एरव्ही कठीण वाटणारं, समजायला अवघड दिसणारं ‘विज्ञान’ जर आपल्याला नाटकाच्या अनुभवातून बघायला मिळालं तर? कल्पना मजेशीर वाटते ना!?
सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन आयुष्यात विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने मराठी विज्ञान परिषद गेल्या ५८ वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीने काम करत आहे. मराठी लोकांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन जागरूक करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याच पुढाकाराने, २०१५ साली मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा मुहूर्त साधून, समाजाच्या सर्व घटकापर्यंत विज्ञान सुलभतेने पोहोचवता यावे या उद्देशाने ‘राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा’ ही अभिनव कल्पना सुरू करण्यात आली. गेली ९ वर्ष ही स्पर्धा सातत्याने सुरू आहे. यंदाचं हे स्पर्धेचं १० वं वर्ष आहे.
राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा ही वैज्ञानिक शोध आणि विज्ञान कथा या मध्यवर्ती कल्पनेच्या अवतीभवती फिरणारी संकल्पना आहे. शास्त्रीय शोधांच्या विकासावर तसेच शास्त्रज्ञांच्या जीवनातील आव्हानात्मक प्रसंगावर आधारित एकांकिका किवा मराठीत समृद्ध असलेल्या विज्ञान कथेच्या दालनातील कथेवर आधारित एकांकिका या स्पर्धेत स्पर्धक बसवू शकतात.
प्रवेश प्रक्रिया
प्रवेश अर्ज भरण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा २०२४ प्रवेशपत्रिका
प्रवेशिकेमध्ये योग्य माहिती भरून मविपकडे ई-मेलने [email protected] अथवा कुरिअरने पाठवावी.
पुढील बटनवर क्लिक करून पैसे भरू शकता.
Payment Button
राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा ही दोन विभागात घेतली जाते. एक म्हणजे शैक्षणिक गट आणि दुसरा म्हणजे खुला गट, शैक्षणिक गट हा ७ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांकरीता मर्यादित आहे आणि खुला गट हा वरिष्ठ महाविद्यालय, नाट्यसंस्था यांच्यासाठी आहे. या गटाला वयाची अट नाही. स्पर्धा ही २ फेरीमध्ये घेतली जाते. प्राथमिक आणि अंतिम.
प्राथमिक फेरी सहभागी स्पर्धकांच्या संख्येनुसार मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अश्या विभागात घेतली जाईल. प्राथमिक फेरी साधारणपणे २० ते २५ सप्टेंबर २०२४ या दरम्यान घेतली जाईल. प्राथमिक फेरीसाठी जुजबी नेपथ्य वापरता येईल प्रकाश योजना वापरता येणार नाही, मात्र प्रकाशयोजनेचा आराखडा देता येईल. प्राथमिक फेरीतील सादरीकरणापूर्वी लेखकाची परवानगी, कलाकारांची यादी, संहितेच्या ३ प्रती पाठवणे बंधनकारक आहे. प्राथमिक फेरीतील विभागानुसार प्रथम, द्वितीय, तृतीय असा निकाल जाहीर केला जाईल. या स्पर्धेसाठी नाट्य क्षेत्रातील आणि विज्ञान क्षेत्रातील मान्यवर मंडळी नाटकांचं परीक्षण करतात, त्यातून पुढे अंतिम फेरीसाठी स्पर्धकांची निवड केली जाते. अंतिम फेरीत प्रथम पारितोषिक ३१,०००/- द्वितीय २१,०००/- तर तृतीय ११,०००/- असेल.
तुम्हाला सुद्धा विज्ञानात रस असेल, तुम्हाला आवडलेली एखादी विज्ञान कथा तुम्हाला नाटक माध्यमात सादर करावीशी वाटत असेल तर, ही संधी तुमच्याचसाठी आहे. राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख आहे १० ऑगस्ट २०२४ आणि प्रवेश फी आहे फक्त ५०० रुपये.!
www.mavipa.org अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्या आणि लगेच नोंदणी करा.
स्पर्धेचे नियम व अटी
- अंतिम फेरीतील सादरीकरणासाठी स्पर्धकांना एकूण १ तास १० मिनिटांचा कालावधी दिला जाईल.
- प्रत्यक्ष एकांकिका सादरीकरणाची वेळ ही ३० ते ४० मिनिट असावी, उरलेला वेळ तांत्रिक गोष्टींची उपलब्धता पूर्ण करण्यासाठी स्पर्धकाना दिला जाईल.
- अंतिम फेरी नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात प्रत्यक्ष मुंबईत सादर केल्या जातील. अंतिम फेरीतील सादरीकरणापूर्वी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र किवा सदर प्रमाणपत्रासाठी पैसे भरल्याची पावती असणे आवश्यक आहे.
- प्रत्यक्ष रंगमंचावर एकांकिका सादर करणार्या कलाकारांची संख्या २ ते १० विद्यार्थी/व्यक्ती एवढीच असावी. मुख्याध्यापक/संघप्रमुख/संस्थाप्रमुख/यांच्या मान्यतापत्राचा नमुना आणि लेखकाच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना संकेतस्थळावर दिला आहे.
अंतिम फेरीतील एकांकिकांचे थेट प्रक्षेपण एकांकिका सुरू असताना मराठी विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावर, फेसबूक आणि यूट्यूबवर केले जाईल. परिषदेच्या यूट्यूब चॅनेलवर मागील वर्षीच्या विजेत्या एकांकिका स्पर्धकाना बघायला मिळू शकतात, यावरून त्याना स्पर्धेची कल्पना येऊ शकेल.
तुमच्या मनातली विज्ञान कथा आता रंगमंचावर उभी राहणार!
See also:
वैज्ञानिक कलारंग — रंगभूमीवरील विज्ञानाची प्रयोगशाळा