३० ते ४५ मिनिटाच्या एकांकिकेच्या लेखनाचे कसब वाटायला जरी सोपे असले तरी हे अतिशय कौशल्याचे काम आहे. उत्तम लिखाणाच्या जोरावरच एकांकिका रंगमंचावर बहरून येते आणि म्हणूनच लेखणी ही कुठल्याही यशस्वी नाटकाचा पाया आहे असे मानले जाते. या अशा महत्वपूर्ण लेखनाला अधिक वाव मिळावा आणि उमलत्या लेखकांना त्यांचे विचार मांडायला एक स्थान मिळावं या हेतूने संजय भाकरे फाऊंडेशन आयोजित करत आहेत स्व. ज. रा. फणसळकरांच्या स्मृती प्रित्यर्थ एकांकिका लेखन स्पर्धा.
नागपूर मधील संजय भाकरे फाऊंडेशन यांनी स्व. ज. रा. फणसळकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या एकांकिका लेखन स्पर्धेचे हे पहिलं वर्ष आहे. स्व. ज. रा. फणसळकर हे अतिशय उत्तम लेखक व अभिनेते होते. त्यांच्या कार्यकालावधीत त्यांनी जवळजवळ २० ते २२ एकांकिका लिहिल्या असून बरीच नावाजलेली नाटकंसुद्धा त्यांच्या लेखणीतून जन्माला आली आहेत. मदन गडकरी दिग्दर्शित ‘पोहा चालला महादेव’ हे फणसळकरांनी लिहिलेल्या नाटकाने महाराष्ट्र राज्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आणि ते नाटक खूप गाजलं. अशा या कुशल नाट्यलेखकाचे कोरोना काळात निधन झाले. त्यामुळे त्यांच्यातल्या चिरंतर लेखकाच्या स्मृती प्रित्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक एकांकिका महाराष्ट्रभर पोहचतील आणि लेखकांच्या लिखाणालादेखील वाव मिळेल असे संयोजक व फणसळकरांचे पुत्र राजेंद्र फणसळकरांचे मत आहे.
संजय भाकरे फाऊंडेशन आयोजित या एकांकिका लेखन स्पर्धेत भाग घेणाऱ्या लेखकांना काही नियम पाळावे लागतील
१. एकांकिका स्वलिखित, मराठी भाषेत व अप्रकाशित असावी.
२. एकांकिका ३० ते ४५ मिनिटांची व प्रयोगक्षम असावी.
३. पात्रांच्या आकड्याचा काही कठोर नियम नसून कितीही पात्र एकांकिकेत सहभागी होऊ शकतात. (४ किंवा ५ पात्र असल्यास उत्तम).
४. कागदाच्या एका बाजूस योग्य तो समास सोडून टाईप केलेली असावी.
५. एकांकिकेची झेरॉक्स पोस्टाने पाठवावी किंवा पीडीएफ फॉरमॅटमध्ये मेल करावी.
एकांकिका पाठविण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट, २०२२ असून या स्पर्धेचा निकाल सायंटिफिक हॉल, नागपूर येथे ११ सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित होणाऱ्या एकांकिका महोत्सवात जाहीर करण्यात येईल. स्पर्धेच्या विजेत्यांना स्मृतिचिन्ह व रोख बक्षीस प्रदान करून सन्मानित करण्यात येईल.
प्रथम पारितोषिक: रु. ११,०००/-
द्वितीय पारितोषिक: रु. ७,०००/-
तृतीय पारितोषिक: रु. ५,०००/-
तेव्हा महाराष्ट्रभरातील सर्व हौशी लेखकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा व आपल्या लेखणीला महाराष्ट्रभर पोहोचवा.
एकांकिका पाठविण्यासाठी पत्ता
‘अक्षर’, ३७३/ए, एचबी इस्टेट, शिव मंदिराजवळ, सोनेगाव, नागपूर- ४४००२५.
एकांकिका पुढील ई-मेल आयडीवरसुद्धा पाठवू शकता.
ई-मेल: [email protected]
काहीही शंका अथवा अडचण असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक: ९८९५०३९७७३७