मराठी रंगभूमीच्या कित्येक वर्षांच्या परंपरेत एकांकिका आणि नाट्यवाचनाचे महत्व आपण जाणून आहोत. प्रत्येक कलाकार रंगभूमीच्या संस्कारात वाढत असतो. नवनवीन गोष्टी शिकत असतो. काही कलाकारांनी नाट्यवाचन आणि एकांकिकेचा प्रयोग करण्याचे योजिले आहे. अनाम प्रस्तुत करत आहे २ नाट्यवाचन आणि १ एकांकिकेची मेजवानी. ११ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ, पुणे येथे सोहळा पार पडणार आहे.
अनाम संस्था
अक्षय व्यवहारे आणि कौस्तुभ सहस्त्रबुद्धे हे संस्थेचे प्रमुख असून संस्थेची सुरुवात २०१९ साली झाली. अनाम ची सुरुवात यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून झाली आणि आता रंगभूमीच्या सेवेत तत्पर आहेत. अनाम लघुपट क्षेत्रात काम करत असून अनाममधून ‘पाहुणचार’ या एकांकिकेची निर्मिती करण्यात आली.
पहिले नाट्यवाचन — माझी पहिली चोरी
पुण्यातील ‘कलाकार मंडळी’ सादर करत आहे द. मा. मिराजदर यांच्या कथेवर आधारित नाट्याचे वाचन. याचे नाट्यरूपांतर आणि दिग्दर्शन अक्षय व्यवहारे यांनी केले आहे. या कथेत साठे नावाच्या एका गृहस्थांच्या घरात चोरी होते. ते बघण्यासाठी त्यांच्या घरी गर्दी आणि गोंधळ सुरू होतो. या एकूण प्रकाराला कंटाळून, नवीन मार्ग शोधायचा साठे प्रयत्न करतात. आता ते नेमकं काय करतात? आणि हे सगळं सुरू असतानाच, या सगळ्या दरम्यान कशा गमतीजमती घडतात हे दाखवणारं हे विनोदी नाटक आहे. उद्गार करंडक २०२२ मध्ये या एकांकिकेला प्राथमिक फेरीत सांघिक उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
दुसरे नाट्यवाचन — झेड.पी
‘नवल, पुणे’ सादर करणार आहेत झेड. पी. या नाटकाचे वाचन. याचे लेखन आणि दिग्दर्शन अभिनव जेऊरकर यांनी केले आहे. जिल्हा परिषदेतील चालणारा सावळा गोंधळ आपल्याला सदर नाट्यवाचनात पाहायला मिळतो. महाराष्ट्रभरातील झेड.पी. शाळेतील सत्य परिस्थिती फार्सीकल अंगाने सांगत गोष्ट पुढे जाते. खालावत चाललेल्या शैक्षणिक दर्जामुळे शाळेचा पट रोडवला आहे. हा पट पूर्ण करण्याचे वरून आदेश आलेले आहेत. पटसंख्या कमी झालेली असताना शाळेतील शिक्षक कशा पद्धतीने काम करतात आणि ते शाळेचा पट कोणत्या पद्धतीने पूर्ण करतात हे ‘झेड.पी.’ नाटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या एकांकिकेला कलापिनी करंडक स्पर्धेत सांघिक द्वितीय तर ५ वैयक्तिक पारितोषिके मिळाली. अभिनय पुरुष – प्रथम, अभिनय स्त्री – प्रथम, लेखन – द्वितीय दिग्दर्शन – द्वितीय, अभिनय पुरुष – उत्तेजनार्थ.
एकांकिका — क्षमा
पुण्यातील ‘कलाकार मंडळी’ सादर करत आहे एकांकिका क्षमा. मुळात कथेचा विषय हा रहस्यमय सत्य उलगडणं हा आहे. कथेच्या सुरुवातीला एक व्यक्ती एका निर्मनुष्य बस स्टॉप वर येते आणि त्या व्यक्तीला एक अनोळखी व्यक्ती येऊन भेटते. त्या दोन अनोळखी व्यक्तींमध्ये होणाऱ्या संभाषणातून उलगडणारं सत्य कथेत रंजकरित्या मांडण्याचा प्रयत्न आहे. कथेतील दोन्ही पात्रांमधील संभाषण हेच मूळ कथेला धरून ठेवणारा विषय आहे.
लेखक-दिग्दर्शक: शिवम मिलिंद पाटील
नेपथ्य: कल्याणी देशपांडे
प्रकाशयोजना: अनिकेत नेमाने
संगीत: परितोष ठाकर, अतुल डगळे
कलाकार: अभिजीत घानुरे, परितोष ठाकर,कल्याणी देशपांडे आणि कौस्तुभ सहस्त्रबुद्धे.
तिकीट बुकिंगसाठी
तिकीट बुकिंगसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा
७०५७३७२२५६ / ८२०८५२०६३५
अनाम, नवल आणि कलाकार मंडळी पुणे यांना पुढील वाटचालीसाठी रंगभूमी.com कडून मनःपूर्वक शुभेच्छा.
रंगभूमीवरील अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी रंगभूमी.com ला फॉलो करा.