‘नाटकात रमलेला माणूस रंगभूमीपासून फार काळ दूर राहू शकत नाही’, असं म्हणतात आणि हे ब्रीदवाक्य बऱ्याच कलाकारांनी आजवर सिद्धही केलेलं आहे. याच कलाकारांच्या यादीतील दोन महत्वाची नावं म्हणजे अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी! या जोडप्याचं ‘फिर से हनिमून’ हे हिंदी नाटक सध्या रंगभूमीवर प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहेच! पण, आता हेच नाटक ‘पुन:श्च हनिमून‘ या नावाने मराठी भाषेतही प्रेक्षकांच्या भेटीसाठी रंगभूमीवर सज्ज झाले आहे.
नाटकाबद्दल थोडंसं…
आपल्या नात्यात आलेलं साचलेपण घालवण्यासाठी एक जोडपं पुन्हा हनिमूनला जातं. सगळं पाहिल्यासारखं व्हावं असा त्यांचा प्रयत्न असतो. हॉटेल ड्रीमलँडला ते पोहोचतात तेव्हा ते हॉटेल घरासारखं दिसायला लागतं. भूतकाळातल्या घटना वर्तमानात मिसळायला लागतात. कधी हसवणाऱ्या तर कधी जखमी करणाऱ्या ह्या वेगवान घटनांमधून त्यांचे आयुष्य उलगडत जाते. भविष्यकाळाची स्वप्न पाहण्याआधी त्यांना ह्या भूतकाळाला पूर्णविराम देणं गरजेचं असतं. ते त्यांना जमेल का नाही? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘पुन:श्च हनिमून’ या नाटकाला भेट द्यावी लागेल.
दिग्दर्शकाचे मनोगत
नाटकाचे लेखक व दिग्दर्शक संदेश कुलकर्णी हे त्यांच्यासाठी अत्यंत जवळचं नाटक असल्याचं सांगतात. ते पुढे असेही म्हणाले की, “मी १२ वर्षांपूर्वी या नाटकाचा पहिला मसुदा लिहिला होता. आता मी तोच ड्राफ्ट सध्याच्या काळाशी सुसंगत स्वरूपात संपादित करून पुनर्लिखित केला आहे. या प्रक्रियेत मी लेखक म्हणून अधिक प्रगल्भ झालो, असं मला वाटतं. मी या प्रक्रियेत काही गोष्टींकडे अधिक बारकाईने बघू शकलो ज्या मला पूर्वी मला स्पष्टपणे दिसत नव्हत्या. हे नाटक म्हणजे लग्नपद्धती आणि आजच्या ‘मेट्रो लाईफ’मधील धकाधकीच्या जीवनाचे त्यावर होणारे परिणाम यावरील माझी प्रतिक्रिया आहे. यामध्ये नात्यांचा नव्याने शोध घेतला गेला आहे. केवळ पती-पत्नीचे नातेच नाही तर आपल्या सभोवतालच्या जगाशी असलेले नाते आणि प्रत्येक गोष्टीचा आपल्यावर नकळत कसा परिणाम होतो, याचे दर्शन या नाटकातून घडणार आहे. माथेरानच्या जंगलातून प्रवासाचे रूपकात्मक रूपांतर करून आपण आपल्याच मनातील प्रवास दाखवतो. आत डोकावायला लागल्यावर जी भीती निर्माण होते ती माथेरानच्या जंगलात सापाचे रूप घेते. नाटकातील जोडपे हा खडतर प्रवास करतात आणि जखम होतात, त्यांना दुखापत होते, पण ते वेदना सहन करतात, शेवटी बरे होतात आणि शहाणे होतात.”
नाटकाची संपूर्ण टीम
स्क्रिप्टीझ क्रिएशन्स निर्मित दोन अंकी नाटक पुनश्च हनिमून
लेखक आणि दिग्दर्शक – संदेश कुलकर्णी
कलाकार – अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी, अमित फाळके, अशितोष गायकवाड
संगीत – नरेंद्र भिडे
प्रकाश योजना – आशुतोष परांडकर
नेपथ्य – मीरा वेलणकर
वेशभूषा – श्वेता बापट
प्रसिध्दी छायाचित्रण – जितू सवलानी
प्रसिद्धी मोहीम रचनाकार – सचिन सुरेश गुरव.
ध्वनी संयोजन -प्रितिष खंडागळे
नाटकाचे वर्णन ऐकता ‘पुनःश्च हनिमून’ हे नाटक म्हणजे प्रेक्षकांसाठी एक भावनिक प्रवास ठरणार आहे. अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी एकत्र म्हणजे अभिनयाची पर्वणीच! एकंदरीत मनोरंजनाची शे-टक्के हमी! म्हणूनच, लवकरात लवकर या नाटकाला नजीकच्या नाट्यगृहात भेट द्या.
पुढील प्रयोग