गेली अनेक वर्षे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळावी म्हणून विविध स्पर्धा भरवत आहे. त्यापैकीच एक महत्वाची स्पर्धा म्हणजे ‘व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धा’. यंदाचं या स्पर्धेचं ३४ वं वर्ष! या स्पर्धेत जिंकण्यासाठी व्यावसायिक नाट्य मंडळींचा बराच कस लागतो. ही स्पर्धा गेल्या काळात अनेक दिग्गजांनी गाजवली आहे. यावर्षी नऊ दमदार नाटकांमध्ये, २४ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे अंतिम फेरी पार पडली. सामना तोडीस तोड रंगला. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.
34th Marathi Vyavsayik Natya Spardha Results
व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सादर झालेल्या ९ नाटकांपैकी, स्वप्नील जाधव लिखित आणि दिग्दर्शित ‘अस्तित्व’ या नाटकाने सर्वोत्कृष्ट नाटकाचं प्रथम पारितोषिक पटकावलं. रू. ७ लाख ५० हजारचे प्रथम पारितोषिक अस्तित्वसाठी जाहीर झाले आहे. त्यासोबतच, उत्कृष्ट लेखन आणि दिग्दर्शन या विभागातील प्रथम पारितोषिक जिंकत, अंतिम फेरीत भरत जाधव एन्टरटेन्मेंटचे ‘अस्तित्व’ ठळकपणे उमटले आहे, असे म्हणता येईल. याच सोबत मल्हार निर्मित ‘गालिब’ या नाटकाला, रू. ४ लाख ५० हजारचे द्वितीय पारितोषिक आणि अभिजात क्रियेशन या संस्थेच्या ‘चाणक्य’ या नाटकाला रू. ३ लाखाचे तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. मुख्यतः दिग्दर्शनासाठी प्रथम पारितोषिक (रु.१,५०,०००/-) स्वप्निल जाधव (नाटक – अस्तित्व), द्वितीय पारितोषिक (रु.१,००,०००/-) चिन्मय मांडलेकर (नाटक – गालिब) आणि तृतीय पारितोषिक (रु.५०,०००/-) संतोष पवार (नाटक – मर्डरवाले कुलकर्णी) यांना मिळाले.
३४ वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा — निकाल जाहीर
पुरुष अभिनयासाठी भरत जाधव (नाटक – अस्तित्व), संतोष पवार (नाटक – यदा कदाचित रिटर्न्स), शैलेश दातार (नाटक – चाणक्य), ज्ञानेश वाडेकर (नाटक – चाणक्य) आणि वैभव मांगले (नाटक – मर्डरवाले कुलकर्णी) अशा दिग्गज कलाकारांना अभिनय रौप्य पदकासोबत, रू. ५० हजाराचे रोख पारितोषिक जाहीर झाले आहे. स्त्री अभिनयासाठी प्रिया बापट (नाटक – जर तर ची गोष्ट), पल्लवी अजय (नाटक – जर तर ची गोष्ट), हेमांगी कवी (नाटक – जन्मवारी), गौतमी देशपांडे (नाटक – गालिब) आणि चिन्मयी सुमित (नाटक – अस्तित्व) यांनाही अभिनय रौप्य पदकासोबत, रू. ५० हजाराचे रोख पारितोषिक जाहीर झाले आहे.
तसेच नाट्यलेखन : प्रथम पारितोषिक (रु.१,००,०००/-) स्वप्निल जाधव (नाटक – अस्तित्व), द्वितीय पारितोषिक (रु.६०,०००/-) हर्षदा बोरकर (नाटक – जन्मवारी) आणि तृतीय पारितोषिक (रु.४०,०००/-) इरावती कर्णिक (नाटक – जर तर ची गोष्ट). विशेष म्हणजे स्वप्नील जाधव आणि संदेश बोंद्रे यांनी तर तब्बल दोन – दोन पारितोषिके मिळवली आहेत. स्वप्नील जाधव यांना सर्वोत्कृष्ट लेखन आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक प्रथम तर संदेश बोंद्रे यांना नेपथ्याची द्वितीय (नाटक – चाणक्य) आणि तृतीय (नाटक – २१७ पद्मिनी धाम)अशी पारितोषिके जाहीर झाली आहेत. इतर विभागांमध्ये प्रदीप मुळ्ये, निनाद म्हैसाळकर, अमोघ फडके, इरावती कर्णिक आणि राहुल जोगळेकर अशा दिग्गज कलाकारांना विविध पारितोषिके जाहीर झाली आहेत.
व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धेचा सविस्तर निकाल खालील प्रमाणे.
या स्पर्धेसाठी परीक्षकांची भूमिका श्री. रवींद्र पाथरे, श्री. मंगेश कदम, श्री. प्रमोद पवार, श्री. शंभु पाटील आणि श्रीमती नीना राऊत यांनी पार पाडली. व्यावसायिक नाटकं उत्कृष्टच होतात, त्यात पुन्हा प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक ठरवून त्यांना निकालात बसवायचे तसे कठीणच!
यावर्षी स्पर्धेत भरघोस यश संपादन केलेल्या सर्वच विजेत्यांचे रंगभूमी.com तर्फे मनःपूर्वक अभिनंदन! असेच उत्तमोत्तम नाट्यप्रयोग या नाट्यनिर्मात्यांकडून घडत राहतील अशी अपेक्षा.