आपली मराठी रंगभूमी ही खऱ्या अर्थाने परिपूर्ण म्हणून नावाजली जाते ती, स्थानिक भाषेत वेगवेगळ्या भाषेत होणाऱ्या हौशी नाटकांमुळे! अशा वेगवेगळ्या भागात होणाऱ्या हौशी नाटकांची एक घट्ट मूठ बांधली जाते ती महाराष्ट्रात होत असलेल्या वेगवेगळ्या नाट्य महोत्सवांमुळे! अशाच काही नामांकित नाट्य महोत्सवांपैकी एक असलेला नाट्य महोत्सव म्हणजे कुडाळचा ‘बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सव’! हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवर कोकण विभागात अविरतपणे २७ वर्षांपासून बाबा वर्दम थिएटर ही संस्था मोलाचं काम करते आहे. इथे आयोजित होत आलेल्या नाट्य महोत्सवाने महाराष्ट्रात आपले एक वेगळं स्थांन तयार केलं आहे. कुडाळची परिपूर्ण संस्कृती, आयोजकांतर्फे होणारं उत्तम व्यवस्थापन आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद ही या महोत्सवाची विशेष ओळख!
Baba Vardam Smruti Natya Mahotsav
गेल्या २७ वर्षात या महोत्सवात फक्त मराठीच नाही तर, इतर भाषेतली नाटके सुद्धा सादर झाली आहेत. या महोत्सवासाठी कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश येथील नामांकित नाट्यसंस्थानी आपली कलाकृती सादर केली आहे. या वर्षी हा नाट्य महोत्सव दि. ७ जानेवारी ते १३ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी नाटक पाठवायचे असेल तर भारतातील कोणत्याही राज्यात नाट्य संस्था नोंदणी असणे गरजेचे आहे. हा महोत्सव सर्व भाषांसाठी खुला आहे. या महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २ आणि सिंधुदुर्ग जिल्हयाबाहेरील ५ अशा एकूण ७ नाटकांचा समावेश करण्यात येणार आहे. अंतिम फेरीत प्रवेश मिळालेल्या नाटक संस्थाना बाबा वर्दम थिएटर कडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाट्य संस्थाना रु. २०,०००/- आणि सिंधुदुर्ग जिल्हयाबाहेरील नाट्य संस्थेला रु. ३०,०००/- एवढी रक्कम निर्मिती सहाय्य म्हणून देण्यात येणार आहे. याच बरोबर सहभागी झालेल्या संघासाठी प्रयोगाच्या दिवशी चहा, भोजन, निवास याची सर्व व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येणार आहे. शिवाय सहभागी सर्व संघांना प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या महोत्सवाची खासियत म्हणजे यासाठी कुठल्याही प्रकारची प्रवेश फी आकारली जात नाही. हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे. इच्छुक सर्व संघांनी नमूना प्रवेश अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसोबत दि. १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पाठवावे, असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी अंतिम फेरीत फक्त ७ संघांना प्रवेश देण्यात येणार असून, यासाठी अंतिम निवड आयोजक सर्व इच्छुक संघांचे नाट्य प्रयोग किवा रंगीत तालीम प्रत्यक्ष बघून करणार आहे. महोत्सवासाठी निवड झालेल्या संघांना दि. ५ डिसेंबर २०२४ पर्यंत अंतिम फेरीतील प्रवेशाबाबत कळविण्यात येणार आहे.
इच्छुक असलेल्या सर्व स्पर्धकांनी स्पर्धेची नियमावली, माहितीपत्रक आणि प्रवेश अर्जासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा अथवा मेल आयडी वर मेल पाठवावा.
संपर्क — कार्यवाह, नाट्य महोत्सव आयोजन समिति
मोबाईल क्रमांक — केदार सामंत — ९८२२३०९८८७ / ८२७५३९०९०९
ईमेल आयडी — [email protected]
हौशी रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांना असे नाट्य महोत्सव म्हणजे आपली कला सादर करण्यासाठी सुवर्ण संधी ठरू शकते! तेव्हा हाती आलेल्या संधीचं सोनं करा आणि लगेच आपला प्रवेश निश्चित करा.
Cover image via kmspmandal.in