मंडळी, तुम्हाला ‘एक डाव भटाचा’ हे धमाल विनोदी नाटक आठवतंय? याच नाटकामुळे वैभव मांगले घराघरात पोहोचले. त्यानंतर वैभव दादांनी बऱ्याच अजरामर भूमिका साकारल्या. वेगवेगळ्या धाटणीच्या. अगदी आजही त्यांची वाडा चिरेबंदी, संज्या छाया ही नाटकं रंगभूमीवर प्रेक्षकांची मनं जिंकतायत. पण आज वैभव दादा पुन्हा ‘Home Pitch’ वर अर्थात विनोदी genre मध्ये नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि होम ग्राउंड म्हटल्यावर सिक्सर वर सिक्सर तर कम्फर्म आहेतच ना! आणि त्याला दिलीप जाधव यांच्या अष्टविनायक नाट्यसंस्थेची व धमाल विनोदी नाटकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या संतोष पवार यांच्या दिग्दर्शनाची जोड मिळणं म्हणजे बहारच! निवेदिता सराफ आणि मयुरी मांगले या नाटकाला सहनिर्मात्या म्हणून लाभल्या आहेत.
Murderwale Kulkarni Marathi Natak
अष्टविनायक निर्मित, जयंत उपाध्ये लिखित आणि संतोष पवार दिग्दर्शित ‘मर्डरवाले कुलकर्णी’ ही एक सिट्यूशनल कॉमेडी आहे. पडदा उघडताच एक मध्यम वयस्कर जोडपं, श्री. व सौ. कुलकर्णी यांचं घर आपल्याला दिसतं. एके दिवशी त्यांच्या घराबाहेर खून होतो आणि माधव कुलकर्णी तो खून होताना बघतात. खुनाचा साक्षीदार ठरल्याने त्यांच्या आयुष्यात एकच वादळ उठतं. त्या अनुषंगाने बरेच चित्रविचित्र, अतरंगी असे पाहुणे त्यांच्या घरी येतात. आणि हास्याचे विस्फोट उडत राहतात.
See Also: संज्या छाया [Review] — आयुष्याचा नवा अर्थ उलगडून देणारा भावनिक प्रवास!
Murderwale Kulkarni Video — Natak Preview
Vaibhav Mangle in Murderwale Kulkarni
वैभव दादांच्या अभिनय आणि विनोदाचं टायमिंग याबद्दल काय वेगळं सांगायचं म्हणा? वैभव दादा विनोदतला हुकुमी एक्का आहेत हे आपल्याला माहीत आहेच. पण या नाटकातलं अजून एक हाईलाइट म्हणजे वैभव मांगलेंचा मधुर आवाज. त्यातही अधूनमधून काही गद्य स्वरूपातील ओळी ते पद्य स्वरूपात गातात, आलाप घेतात, तेव्हा तो मधूर आवाज कानात साठवावा की वन्स मोअर द्यावा अशी प्रेक्षकांची गत होते. पण दृष्य इतकी वेगाने पुढे सरकतात की आपण थांबूच शकत नाही. एका पाठोपाठ एक पंचेस आपल्याला लोटपोट करत राहतात.
Bhargavi Chirmule — Fresh Role & Perfect Comedic Timing
भार्गवी चिरमुले यांनी त्यांच्या आजवरच्या भूमिकांशी परस्परविरुद्ध अशी भूमिका वठवली आहे. मला प्रश्न पडतो की आजवर त्यांना अशी भूमिका का ऑफर झाली नाही? या नाटकात त्या अतिशय फ्रेश दिसत आहेत आणि त्यांनी वैभव दादांसोबत विनोदाचं अचूक टाइमिंग साधलं आहे.
Nimish Kulkarni — Impressive Acting Like No Other
आणि आता निमिष कुलकर्णी! वैभव मंगले यांच्या ताकदीचा परफॉरमेंस या कलाकाराने दिलेला आहे. त्याला आजवर आपण अशा भूमिकेत बघितलेलं नाही. अगदी हास्यजत्रेतही नाही. निमिषची व्यक्तिरेखा हे प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज आहे. त्यामुळे मी फार काही सांगू शकत नाही. पण या नाटकामुळे निमिषची रंगभूमीच्या इतिहासात एक गुणी अभिनेता अशी नोंद होणार आहे, एवढं नक्की!
Vikas Chavhan — High Explosive Energy
विकास चव्हाण या कलाकाराने पोलिसाच्या भूमिकेत जान आणली आहे. त्याची संवादफेक आणि रंगमंचावरील वावर एकदम कमाल! आणि हो विकास तुझ्या बेली डांससाठी पुन्हा एक वन्स मोर!
Sukanya Kalan — Surprise Package
सुकन्या काळण या नाटकात एक सर्प्राइज़ पैकेज आहे. पहिल्या अंकात न्यूज़ रिपोर्टर आणि दुसऱ्या अंकात बार गर्ल अशा दोन भिन्न टोकांच्या भूमिका ती साकारत आहे. तिने या दोन्ही भूमिका अतिशय सर्रस वठवल्या आहेत. तिच्या नृत्याची एक झलकही या नाटकातून बघायला मिळणार आहे.
Murder Wale Kulkarni Marathi Natak Review
कमाल अभिनेते, धमाल सिचुएशन कॉमेडी, त्यावर संतोष पवार यांच्या बेमिसाल उत्स्फूर्त दिग्दर्शनाचा साज, रंगमंचावर हास्यकल्लोळ घडवून आणतात. वैभव मांगले या नाटकात रंगमंचावर बागडतात. एखादा सिंह कसा दिमाखात त्याच्या जंगलात राजासारखा वावरतो तसेच ते मुक्तपणे आणि दिमाखात वावरतात. त्यांची भाषेवरची पकड, गाताना स्वरांमधील मृदुपणा, अचूक देहबोलीचा विनोदनिर्मितीसाठी केलेलं वापर… सगळच लाजवाब! त्यांना भार्गवी चिरमुले यांची योग्य साथ मिळाली आहे.
हे नाटक तुम्ही सहपरिवार सहकुटुंब बघावं ही विनंती! कारण, या नाटकात सामाजिक भान राखत विनोदनिर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे, कुठल्याही वयोगटातील प्रेक्षकांच्या भावना दुखविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
दिलीप जाधव यांच्या अष्टविनायक संस्थेने हे नाटक रंगभूमीवर आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! दोन अडीच तास टेन्शन विसरून हास्यरसात डुंबायचं असेल तर या नाटकाला अवश्य भेट द्या.