अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बोरिवलीतर्फे आयोजित ‘सुवर्ण कलश २०२२‘ या राज्यस्तरीय खुल्या मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी २२ एप्रिल रोजी दणक्यात पार पडली. या अंतिम फेरीत दाखल झालेल्या स्पर्धक संस्था आणि त्यांनी सादर केलेल्या एकांकिकांची यादी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. हा माहिती देणारा लेख जर तुम्ही वाचला नसेल तर पुढील लिंकवर नक्की वाचा.
सुवर्ण कलश २०२२ अंतिम फेरी — राज्यस्तरीय खुली मराठी एकांकिका स्पर्धा
आपण नाटकांवर जितकं प्रेम करतो तितकंच प्रेम आपण या विविध नाट्यकृतींवर आधारित स्पर्धांवरही केलं पाहिजे. विश्वास ठेवा! या स्पर्धा बघणं म्हणजे एक पर्वणी असते. अंतिम फेरीत स्पर्धक संस्थांमध्ये चुरशीचा सामना असतो. प्रयोगाआधीची स्पर्धकांच्या मानतील हुरहूर, प्रयोग ठराविक वेळात संपलाच पाहिजे नाहीतर स्पर्धेतून बाहेर होण्याची भीती, नेपथ्य लावण्यासाठी व काढण्यासाठी दिलेली वेळ, तालीम व अंतिम प्रयोगासाठी लागणार पैसा उभा करण्यासाठीची धावपळ आणि अशीच कित्येक गणितं! आणि ही असंख्य गणितं जुळवून आपल्यासमोर सादर होत असतो एक प्रयोग! त्यामागे संपूर्ण टीमची कित्येक दिवसांची मेहनत असते. या अशा स्पर्धांमधूनच आपल्या ओळखीचे कितीतरी सितारे उदयास आले आणि हळूहळू चमकले!
रसिक प्रेक्षकांमध्ये या स्पर्धांबद्दल ओढ निर्माण करण्याच्या हेतूने आम्ही आजही सुवर्ण कलश २०२२ ची अंतिम फेरीचा निकाल व एकांकिकांची काही छायाचित्रे तुमच्यापर्यंत पोहोचवित आहोत.
निकाल
अंतिम फेरीच्या परीक्षणाची धुरा गणेश पंडित, डॉ. अनिल बांदिवडेकर व राजन ताम्हाणे या ज्येष्ठ रंगकर्मींनी सांभाळली होती.
विजेत्या एकांकिका
प्रथम पारितोषिक विजेती एकांकिका म्हणजे आपलं घर, अहमदनगर संस्थेची ‘दोरखंड’ ही एकांकिका.
द्वितीय क्रमांक पटकावलेली एकांकिका आहे अभिनय, कल्याण संस्थेची ‘जीर्णोद्धार’.
कै. विनोद शहा स्मृतिप्रीत्यर्थ विशेष लक्षवेधी एकांकिका ठरली ती म्हणजे सृजन द क्रिएशन ची ‘म्हॅsss’.
लेखन
सर्वोत्कृष्ट लेखक हे पारितोषिक प्रयोग मालाड संस्थेच्या ‘शक्याचे प्रयोग’ या एकांकिकेसाठी संभाजी सावंत यांना देण्यात आले.
दिग्दर्शन
प्रथम पारितोषिक ‘दोरखंड’ एकांकिकेसाठी मोनिका बनकर यांना मिळाले.
द्वितीय पारितोषिक ‘जीर्णोद्धार’ एकांकिकेसाठी अभिजीत झुंजारराव यांना देण्यात आले.
अभिनय (पुरुष)
प्रथम पारितोषिक शंतनु राऊत यांना ‘शक्याचे प्रयोग’ एकांकिकेसाठी देण्यात आले.
द्वितीय पारितोषिक स्वराज अपूर्वा यांना ‘दोरखंड’ एकांकिकेसाठी देण्यात आले.
अभिनय (स्त्री)
प्रथम पारितोषिक नीतू सहानी यांना ‘दोरखंड’ एकांकिकेसाठी देण्यात आले.
द्वितीय पारितोषिक मनाली राजेश्री यांना ‘जीर्णोद्धार’ एकांकिकेसाठी देण्यात आले.
नेपथ्य
‘दोरखंड’ या एकांकिकेसाठी सोहम दायमा यांना देण्यात आले.
पार्श्वसंगीत
‘जीर्णोद्धार’ या एकांकिकेसाठी ओमकार जाधव यांना देण्यात आले.
प्रकाशयोजना
‘शक्याचे प्रयोग’ एकांकिकेसाठी उन्मेष वीरकर यांना देण्यात आले.
सर्व स्पर्धक संघांचे अंतिम फेरीत दाखल झाल्याबद्दल अभिनंदन आणि विजेत्यांना मन:पूर्वक शुभेच्छा!