मराठी नाट्यसृष्टीसाठी २०२२ हे महत्वाचं वर्ष ठरलं. कोरोना महामारीनंतर नव्याने उभ्या राहिलेल्या या विश्वात सर्व दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी ताज्यातवान्या कथांसह बहारदार नाटकांची मेजवानी आणली. जमेची बाजू म्हणजे वर्षाच्या शेवटापर्यंत ही मेजवानी सुरुच आहे. अजूनही नवनवी नाटकं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत आणि याच यादीतील प्रेक्षकांच्या भेटीस येणारं एक नवकोरं नाटक म्हणजे थँक्स डियर. निखिल रत्नपारखी आणि हेमांगी कवी अभिनीत या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग २५ डिसेंबर रोजी चिंचवडमधील वा. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षगृह आणि पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे अनुक्रमे दुपारी १२.३० आणि सायंकाळी ५.३० वाजता सादर होणार आहेत.
शहर असो वा ग्रामीण भाग, कलोपासक असोत वा बुध्दीजीवी प्रत्येक क्षेत्रात शर्यत ही असतेच. या शर्यतीत अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. या कठोर स्पर्धेत काहीजण तरतात तर अनेक लोकं भरडली जातात. अशाच प्रकारच्या, सिनेमा माध्यमातील स्पर्धेवर भाष्य करणारे हे नाटक निखिल रत्नपारखी आणि तुषार गवारे यांनी लिहिले व दिग्दर्शित केले आहे. निखिल या संहितेवर काही महिन्यांपासून विचार करत असताना ऑक्टोबरमध्ये या नाटकाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. निखिल आणि तुषार यांनी दिग्दर्शन आणि लेखणीतून प्रेम, विनोद, विश्वासघात, गंभीरता अशा अनेक भावनांचा ताळमेळ या नाटकात बसवला आहे. ज्वलंत घटनांवर आधारित असल्याने प्रेक्षक या नाटकाशी सहज जोडले जाऊ शकतात. हे नाटक प्रेक्षकांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे आहे. प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहचण्यासाठी त्यांच्याच बोलितले शब्द घेत ‘थँक्स डियर’ हे नाटकाचे नाव ठेवण्यात आले. या नाटकाची निर्मिती मोरया थिएटर्स, अद्वैत थिएटर्स आणि सर्वस्य प्रोडक्शन यांनी केली आहे.
थँक्स डियरमध्ये हेमांगी कवी आणि निखिल रत्नपारखी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हेमांगी ‘सती’ची भूमिका साकारणार असून निखिल ‘रघु दिक्षित’ची भूमिका साकारणार आहे. या नाटकाची निर्मिती भाऊसाहेब भोईर, राहुल भंडारे आणि श्रद्धा हांडे यांनी केली आहे. नेपथ्य संदेश बेंद्रे, प्रकाशयोजना शीतल तळपदे, संगीत गंधार, वेशभूषा श्रद्धा हांडे आणि रंगभूषा उलेश खंदारे या कलाकारांनी केले आहे. विशेष आभार असणारे कादंबरी कदम आणि दिलीप प्रभावळकर यांच्या भूमिकेबाबत अजूनही गुपित राखले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कादंबरी कदम हीचा आवाज या नाटकात ऐकू येण्याची माहिती मिळाली आहे. या नाटकाचा मुंबईतील शुभारंभाचा प्रयोग ३१ डिसेंबर शिवाजी मंदिर, दादर येथे होणार आहे.
हेमांगी कवीचे पुन्हा एकदा रंगभूमीवर पदार्पण झाले असून तुषार गवारे यांचे व्यवसायिक रंगभूमीवरील दिग्दर्शक म्हणून पहिले नाटक आहे. तर, श्रध्दा हांडे या नाटकाद्वारे प्रथमच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे.
नाटकाबद्दल सांगताना हेमांगी म्हणते, “चित्रपट, मालिका आणि नाटक यामधील नाटक हे माझे पहिले प्रेम आहे. निखिलचे पात्र या नाटकाचा युनिक पॉइंट आहे. गंभीर पद्धतीने मांडलेल्या नाटकातील विनोदाने प्रेक्षक मनापासून हसतील अशी खात्री आहे.”
सर्व कलाकारांना आणि थँक्स डियर च्या संपूर्ण टीमला रंगभूमी.com कडून शुभेच्छा.