्ती या महोत्सवात सादर होत असल्याने चंदगडी नाट्य महोत्सवात आठ दिवस सादर होणारी नाटकंही हाऊसफुल्ल होत असतात. यानिमित्ताने येथील स्थानिकांना पुणे, कोकण, मुंबई, सोलापूरच्या कलाकारांना बघण्याची संधी मिळते. चंदगडी नाट्यमहोत्सव बघायला प्रक्षकांची गर्दी बघण्यासारखी असते. निम्म्याहून जास्त नाटके हाऊसफुल्ल होतात. तंबू बाहेर लागणारा हा ‘हाऊसफुल्ल’ बोर्ड बघताना आतापर्यंत नाट्यचळवळीसाठी खाल्लेल्या खस्ता, केलेली धडपड विस्मरणात जाते, असे प्रा. परसू गावडे यांनी सांगितले.
स्थानिक नाट्यसंस्थांना कोणतेही नाट्यगृह उपलब्ध नसते, आणि नाट्यगृहावर सादर करण्यासाठी आर्थिक कुवतीचाही प्रश्न उभा राहतो. त्यामुळे चंदगडी नाट्य महोत्सवाचे संस्थापक आणि सचिव नाट्यकर्मी परसू गावडे यांनी स्थानीक नाट्यसंस्थानाही या निमित्ताने रंगमंच उपलब्ध करून दिला आहे. यामुळे आता गावा गावात चंदगडी नाट्य महोत्सवासाठी नाटक बसविण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत. त्यामुळे गावात अडकलेल्या नाटकांचीही यानिमित्ताने आता तिसरी घंटा वाजू लागली आहे.
कोरोनामुळे मागच्या वर्षी हा महोत्सव होऊ शकला नव्हता. यंदा मात्र कोरोनाच्या भीतीचे सावट कायम असल्याने शासनाच्या नियमांच्या आदीन राहूनच नाट्य महोत्सवाचे आयोजन केले असल्याचेही प्रा. परसू गावडे यांनी सांगितले आहे. याही वर्षी ९ जानेवारीपासून १६ जानेवारी पर्यंत या नाट्यमहोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. रोज एक नाटक अशी दिनांक ९ तारखेपासून १५ तारखेपर्यंत एकूण सात नाटके सादर होणार आहेत. शेवटच्या दिवशी मात्र एकांकिकेचा जागर होणार आहे.
एकांकिका जागर
चंदगड भागात शिमगा मोठ्याने साजरा केला जातो. धुलिवंदन ते रंगपंचमी या दरम्यान चव्हाट्यावर सोंगे काढून जागर केला जातो. या जागरातून अनेक कलाकार घडले. ते नाटकाकडे आले याची जाणीव ठेवून यावर्षीपासून ‘जागर’ या सदराखाली एकांकिका सादर होणार आहेत. निवडक एकांकिकेमधून स्पर्धा होणार. त्याही एकाच रात्रीत सायंकाळी ७ पासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजेपर्यंत या एकांकिकेचा जागर होणार. नाट्यगृहाची कमतरता असल्याने खर्चाचे गणित बसवत असताना नाट्य महोत्सव आयोजकांतर्फे एकांकिका संघांना आवाहन करण्यात आले आहे, असे प्रा. परसू गावडे यांनी सांगितले.