एकांकिका स्पर्धा म्हणजे हौशी नाट्यक्षेत्रातील नव्या पिढीच्या कलाकारांसाठी फारच जवळचा विषय. मग ती पुरुषोत्तम करंडक असो किंवा सवाई एकांकिका स्पर्धा, नव्या पिढीचे सर्वच कलाकार या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक असतात. यावर्षीचा, म्हणजेच २०२४ चा स्पर्धांचा सीझन आता सुरू झालाय. पुरुषोत्तम करंडकाची नांदी झालेली आहे व तसेच अनेक नवे करंडकही या वर्षी तयार होत आहेत. अशातच एक नवी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा, सर्व विद्यार्थी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू होणार आहे. जिचं नाव आहे, ‘सकाळ करंडक’!
सकाळ करंडक एकांकिका स्पर्धेचा प्रवेश अर्ज मिळवण्यासाठी, तसेच स्पर्धेचे नियम व अटी जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्णपणे वाचा.
Sakal Karandak 2024 Ekankika Competition
सकाळ करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा येत्या नोव्हेंबरमध्ये रंगणार आहे. प्राथमिक, विभागीय अंतिम आणि महाअंतिम अशा तीन फेरीत ही स्पर्धा होणार असून, राज्यभरातील सहा विभागांतील अव्वल संघांमधून स्पर्धेचा महाविजेता निवडला जाणार आहे. गतवर्षी ही स्पर्धा पुणे विभागात पार पडली होती, मात्र यावर्षी या स्पर्धेचा विस्तार करून राज्यभरातील विविध केंद्रांवर जसं की, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक आणि नागपूर अशा केंद्रांवर ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला ८ नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. या प्राथमिक फेरीत निवडल्या जाणाऱ्या संघांमध्ये विभागीय अंतिम फेरी होईल. विभागीय अंतिम फेरीत प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्या संघाची निवड महाअंतिम फेरीत होईल. प्रत्येक विभागातून निवडलेल्या अव्वल संघांमध्ये ‘सकाळ करंडक’ साठी महाअंतिम फेरी रंगेल. ही महाअंतिम फेरी १ डिसेंबरला पुण्यात रंगेल. या स्पर्धेचे वैशिष्ट्ये म्हणजे, कुठेही सादर न झालेल्या एकांकिका पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. प्रथम दोन क्रमांकांच्या विजेत्या एकांकिकांचे स्पर्धेनंतर ‘सकाळ’तर्फे व्यावसायिक प्रयोग लागणार आहेत. स्पर्धेपूर्वी सर्व संघांना अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळेल.
Sakal Karandak 2024 – Entry Form
सकाळ माध्यम समूह आयोजित सकाळ करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा २०२४ चा प्रवेश अर्ज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Sakal Karandak 2024 Entry Form
Sakal Karandak 2024 – Rules & Regulations
सकाळ करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा २०२४ चे नियम व अटी खालील प्रमाणे:
१) सदर एकांकिका स्पर्धेत वर्ष २०२३ व २०२४ मध्ये कुठेही सादर न केलेली एकांकिका करणे बंधनकारक. ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातील महाविद्यालयांसाठी असेल.
२) ही स्पर्धा त्रिस्तरीय पद्धतीने आयोजित केली जाईल. प्राथमिक फेरी, विभागीय अंतिम फेरी आणि महाअंतिम फेरी अशा फेऱ्या असतील. प्राथमिक फेरी ज्या विभागांमध्ये होईल तिथेच ज्या त्या प्रत्येक विभागात विभागीय अंतिम फेरी पार पडेल. तसेच विभागीय अंतिम फेरीत प्रथम येणाऱ्या संघांची महाअंतिम फेरी पुण्यात पार पडेल.
३) लॉट्सच्या दिवशी सादर केलेल्या प्रवेश अर्जामध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावे कलाकार म्हणून दिली असतील त्याच विद्यार्थी कलाकारांनी सर्व प्रयोग सादर करावयाचे असून कोणत्याही कारणास्तव विद्यार्थी कलाकार बदलता येणार नाहीत.
४) महाअंतिम व विभागीय अंतिम फेरीसाठी बाहेरगावाहून येणाऱ्या स्पर्धकांचा प्रवास, निवास व भोजन या सर्व व्यवस्थेची जबाबदारी त्या त्या संघाची राहील.
५) या स्पर्धेमध्ये फक्त मराठी भाषेतील एकांकिका सादर करावयाची आहे. स्पर्धेसाठी निवडलेल्या प्रयोगाच्या हक्काची रीतसर परवानगी मिळविण्याची जबाबदारी व रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडून पूर्वपरीक्षित करून घेऊन एकांकिकेचा डीआरएम क्रमांक मिळवण्याची जबाबदारी स्पर्धक महाविद्यालयांवर राहील.
६) प्रवेश अर्जासोबत लेखकाचे ना हरकत प्रमाणपत्र, कलाकारांची यादी (तंत्रज्ञांसह), तसेच रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने दिलेले प्रमाणपत्र सोबत जोडावे, फॉर्मसोबत संहितेच्या ३ प्रती देणे बंधनकारक आहेत. (मंडळाचे प्रमाणपत्र अद्याप आले नसल्यास मंडळास संहिता पाठवल्याची पावती जोडलेली चालू शकते.)
७) महाविद्यालयांना एकच संघ स्पर्धेसाठी पाठविता येईल. स्पर्धेचे प्रवेशशुल्क रु. १०००/- आहे. प्रवेशशुल्क एकदा भरल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही. प्रवेश अर्ज घेतेवेळी हे शुल्क रोख अथवा डी. डी. स्वरूपात द्यावे.
८) प्रत्येक संघास एकांकिका सादर करण्यासाठी १ तासाचा कालावधी मिळेल यामध्ये एकांकिकेचा कालावधी किमान ३५ मिनिटांचा असावा. यात रंगमंच मांडणी, प्रकाशयोजना यांसह एकांकिका सादर करून रंगमंच रिकामा करावयाचा आहे.
९) प्रकाशयोजना, ध्वनी संयोजन, वेशभूषा, रंगभूषा, अभिनय, नेपथ्य रचना आणि ध्वनियंत्रणा इ. सर्व कामे त्या विद्यार्थ्यांनीच करावयाची आहेत. कलाकार आणि पडद्यामागील सहाय्यक यांची संख्या २० पेक्षा अधिक असता कामा नये. यात पडद्यामागील सहाय्यकाची संख्या ८ पेक्षा अधिक असता कामा नये.
१०) प्रवेश अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख : ३०-९-२०२४ आहे. या तारखेनंतर कुठल्याही महाविद्यालयाचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
११) विद्यार्थी लेखकाकडून नव्याने लिहिण्यात येणाऱ्या उत्कृष्ट संहितेसाठी विशेष पारितोषिक देण्यात येईल. विद्यार्थी लेखकांच्या संहिता रूपांतरित, भाषांतरित किंवा अनुवादित असल्यास त्यांचा लेखनाच्या पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही.
१२) परीक्षकांचा निर्णय अखेरचा असून तो सर्व स्पर्धक महाविद्यालयांवर बंधनकारक राहील आणि नाट्यस्पर्धेच्या वरील नियमांत व कार्यक्रमात बदल करण्याचा व ठरवण्याचा अधिकार आयोजकांकडे असेल.
१३) प्राथमिक व अंतिम फेरीची छायाचित्र तसेच अंतिम फेरीतील एकांकिकांचे चित्रीकरण करण्याचा व ती प्रसारित करण्याचा अधिकार आयोजकांकडे असेल.
सकाळ करंडक विषयी दिग्गज कलाकारांचे मत
सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेतूनच मुले घडतात. योग्य काय, अयोग्य काय याची जाणीव होते. ‘सकाळ करंडक’ या स्पर्धेच्या माध्यमातून असेच कलाकार घडले आहेत, पुढेही घडतील याची खात्री आहे. मुलांमध्ये नाटकांची आवड निर्माण होण्यासाठी अशी स्पर्धा राज्यभरात होणे फार गरजेचे आहे. ‘सकाळ’सारखी संस्था ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेते आहे, याचा आनंद आहे.
— मृणाल कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री
एकांकिका स्पर्धा हा अभिनयाचा पाया आहे. अशा स्पर्धांमधूनच कलाकार घडतात. नवीन लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार निर्माण होणे, ही काळाची गरज आहे. ‘सकाळ करंडका’सारख्या एकांकिका स्पर्धा म्हणजे याची ‘रेसिपी’ आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’सारखी संस्था ज्यावेळी अशा प्रकारची स्पर्धा मुलांसाठी भरवते, त्यावेळी त्या नावाची पुण्याई विद्यार्थ्यांच्या मागे उभी राहते. स्पर्धेस खूप खूप शुभेच्छा.
— स्वप्नील जोशी, अभिनेते
सकाळ करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा २०२४ चे प्रायोजक
‘रांजेकर रियल्टी’ आणि ‘बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रे. सोसायटी’ हे या सकाळ करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे प्रायोजक आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत कुलकर्णी हे या स्पर्धेचे सांस्कृतिक दूत आहेत. व यंदाच्या स्पर्धेला अश्वमी थिएटर्स यांच्याकडून विशेष सहकार्य मिळणार आहे.
या स्पर्धेचे पुढील updates लवकरच सकाळ साप्ताहिक व रंगभूमी.com वरती कळवले जातील. विद्यार्थी कलाकारांसाठी सकाळ करंडक ही आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा नक्कीच त्यांच्या धेय्यापर्यंत पोहोचण्याची एक पायरी असेल यात काही शंका नाही. सकाळ करंडक आणि सहभागी होणाऱ्या प्रत्येक महाविद्यालयीन संघांना रंगभूमी.com तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा!