माणसाच्या आयुष्यात भीती, राग, संताप, द्वेष, हिंसा, वेदना, दुःख, वासना, हव्यास, उन्माद, आत्मग्लानी असे असंख्य भाव काळ, घटना आणि सभोवताल यांच्या आधारावर जन्म घेत असतात. यापैकी काही भाव इतरांकडे व्यक्त होतात. तर काही मनातच दाटून राहतात. या सर्व भावभावना एकप्रकारे माणसाच्या जीवनातील अंतर्बाह्य ‘डबरी’च आहेत. ‘बाहेरच्या अवकाशातील डबर’ ते ‘माणसाच्या आतील डबर जे अधिक तीव्र आहे’ इथपर्यंतचा प्रवास, म्हणजे प्रत्यय कोल्हापूर निर्मित, अतुल पेठे संकल्पित आणि दिग्दर्शित नाटक ‘डबर’ (Debris)!
कोल्हापुरातील ‘प्रत्यय’ ही नाट्यसंस्था रंगभूमीवरील गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. याच नाट्यसंस्था तर्फे आयोजित, ‘रंगसंगत’ ही नाट्य कार्यशाळा दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. या कार्यशाळेत रंगभूमी विषयी सर्व बाजूंनी विचार करणे, नाटकाची विविध अंगे, स्वतःची शारीरिक आणि मानसिक ओळख इत्यादी गोष्टींचा अभ्यास करण्यात आला. या कार्यशाळेत दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या सोबत राजू इनामदार, ओंकार गोवर्धन, प्रदीप वैद्य आणि हिमांशू स्मार्त हे ही उपस्थित होते. या कार्यशाळे दरम्यान राबविण्यात आलेल्या उपक्रमांमधून सर्व शिबिरार्थ्यांना घेऊन ‘डबर’ (Debris) हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकाचे वैशिष्टे म्हणजे, हे नाटक इमर्सिव्ह थिएटर आणि डिव्हाईस्ड थिएटर या स्वरूपात घडते. कोल्हापुरातील चेतना विकास मंदिरच्या प्रांगणातील एका इमारतीचा नेपथ्य म्हणून वापर या नाटकात करण्यात आला. प्रकाशयोजनेच्या साहाय्याने प्रत्येक व्यक्तिरेखेचा त्यांच्या मनातील डबर, तीव्रतेने प्रेक्षकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला जातो. सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना त्यांच्यात अगदी गुंतवून ठेवतात. इमारतीच्या आत प्रेक्षकांना दिग्दर्शक अतुल पेठे हे टॉर्चचा वापर करून प्रत्येक डबर दाखवतात, व शेवटी प्रेक्षकांमध्ये टॉर्चचा प्रकाश पाडत त्यांनाही त्यांच्या अंतर्मनातील डबर पाहण्यास भाग पाडतात.
डबर (Debris) या इमर्सिव्ह आणि डिव्हाईस्ड नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शक अतुल पेठे यांचे मनोगत
नमस्कार. आम्ही ९ ते १४ जून कालावधीत कोल्हापुरात ११ वी ‘रंगसंगत नाट्यकार्यशाळा’ घेतली. या नाट्यकार्यशाळा घेण्यात रंगभूमीबाबत सर्व अंगांनी विचार करणे, या कलेविषयीचा दृष्टिकोन विकसित करणे आणि नवे काही करून पाहाणे हे उद्देश असतात. नाटक का, कशासाठी, कसे, किती तऱ्हेने, नाटक परंपरा, आवश्यक व्यायाम प्रकार, समज-गैरसमज, नाटकाची विविध अंगे, या कलेचे वेगळेपण, या कलेकरता करावी लागणारी साधना असा घेर घेत स्वतःच्या शरीराची किमान ओळख असे विषय या कार्यशाळेतून घेतले जातात.
कोल्हापूरची ‘प्रत्यय’ ही महत्वाची नाट्यसंस्था आपल्या सर्वांना सुपरिचित आहे. त्यांच्याकडे नव्या दमाची फळी उभी राहात आहे. त्यांनी हा सहा दिवसांचा घाट त्यांनी घातला. या कार्यशाळेत यावेळी राजू,हिमांशू, प्रदीप, कृतार्थ हेही सोबत होते. शेवटच्या दिवशी आम्ही चक्क ५५ मिनिटांचे ‘डबर’ नाटक साकारले. हे नाटक या कार्यशाळेतून उगवले आणि फुलले. त्याचा फक्त एकच प्रयोग होणार होता. एकच प्रयोग का, ते तुम्हाला सोबतचे त्या नाटकाचे documentation पाहून कल्पना येईल.
या Documentaion करता आम्ही ऋषिकेश मोघे या शिबिरार्थी चित्रकार मित्राचे आणि साहिल कल्लोळी या संकलक व subtitles करणाऱ्या मित्राचे आभारी आहोत.
तर वेळ होईल तेंव्हा निवांत पाहा. हे नाटक कोणीही कुठेही अभ्यास म्हणून दाखवायला आमची हरकत नाही.
‘डबर’ (Debris) या इमर्सिव्ह आणि डिव्हाईस्ड नाट्यप्रयोगाची निर्मिती
‘डबर’ (Debris) हे नाटक प्रत्यय, कोल्हापूर यांच्या तर्फे निर्मित होते.
या नाटकाची संकल्पना आणि दिग्दर्शन अतुल पेठे यांनी केले. प्रकाश योजना प्रदीप वैद्य यांनी केली असून विशेष सहाय्य राजू इनामदार, ओंकार गोवर्धन आणि कृतार्थ शेगावकर यांनी केले.
सर्व कलाकार – ‘रंगसंगत-प्रत्यय’चे शिबिरार्थी
विशेष आभार – चेतना अपंगमती विकास केंद्र, कोल्हापूर.
सर्व रसिक प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा व स्वतःच्या अंतर्मनातील डबर पाहण्यास भाग पाडून, इमर्सिव्ह एक्सपिरीयन्स देणारा नाट्यप्रयोग, ‘डबर’!